पंतप्रधान कार्यालय

उर्जा स्थित्यंतराबाबतच्या इटली आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीसंदर्भातील संयुक्त निवेदन

Posted On: 30 OCT 2021 5:44PM by PIB Mumbai

 

रोममध्ये 30 आणि 31 ऑक्टोबर 2021 या दोन दिवसांत होत असलेल्या जी-20 राष्ट्रांच्या नेत्यांच्या परिषदेच्या सोबतच इटलीचे पंतप्रधान महामहीम मारिओ द्राघी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय बैठक घेतली.

भारत आणि इटली या देशांदरम्यान 2020 ते 2024 या कालावधीसाठीच्या कृती आराखड्याचा 6 नोव्हेंबर 2020 पासून केलेल्या स्वीकारापासून आतापर्यंत या दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय नातेसंबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाल्याचे मत दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केले. जी-20 देशांची परिषद आणि ग्लासगो येथे होत असलेली सीओपी26 ही परिषद यांमध्ये मध्यवर्ती स्थान असलेल्या हवामान बदलाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आपल्या विद्यमान उर्जा स्वरूपाचे स्वच्छ उर्जेत स्थित्यंतर करण्यासह कृती योजनेत आखून दिलेल्या सर्व धोरणात्मक विषयांमध्ये सहकार्य आणखी बळकट करण्याचा निश्चिय दोन्ही देशांनी व्यक्त केला.

या दोन्ही नेत्यांनी भारत- युरोपियन महासंघ  नेत्यांमध्ये पोर्टो येथे 8 मे 2021 रोजी झालेल्या बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांनी हवामान बदलाच्या समस्येतील परस्परावलंबी आव्हाने, जैवविविधतेचे नुकसान आणि प्रदूषण यांच्याबाबत उपाय शोधून काढण्याची निकड व्यक्त केली होती याचे स्मरण केले. तसेच समुद्रकिनाऱ्यावरील पवन ऊर्जेसारख्या नाविन्यपूर्ण नवीकरणीय तंत्रज्ञानांच्या वापरासह इतर नविकरणीय उर्जा स्त्रोतांच्या वापराबाबत सहकार्य आणखी मजबूत करण्याबाबत तसेच हरित हायड्रोजन वापर तंत्रज्ञानाचा अधिक वापर, उर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन, स्मार्ट ग्रीडचे विकसन आणि साठवण तंत्रज्ञान, वीज पुरवठा बाजाराचे आधुनिकीकरण याबाबत सहकार्य अधिक दृढ करण्याला या बैठकीत सहमती दर्शवली होती. 

त्याचबरोबर, स्वच्छ ऊर्जेकडे परिणामकारक पद्धतीने स्थित्यंतर करून त्यातून रोजगार निर्मिती, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ, उर्जेच्या बाबतीतील गरिबी दूर करण्यासोबतच, सार्वत्रिक उर्जेची उपलब्धता पुन्हा सुरु करणे या साठीचे अत्यंत महत्त्वाचे धोरण असलेल्या किफायतशीर उर्जा समावेशकतेसाठी पुनर्नविकरणीय उर्जेच्या वापराचे प्रमाण आपापल्या देशांमध्ये वाढवीत नेणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावर बैठकीत दोन्ही बाजूंचे एकमत झाले.

या दृष्टीकोनातून, 2030 सालापर्यंत 450 गिगावॅट नविकरणीय उर्जा वापरण्याच्या भारताच्या निश्चयाची तसेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला इटलीने दिलेली मान्यता आणि सक्रीय पाठिंब्याचे दोन्ही पंतप्रधानांनी कौतुक केले आणि उर्जा स्थित्यंतराच्या बाबतीत द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी सुरु करण्याला मंजुरी दिली.

अशी भागीदारी इटलीचे पर्यावरणीय स्थित्यंतर आणि भारत सरकारच्या नवीन तसेच पुनर्नविकरणीय उर्जा मंत्रालय, वीज मंत्रालय आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय याच्या दरम्यान असलेल्या पुनर्नविकरणीय उर्जा आणि शाश्वत विकास यासंदर्भातील सहकार्याला नवी प्रेरणा देण्यासह विद्यमान द्विपक्षीय यंत्रणेला बळकटी देऊ शकेल.

उर्जा स्थित्यंतरा संदर्भातील भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि इटली हे देश खालील उपक्रम हाती घेणार आहेत:

  • उर्जेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी दिल्ली येथे 30 ऑक्टोबर 2017 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य कराराद्वारे स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त कार्यकारी गटाला कार्य नेमून देणे.या गटाने स्मार्ट शहरे, गतिशीलता, स्मार्ट ग्रीड, वीज वितरण आणि साठवण संबंधी उपाय, वायू वाहतूक आणि नैसर्गिक वायूला वाहक इंधन म्हणून प्रोत्साहन, एकात्मिक कचरा व्यवस्थापन (कचऱ्यापासून संपत्तीकडे) आणि हरित उर्जा (हरिय हायड्रोजन, सीएनजी आणि एलएनजी, बायो मिथेन, बायो रिफायनरी, द्वितीय श्रेणीचे बायो-इथेनॉल, करडईचे तेल, जैव-तैल कचऱ्यापासून इंधन)याबाबतीत अधिक सहकार्याचे मार्ग शोधणे
  • भारतात हरित हायड्रोजन आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या विकसन आणि वापरासाठी मदत करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरु करणे.
  • 2030 सालापर्यंत 450 गिगावॅट पुनर्नविकरणीय उर्जा निर्माण करून वापरण्याच्या भारताच्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी भारतात मोठा आकाराचा हरित प्रदेश प्रकल्प सुरु करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याच्या शक्यतांवर विचार करणे
  • नैसर्गिक वायू क्षेत्र, कार्बनीकरण कमी करण्यासाठीचे अभिनव तंत्रज्ञान विकसित करणे, स्मार्ट शहरे आणि इतर क्षेत्रांमध्ये (उदा, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे विद्युतीकरण, ई.) संयुक्त प्रकल्प उभारणीसाठी भारतीय आणि इटलीमधील कंपन्यांना प्रोत्साहन देणे.
  • उर्जा स्थित्यंतरणाशी संबंधित भारतीय आणि इटलीच्या कंपन्यांना संयुक्त गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणे.
  • स्वच्छ ऊर्जेकडे स्थित्यंतर करण्याची प्रक्रिया वेगवान करण्याच्या दृष्टीने अधिक स्वच्छ आणि व्यावसायिक दृष्ट्या व्यवहार्य इंधने अथवा तंत्रज्ञान यांच्या सुविधांचे शक्य मार्ग, दीर्घकालीन ग्रीड नियोजन, पुनर्नविकरणीय उर्जा आणि कार्यक्षमता वाढीसाठीच्या योजनांना प्रोत्साहन अनुदान तसेच आर्थिक स्त्रोतांचा शोध घेणे सोपे होण्यासाठी शक्य असलेल्या सर्व मार्गांसह विशेषतः धोरणात्मक आणि नियामकीय चौकटीबाबतची उपयुक्त माहिती आणि अनुभव यांची देवाणघेवाण करणे.
  • ***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1767927) Visitor Counter : 273