गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) च्या 'सुदर्शन भारत परिक्रमा' या अखिल भारतीय कार रॅलीला शनिवारी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला येथून हिरवा झेंडा दाखवतील


केंद्रीय मंत्री अमित शहा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) सायकल रॅलींचे स्वागत करतील, देशाच्या विविध भागांमधून दांडी, ईशान्य आणि लेहपासून कन्याकुमारीपर्यंत रॅलीचे आयोजन केले होते आणि शनिवारी नवी दिल्लीत त्यांची सांगता होईल

7,500 किलोमीटर लांब प्रवासादरम्यान, एनएसजी कार रॅली 12 राज्यांच्या 18 शहरांमधील स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक ठिकाणांवरून जाईल आणि 30 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील पोलीस स्मारक येथे संपेल

Posted On: 01 OCT 2021 5:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्टोबर 2021

 

भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत केंद्रीय गृह आणि  सहकार मंत्री अमित शाह शनिवारी, 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला येथून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या 'सुदर्शन भारत परिक्रमा' या अखिल भारतीय कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील. याप्रसंगी, अमित शहा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) सायकल रॅलींचेही स्वागत करतील. देशाच्या विविध भागातून दांडी, ईशान्य प्रदेश आणि लेह पासून ते कन्याकुमारी पर्यंत आयोजित या रॅलींचा शनिवारी नवी दिल्ली येथे समारोप होणार आहे. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, रवी कुमार दहिया आणि बजरंग पुनिया हे देखील यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. केंद्र  सरकार आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकार आजच्या तरुणांमध्ये फारशी लोकप्रियता न लाभलेल्या  शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांचे शौर्य आणि बलिदानाच्या भावनेचे पुनरुज्जीवन आणि त्यांच्याप्रति भावना मनात बिंबवण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.  याअंतर्गत 7,500 किलोमीटर लांब प्रवासादरम्यान, एनएसजीची कार रॅली देशातील स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देत जाईल आणि 30 ऑक्टोबर, 2021 रोजी नवी दिल्लीतील पोलीस स्मारक येथे रॅलीची सांगता होईल. एनएसजीची कार रॅली देशाच्या 12 राज्यांमधील 18 शहरांमधून जाईल आणि काकोरी स्मारक (लखनौ), भारत माता मंदिर (वाराणसी), नेताजी भवन बराकपोर  (कोलकाता), स्वराज आश्रम (भुवनेश्वर), टिळक घाट (चेन्नई), फ्रीडम पार्क (बंगळुरू), मणिभवन/ऑगस्ट क्रांती मैदान (मुंबई) आणि साबरमती आश्रम (अहमदाबाद) या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देईल..

केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दलांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाच्या विविध भागात सायकल रॅली आयोजित केल्या आहेत. सीएपीएफच्या सायकल रॅली 15 ऑगस्ट रोजी सुरू झाल्या होत्या, ज्यात अधिकारी आणि जवानांसह सुमारे 900 सायकलस्वारांनी 21 राज्यांतून प्रवास करत दिल्लीला पोहोचण्यासाठी सुमारे 41,000 किलोमीटरचे अंतर कापले.

केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत आयोजित, या रॅलींचा उद्देश देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' म्हणून साजरा करणे, स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन परस्पर बंधुत्वाचा संदेश देणे, तरुणांना भेटून देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी आणि देशभक्तीसाठी त्यांना प्रेरित करणे, स्वातंत्र्य चळवळीतील सर्व देशभक्त आणि शहीदांना श्रद्धांजली वाहणे आणि नागरिकांमध्ये आणि तरुणांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि बंधुत्वाची भावना मजबूत करणे हा आहे.

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1760002) Visitor Counter : 330