पंतप्रधान कार्यालय
भारत आणि अमेरिका व्दिपक्षीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
25 SEP 2021 3:01PM by PIB Mumbai
श्रीयुत राष्ट्राध्यक्ष, आपण माझे आणि माझ्या प्रतिनिधीमंडळाचे ज्या उत्साहाने आणि मैत्रीपूर्ण भावनेने स्वागत केले, त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपले अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो.
याआधी 2016 आणि त्याआधीच्या भेटीत 2014 मध्येही आपल्याबरोबर सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळाली होती. त्या भेटीमध्ये आपण भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांविषयी जो दृष्टीकोन स्पष्ट केला होते, तो खरोखरीच अतिशय प्रेरणादायी होता. आणि आज आपण राष्ट्रध्यक्ष या नात्याने तोच ‘दृष्टीकोन’ नजरेसमोर ठेवून त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहात. तसेच यासाठी विशेष पुढाकार घेत आहात. त्याचे मी मनापासून स्वागत करतो.
श्रीयुत राष्ट्राध्यक्ष, आपण भारतामध्ये बायडेन आडनावाच्या लोकांसंबंधीचा तपशील बोलताना सांगितला होता. माझ्याबरोबर याआधी बोलतानाही याविषयीचा उल्लेख आला होता. त्यानंतर मी बराच शोध घेतला आणि याचा काही तपशील भारतामध्ये मिळतो का, हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आज मी त्यासंबंधी काही कागदपत्रेही घेवून आलो आहे. कदाचित यामधून काही माहिती मिळू शकेल आणि ती तुमच्या उपयोगी येऊ शकेल.
महामहीम,
आज उभय देशांमध्ये व्दिपक्षीय शिखर परिषद, महत्वपूर्ण बोलणी होत आहेत. हे या शतकामधले तिसरे दशक आता सुरू झाले आहे. या दशकाचे हे पहिलेच वर्ष आहे. मी संपूर्ण दशकाकडे पाहत आहे. हे पूर्ण दशक आपल्या उभय देशांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. आपल्या नेतृत्वाखाली भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांच्या विस्ताराची बीजे रोवली जात आहेत, हे मला दिसून येत आहे. संपूर्ण विश्वातल्या लोकशाहीवादी देशांसाठी हा एक खूप मोठा आणि महत्वाचा, परिवर्तनाचा कालखंड असणार आहे, असा मला विश्वास वाटतो. हे आगामी काळात घडणार असल्याचे मला दिसून येतेय. धन्यवाद!
ज्यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधातले परिवर्तन पाहतो, त्याचवेळी मी परंपरांविषयी बोलत असतो. मी लोकशाहीवादी परंपरा आणि मूल्ये यांच्याविषयी बोलतो. याविषयी उभय देश समर्पित आहेत. आपण समर्पित असल्याचेही एक विशेष महत्व आहे, आणि या परंपरेचे महत्व आता अधिकच वाढणार आहे.
श्रीयुत राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेच्या प्रगतीमध्ये, चार दशलक्षांपेक्षा जास्त भारतीय-अमेरिकींचा मोठा हिस्सा आहे, असा आपण उल्लेख केला आहे. आणि ज्यावेळी मी या दशकाचे महत्व अधोरेखित करतो, त्यावेळी त्यामध्ये भारतीय-अमेरिकींची हुशारी, निपुणता यांची महत्वाची भूमिका असणार आहे, हेही नमूद करतो. निपुण भारतीय अमेरिकेच्या विकास यात्रेमध्ये सहभागीदार असणार आहेत. यामध्ये आपले योगदान खूप महत्वपर्ण आहे.
श्रीयुत राष्ट्राध्यक्ष, अगदी त्याचप्रमाणे, संपूर्ण जगामध्ये आज प्रेरक शक्तीला सर्वात जास्त महत्व आहे आणि ही शक्ती असणार आहे तंत्रज्ञानाची! या दशकामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांमध्ये तंत्रज्ञानाचा महत्वाचा धागा असेल. यामध्ये मानवाला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपयोगी ठरणारी सेवा देण्याची खूप मोठी संधी आपल्याला उपलब्ध होईल.
श्रीयुत राष्ट्राध्यक्ष, त्याचप्रमाणे भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान असलेल्या व्यापाराचे महत्वही कायम असणार आहे. आणि आपल्याला या दशकामध्ये एकमेकांना पूरक व्यापार करता येईल. अमेरिकेकडे असलेल्या अनेक गोष्टींची भारताला गरज आहे. आणि त्याचप्रमाणे भारताकडे असलेल्या विशेष गोष्टी अमेरिकेला मदतगार ठरू शकतात. त्यामुळे या आगामी दशकामध्ये उभय देशामध्ये व्यापाराचे क्षेत्र खूप महत्वपूर्ण असणार आहे.
श्रीयुत राष्ट्राध्यक्ष,
आता आपण दोन ऑक्टोबरला साजरी होणाऱ्या महात्मा गांधीजींच्या जयंतीचा उल्लेख केला. महात्मा गांधीजी नेहमीच ‘विश्वस्त’या विषयी एक तत्व म्हणून बोलत असत. हे दशक त्या दृष्टीनेही महत्वाचे आहे. आपण या पृथ्वीचा, वसुंधरेचा वापर एक विश्वस्त म्हणून करायचा आहे. आणि आपल्या येणा-या पिढीकडे ही पृथ्वी आहे तशीच वारशाने सोपवायची आहे. आपण या वसुंधरेला विश्वस्त या नात्याने, भावनेने जतन करायचे आहे. अशी विश्वस्ताची भावना भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. आणि महात्मा गांधीजी यांच्या आदर्शाचे पालन करताना, ही विश्वस्ताची भावना, हे तत्व, हा सिद्धांत आपल्या या संपूर्ण पृथ्वीसाठी आहे. इथे- या विश्वामध्ये वास्तव्य करणा-या प्रत्येक नागरिकाचे या विश्वाविषयी असलेले हे दायित्व आहे. प्रत्येकाची ही जबाबदारी आहे.
आपण राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही महत्वपूर्ण विषयांचा उल्लेख केला होता. ते सर्व विषय अतिशय महत्वाचे आहेत. भारतासाठीही त्यांना महत्व आहे. मग कोविड-19 असो, हवामानाचा विषय असो अथवा क्वाड असो, या सर्वांमध्ये आपण ज्या पद्धतीने पुढाकार घेतला आहे, आणि ज्या पद्धतीने कामाची अंमलबजावणी सुरू केली आहे, ते पाहता आपल्या ‘व्हिजन’चा प्रभाव दिसून येतो. हे काम अतिशय परिणामकारक ठरणार आहे. आणि मला विश्वास आहे की, आज आपल्या चर्चेमध्येही या सर्व विषयांवर आपण विस्तारपूर्वक विचारविनिमय करून संयुक्त वाटचाल सुरू करू शकतो. आपण एकमेकांसाठी आणि दोन्ही देश मिळून संपूर्ण जगासाठी खूप काही सकारात्मक कार्य करू शकतो. मला विश्वास आहे की, आपल्या नेतृत्वाखाली आजची चर्चा अतिशय सार्थक होईल.
श्रीयुत राष्ट्राध्यक्ष, आपण ज्या पद्धतीने अतिशय उत्साहाने स्वागत केले, त्यासाठी मी पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार व्यक्त करतो.
धन्यवाद!
***
S.Patil/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1758007)
Visitor Counter : 334
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam