पंतप्रधान कार्यालय

गोव्यातील कोविड लसीकरण कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी संवाद


सर्व प्रौढ लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केल्याबद्दल, पंतप्रधानांकडून गोव्याचे कौतूक

या प्रसंगानिमित्त पंतप्रधानांकडून मनोहर पर्रीकर यांच्या कार्याचेही  स्मरण

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मूलमंत्रानुरूप गोवा सरकारचे उत्तम कार्य:पंतप्रधान

माझ्या आयुष्यात आजवर अनेक वाढदिवस आलेत, मात्र मी त्याविषयी अलिप्त असायचो, मात्र, काल, देशात अडीच  कोटी लोकांचे लसीकरण होणे ही माझ्यासाठी अत्यंत हृद्य घटना : पंतप्रधान

काल प्रति तास 15 लाख लसी, एका मिनिटाला 26 हजारांहून अधिक लसी आणि दर सेकंदाला 425 लसी दिल्या गेल्या : पंतप्रधान

‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ संकल्पनेला मूर्त स्वरुप देणारे गोव्यातील प्रत्येक यश माझ्यासाठी अत्यंत आनंददायी : पंतप्रधान

गोवा केवळ देशातील एक राज्य नाही; तर ‘ब्रँड इंडिया’ चा एक आश्वासक चेहरा : पंतप्रधान

Posted On: 18 SEP 2021 12:40PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील कोविड लसीकरण मोहिम कार्यक्रमात, आरोग्य कर्मचारी आणि आणि लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. गोव्यात प्रौढ लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद

या संवादादरम्यान पंतप्रधानांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील व्याख्याते डॉ. नीतीन धूपदाले यांना त्यांनी लोकांमध्ये कोविड प्रतिबंधक लसी घेण्यासाठी कशा प्रकारे विश्वास निर्माण केला असे विचारले. त्यांनी कोविड लसीकरण मोहीम आणि यापूर्वीच्या मोहीमांमध्ये असलेला फरक याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली. डॉ. धूपदाले यांनी या विशिष्ट मोहिमेची प्रशंसा केली. 2.5 कोटी लोकांचे लसीकरण झाल्यावर लसी घेतलेल्या लोकांच्या प्रतिक्रियांऐवजी विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया व्यक्त झाल्याबाबत पंतप्रधानांनी आश्चर्य व्यक्त करत विरोधकांवर टीका केली. गोव्यामधील प्रौढ व्यक्तींचे पहिल्या मात्रेचे 100 टक्के लसीकरण पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी डॉक्टर आणि कोरोना योद्ध्यांची प्रशंसा केली. संपूर्ण जगासाठी हे प्रेरणादायी कार्य आहे, असे ते म्हणाले.

कोविड लाभार्थ्यांशी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी नझीर शेख यांच्याकडून त्यांनी लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले याची माहिती घेतली. लोकांना लसीकरण केंद्रांवर घेऊन जाताना कोणत्या अडचणी आल्या असे त्यांनी विचारले. त्यांनी नझीर यांच्याकडे लसीकरण मोहिमेच्या अनुभवाबाबतही विचारणा केली. नझीर शेख यांच्यासारख्यांनी केलेल्या सबका प्रयासच्या समावेशामुळे अशा प्रकारचे परिणाम साध्य करण्यामध्ये मोठी भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. देशभरातील सामाजिक कार्यकर्त्यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

स्वीमा फर्नांडिस यांच्याशी संवाद साधताना फर्नांडिस यांना त्या लसीकरणासाठी आलेल्या लोकांना कोणते प्रश्न विचारत असे पंतप्रधानांनी विचारले. यावेळी फर्नांडिस यांनी त्यांना शीत साखळी टिकवण्याच्या टप्प्यांची माहिती दिली. पंतप्रधानांनी देखील त्यांनी शीत साखळी कशा प्रकारे टिकवली याची माहिती विचारली. लसी वाया जाऊ नयेत म्हणून कोणती पावले उचलली जात आहेत, याची माहिती देखील त्यांनी घेतली. आपल्या कुटुंबियांची जबाबदारी असताना देखील त्या बजावत असलेल्या कर्तव्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली आणि कोरोना योद्ध्याच्या सर्व कुटुंबियांचे आभार मानले.

श्री शशिकांत भगत यांच्याशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी काल त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या जुन्या परिचितांशी कसा संवाद साधला याची आठवण करुन दिली. जेव्हा त्यांच्या वयाबद्दल विचारण्यात आले तेव्हा पंतप्रधान म्हणाले 'अभी 30 बाकी है' असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी 75 वर्षीय श्री भगत यांना 75 वर्षांचा विचार करू नका, तर पुढील 25 वर्षांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असा सल्ला दिला. त्यांनी लसीकरणादरम्यान काही अडचणी येतात का याबाबत विचारणा केली. श्री भगत यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या प्राथमिकतेबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी लसींच्या दुष्परिणामांबाबतची भीतीही फेटाळली. त्यांना स्वतःला मधुमेह आहे आणि त्यांना लसीकरणानंतर कोणत्याही दुष्परिणामांचा सामना करावा लागला नाही.

निवृत्त विक्रीकर अधिकारी श्री भगत यांच्या सामाजिक सेवेबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले, कर आकारणीच्या क्षेत्राच्या अनुषंगाने राहणीमान सुलभ करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी सुश्री स्वीटी एस एम वेंगुर्लेकर यांना विचारले की त्यांनी दुर्गम भागात टिक्का उत्सव कसा आयोजित केला? त्यांनी उत्सवाच्या आयोजनाबद्दलही विचारले. महामारीच्या काळात नागरिकांसाठी शक्य तितके व्यवहार सोपे व्हावेत यावर लक्ष केंद्रित केले यावर पंतप्रधानांनी यावर जोर दिला. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या कामाचे, त्यातील साहित्याचे योग्य दस्तऐवजीकरण आणि प्रचार करण्यास सांगितले.

पंतप्रधानांनी दृष्टिहीन लाभार्थी सुमेरा खान यांना  लसीकरणाच्या अनुभवाबद्दल विचारले.  पंतप्रधानांनी श्रीमती खान यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील यशाबद्दल त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या आयएएस अधिकारी होण्याच्या आकांक्षांसाठी शुभेच्छा दिल्या. श्री मोदींनी देशातील दिव्यांग नागरिकांना प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

 

पंतप्रधानांचे भाषण

गोव्याच्या नागरिकांनी पवित्र गणेशोत्सवादरम्यान, अनंत सूत्र म्हणजेच लस संरक्षण घेतल्याबद्दल, यावेळी पंतप्रधानांनी सर्व नागरिकांचे कौतूक केले. गोव्यातील प्रत्येक लाभार्थी नागरिकाला लसीची किमान एक मात्रा मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. कोरोनाविरुद्धच्या लढाईतले हे एक मोठे यश आहे. एक भारत-श्रेष्ठ भारत ची संकल्पना प्रत्यक्षात साकार करणारी गोव्याची प्रत्येक उपलब्धी माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे. असे पंतप्रधान म्हणाले.

या विशेष यशाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकर्तृत्वाचेही  स्मरण केले.

गेल्या काही महिन्यात, गोव्याने अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि पूरासारख्या भीषण नैसर्गिक संकटांचा धैर्याने सामना केला, असे पंतप्रधान म्हणाले. या नैसर्गिक आपत्तींच्या काळातही कोविड लसीकरणाचा वेग कायम ठेवल्याबद्दल त्यांनी सर्व आरोग्य कर्मचारी आणि इतर चमूचे कौतूक केले.

सामाजिक आणि भौगोलिक आव्हानांचा सामना करतांना गोव्याने ज्या प्रकारचा समतोल साधला आहे, त्याचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली. राज्याच्या अत्यंत दुर्गम भागात असलेल्या कानाकोना या उपविभागातही, लसीकरणाचा वेग तेवढाच होता, हे इतर सर्व राज्यांसाठी आदर्श उदाहरण ठरावे, असे पंतप्रधान म्हणाले. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राची परिणामकारक अंमलबजावणी गोव्यात होतांना दिसते आहे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या आयुष्यात आजवर अनेक वाढदिवस आले आणि गेले, मी प्रत्येक वेळी त्यापासून अलिप्त राहिलो. मात्र, कालचा दिवस माझ्यासाठी अत्यंत हृद्य ठरला, अशी भावूक प्रतिक्रिया पंतप्रधानांनी यावेळी दिली. देशभरातील कोरोना योद्ध्यांमुळे, त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे,कालचा प्रसंग अत्यंत विशेष ठरला. एका दिवसांत अडीच कोटी लोकांचे लसीकरण करण्यासाठी, सर्व चमूने दाखवलेला विशेष दयाभाव, सेवाभावी वृत्ती आणि कर्तव्याची जाणीव, याचे पंतप्रधानांनी कौतूक केले. या सेवाकार्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीने अत्यंत सकारात्मकतेने पूर्ण सहकार्य केले, या सगळ्याचा परिणाम म्हणूनच आपण 2.5 कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट एका दिवसात साध्य करु शकलो, असे अत्यंत भावनिक झालेले पंतप्रधान यावेळी म्हणाले.

वैद्यकीय क्षेत्रातील लोक, विशेषतः जे गेल्या दोन वर्षांपासून आपल्या जीवाची, इतर कशाचीही पर्वा न करता, लोकसेवेत गुंतले आहेत, कोरोनाशी लढा देण्यात लोकांना मदत करत आहेत, ज्यांनी एका दिवसांत लसीकरणाचे एवढे मोठे उद्दिष्ट साध्य केले, अशा सर्वांचे पंतप्रधानांनी कौतूक केले. हे एक सेवाकार्यच आहे. त्यांच्या करुणा आणि सेवाभावामुळेच देशाला एवढे मोठे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत झाली, असे ते म्हणाले. हिमाचल प्रदेश, गोवा, चंडीगढ आणि लक्षद्वीप इथे लसीची पहिली मात्रा  पात्र लाभार्थ्यांना देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के साध्य झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सिक्कीम, अंदमान निकोबार, केरळ, लद्दाख, उत्तरा खंड आणि दादरा-नगर हवेली इथे लवकरच हे उद्दिष्ट पूर्ण केले जातील, असेही ते म्हणाले.

भारताने आपल्या लसीकरण मोहिमेत, पर्यटन क्षेत्रांना प्राधान्य दिले आहे, मात्र याविषयी आधी विशेष काही बोलले गेले नाही. आपली पर्यटन क्षेत्रे लवकरात पुन्हा सुरु होणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारने, अलीकडेच, परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचे त्यांनी सांगितले. भारतात येणाऱ्या पहिल्या पांच लाख पर्यटकांना निःशुल्क व्हीसा, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना सरकारी हमीसह 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, तसेच नोंदणीकृत पर्यटन गाईड म्हणून काम करणाऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

डबल इंजिन म्हणजेच केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने, गोवा पर्यटन क्षेत्राला अधिकाधिक मजबूत आणि गतिमान करण्याचे उद्दिष्ट जोरकसपणे पूर्ण होत आहे. तसेच या राज्यातील शेतकरी आणि  मच्छीमारांना अधिक सुविधाही मिळत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. मोपा ग्रीनफील्ड विमानतळ आणि सहा पदरी महामार्ग यासाठी 12 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्यातील दळणवळण सुविधा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने, उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या झुआरी पूलाचे काही महिन्यांपूर्वीच उद्घाटन झाल्याने, या भागातली दळणवळण यंत्रणा सुधारली आहे, असे त्यांनी सांगितले.

गोवा राज्याने स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षातस्वयंपूर्ण गोवा म्हणून राज्य उभारणीचा संकल्प इथल्या नागरिकांनी केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी काम आणि उत्पादनही सुरु केले आहे. शौचालय बांधणी, घरोघरी वीजपुरवठा आणि आता घरोघरी नळाने पाणी पोचवण्याच्या मोहिमेतही गोव्याचे योगदान लक्षणीय होते, असा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आतापर्यंत गेल्या दोन वर्षात पांच कोटी लोकांपर्यंत नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. या मोहिमेसाठी गोवा सरकारने घेतलेले परिश्रम, सुप्रशासनाला आणि लोकांची आयुष्य सुखकर करण्याला त्यांनी दिलेले प्राधान्य दर्शवणारे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गरिबांना अन्नधान्य देण्यात, मोफत गॅस सिलेंडर प्रवठा, किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड, स्वनिधी अशा सर्व योजना आणि उपक्रमांची कोविड काळातही, गोव्यात झालेली प्रभावी अंमलबजावणी  कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा हे अमर्याद संधींचे राज्य असल्याचे सांगत, पंतप्रधान म्हणाले, की गोवा हे केवळ देशातील एक राज्य नाही, तर ब्रॅंड इंडियाचा एक आश्वासक चेहरा आहे.

 

***

S.Tupe/Ra.Aghor/S.Patil/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1756039) Visitor Counter : 249