युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला टोकियो पॅरालिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार
पॅरालिम्पिक खेळांचे नवीन युग सुरू झाले आहे; सरकारी मदत 2024 आणि 2028 मध्ये पदक कमाईचे लक्ष्य पूर्ण करेल: श्री अनुराग ठाकूर
पॅरालिम्पिकपटूंच्या विलक्षण कामगिरीमुळे देशातील खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे: क्रीडा मंत्री
Posted On:
08 SEP 2021 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2021
ठळक मुद्दे :
- केंद्रीय कायदा मंत्री श्री किरेन रिजिजू आणि युवक कल्याण आणि क्रीडा राज्य मंत्री श्री निसिथ प्रामाणिक हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
- भारताच्या पॅरा खेळाडूंनी टोकियो येथे झालेल्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये 5 सुवर्ण आणि 8 रौप्यसह ऐतिहासिक 19 पदके जिंकली.
केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी टोकियो येथे पॅरालिम्पिक खेळांमध्ये 5 सुवर्ण आणि 8 रौप्यसह ऐतिहासिक 19 पदके जिंकणाऱ्या भारताच्या पॅरा खेळाडूंचा सत्कार केला. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू आणि युवक कल्याण आणि क्रीडा राज्य मंत्री निसीथ प्रामाणिक यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. क्रीडा विभागाचे सचिव रवी मित्तल, युवक कल्याण विभागाच्या सचिव उषा शर्मा आणि मंत्रालयातील इतर अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात अनुराग ठाकूर यांनी सर्व पॅरा खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि म्हणाले, "मला 2016 पॅरालिम्पिक आठवते, जेव्हा भारतीय चमू केवळ 19 जणांचा होता, तर यावर्षी देशाने तब्बल 19 पदके जिंकली आहेत! तुम्ही आम्हाला दाखवले आहे की मानवी चैतन्य सर्वांत शक्तिशाली आहे! आमच्या पदकांची संख्या सुमारे पाच पटींनी वाढली आहे. आम्ही प्रथमच टेबल टेनिसमध्ये पदके जिंकली आहेत, तिरंदाजीमध्ये अनेक पदके जिंकली आहेत, प्रथमच कॅनोइंग आणि पॉवरलिफ्टिंगमध्ये सहभाग घेतला. आम्ही दोन विश्वविक्रमांची बरोबरी केली आणि आम्ही आणखी विक्रम तोडले. भारताच्या पॅरालिम्पिकपटूंनी सर्वाधिक पदक कमाई केली.”
श्री ठाकूर पुढे म्हणाले, "आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या सरकारी दृष्टिकोनाने एक बदल घडवून आणला आहे. सरकार भारताच्या पॅरालिम्पियन्सना सुविधा आणि निधीसह पाठिंबा देत राहील जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करू शकतील. आम्ही अधिक प्रोत्साहन देऊ इच्छितो. आमच्या पॅरालिम्पियन्ससाठी प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्पर्धा याना आम्ही प्रोत्साहन देऊ जेणेकरून ते नियमितपणे स्पर्धा करू शकतील आणि त्यांचे कौशल्य वाढवू शकतील." ते पुढे म्हणाले, "सरकार भारताच्या पॅरालिम्पिकपटूंना सुविधा आणि निधीसह पाठिंबा देत राहील जेणेकरून पॅरा खेळाडू 2024 आणि 2028 ऑलिम्पिकमध्ये आणखी पदके मिळवू शकतील. सर्व पॅरा खेळाडू लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजनेचा (TOPS) भाग आहेत आणि ही योजना पुढे नेऊन या योजनेअंतर्गत खेळाडूंना अधिक पाठिंबा देण्यासाठी अधिक बळकट केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक भारताच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा हा एक भाग आहे."
श्री ठाकूर असेही म्हणाले की, खेळाडूंच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे देशातील पॅरा - क्रीडा प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. सरकारने जागतिक दर्जाच्या सुविधा सुनिश्चित केल्या आहेत आणि जेव्हा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी स्वतः खेळाडूंशी बोलतात आणि त्यांना प्रोत्साहित करतात; खरे तर गेल्या वेळी पंतप्रधानांनी पॅरा-खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांशी सुमारे दोन तास संवाद साधला. याचा प्रभाव समाजातील प्रत्येक घटकावर पडतो, मग ती वैयक्तिक असो, कॉर्पोरेट, क्रीडा संघटना असो किंवा इतर कोणतीही संस्था असो.
केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री श्री रिजिजू यांनी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आणि म्हणाले कि तुम्ही भारताची मान उंचावली आहे. टोकियोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सर्व पॅरा खेळाडू हे आमचे नायक आहेत. तुम्ही सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात. जर तुम्ही स्वप्न पाहण्याचे धाडस केले तर सर्वकाही शक्य आहे हे तुम्ही दाखवून दिले आहे,” असेही ते पुढे म्हणाले. श्री रिजिजू यांनी पुनरुच्चार केला की प्रत्येक खेळाडूची कथा प्रेरणादायी असते. जेव्हा खेळाडूंना नायक मानले जाते तेव्हा देशातील क्रीडा संस्कृती तयार होते. मी म्हणू शकतो की क्रीडा संस्कृती अखेर भारतात आली आहे आणि पंतप्रधानांनी या परिवर्तनशील बदलाचे नेतृत्व केले आहे, असे श्री किरेन रिजिजू म्हणाले.
गेल्या पॅरालिम्पिकमध्ये सरकारी मदतीमुळे प्रेरित झाल्याचे बहुतेक खेळाडूंनी सांगितल्याचे गौरवोद्गार युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री श्री प्रामाणिक यांनी काढले. पंतप्रधानांचा व्हिडिओ संवाद आणि पदके जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडूला केलेला फोन यामुळे त्यांना खरोखरच प्रोत्साहन मिळाले,” असेही ते म्हणाले.
भारताच्या पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्ष दीपा मलिक यांनी दिव्यांग खेळाडूंना समाजात समाविष्ट करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची आणि उपक्रमांची प्रशंसा केली. TOPS अंतर्गत पॅरा खेळाडूंना दिलेल्या पाठिंब्याने इतिहास रचला आणि आज प्रत्येकजण पॅरा खेळाडूंच्या यशाबद्दल कौतुक करत आहे, असेही त्या म्हणाल्या. दीपा यांनी टोकियो ऑलिम्पिकमधील महिला खेळाडूंचे वाढते प्रतिनिधित्व आणि त्यांना मिळालेल्या पदकांवर विशेषत्वाने प्रकाश टाकला.
टोकियो 2020 मध्ये, भारताने 19 पदके जिंकली, टोकियो 2020 मध्ये स्पर्धा करणाऱ्या 162 राष्ट्रांमध्ये एकूण पदकतालिकेत 24वे स्थान मिळवले आणि जिंकलेल्या एकूण पदकांच्या आधारावर 20 व्या क्रमांकावर राहिला. भारताने 1968 मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत पदार्पण केल्यापासून 2016 पर्यंत केवळ 12 पदके जिंकली होती.
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1753307)
Visitor Counter : 262
Read this release in:
Urdu
,
English
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam