आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे क्षयरोग मुक्त भारताचे स्वप्न 2025 पर्यंत पूर्ण होणार


क्षयरोगाविरुद्ध सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सुविधांचा आढावा घेण्यासाठी मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांसोबत उच्चस्तरीय बैठक

क्षयरोगाविरुद्धचा लढा लोकचळवळ आणि लोकउपक्रम व्हावा- मनसुख मांडवीय

Posted On: 02 SEP 2021 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2021

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री आणि प्रधान सचिव/ अतिरिक्त मुख्य सचिव यांची क्षयरोग निर्मूलनविषयक प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार याही या बैठकीला उपस्थित होत्या. केंद्र सरकार, राज्यांच्या सहकार्याने, क्षयरोगाविरुद्ध एकत्रित आणि विशिष्ट उद्दिष्टप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सर्व राज्यांचे मंत्री या बैठकीला उपस्थित होते.

क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी  सुरु असलेल्या प्रयत्नांविषयी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत आनंद व्यक्त केला. तसेच, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या राज्यात याबद्दल सुरु असलेल्या पद्धती आणि उपक्रमांची माहिती एकमेकांना द्यावी, जेणेकरुन सर्व राज्यात उत्तम उपक्रम राबवले जाऊ शकतील, असा सल्लाही आरोग्यमंत्र्यांनी दिला.

एकत्रित आणि परस्पर समन्वय साधून केलेले प्रयत्न आपले उद्दिष्ट लवकरात लवकर साध्य करण्यात नक्कीच लाभदायक ठरतील. असे मनसुख मांडवीय यावेळी म्हणाले.

क्षयरोग निर्मूलनासाठीच्या अभियानात मदत करु शकतील, अशा लोकांना आपण प्रोत्साहन द्यायला हवे. हे अभियान आपल्याला जनउपक्रम म्हणून राबवायचे आहे. असेही ते पुढे म्हणाले.याबाबत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून येणाऱ्या सर्व सूचनांचे केंद्र सरकार कायमच स्वागत करेल, आपण सर्वांनी मिळून पंतप्रधानांचे क्षयमुक्त भारताचे स्वप्न 2025 पर्यंत पूर्ण करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय आरोग्य मंत्रालयाचे इतर उपक्रम आणि  कोविडच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाबाबतही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सूचना द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

क्षयरोग निर्मूलन चळवळीच्या कामात कोविड संसर्गामुळे असलेले धोके लक्षात घेऊन, त्यांनी कोविड लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे निर्देश दिले. याच संदर्भात, त्यांनी  राज्यांना भाजीविक्रेते, इतर किरकोळ विक्रेते आणि हातगाडीवाले अशा व्यावसायिकांसाठी स्वतंत्र  लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवण्याचे निर्देश दिले.

यावेळी बोलतांना संघराज्य सहकार्याच्या तत्वाचा उल्लेख करत, राज्यमंत्री डॉ भारती पवार म्हणाल्या  की येत्या तीन वर्षात क्षयरोगाचे देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी आपले प्रयत्न कित्येक पटीने वाढवण्याची गरज आहे. कोविड महामारीच्या काळात देखील या अभियानाअंतर्गत राबवलेले उपक्रम- जसे की कोविड आणि क्षयरोगाचे बाय-डायरेक्शनल स्क्रीनिंग, क्षयरोगाची औषधे रुग्णांना घरपोच पोचवणे यांचा उल्लेख केला. जन जन को जगाना है, टिबी को हराना है अशी घोषणा देत,आरोग्य विभागाच्या संपूर्ण चमूने या मोहिमेत एकत्रित आणि पूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.  

या वेळी सर्व राज्यातील या मोहिमेची अंमलबजावणी करणाऱ्या पथकांनी आपापल्या भागातील उपाययोजनांची माहिती दिली आणि उद्दिष्टप्राप्तीसाठीच्या पुढच्या योजनाही सांगितल्या.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

 

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1751403) Visitor Counter : 366