पंतप्रधान कार्यालय
श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभूपादजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते विशेष नाण्याचे अनावरण
श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद जी एक महान देशभक्त होते: पंतप्रधान
भारतातील योग आणि आयुर्वेदाच्या ज्ञानाचा संपूर्ण जगाला लाभ करुन देणे हा आमचा संकल्प : पंतप्रधान
भक्तिसंप्रदायाच्या सामाजिक चळवळीचा कालखंड वगळून भारताच्या स्थिती आणि स्वरूपाची कल्पना करणे अशक्य
श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद जी यांनी भक्ति वेदांताला जगाच्या चेतनेशी जोडण्याचे काम केले
Posted On:
01 SEP 2021 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2021
श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून एका विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक विभाग, पर्यटन आणि ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी यांच्यासह इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कालच आपण सर्वांनी कृष्णजन्माष्टमी साजरी केली आणि आज, श्रील प्रभूपाद जी यांची 125 वी जयंती आहे, हा सुखद योगायोग असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हा योग म्हणजे आनंद आणि साधनेचे सुख यांचा एकत्र लाभ होण्यासारखे आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात, हा जयंतीउत्सव साजरा होण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.आज जगभरातील कृष्ण भक्त आणि श्रील प्रभूपाद स्वामी यांच्या अनुयायांच्या मनात हीच भावना आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
प्रभूपाद स्वामी एक अलौकिक कृष्णभक्त तर होतेच, त्याशिवाय, ते भारत देशाचेही निस्सीम भक्त होते, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ते सहभागी झाले होते. असहकार चळवळीला पाठिंबा म्हणून त्यांनी स्कॉटिश कॉलेजमधून मिळणारी पदविका नाकारली होती, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
भारताचे योगशास्त्राचे ज्ञान आणि शाश्वत जीवनशैली जगभर पसरली आहे, आयुर्वेद शास्त्रालाही जगभर मान्यता मिळाली आहे. या सर्व ज्ञानाचा लाभ संपूर्ण जगाला करुन देण्याचा आपला संकल्प आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले आपण कधीही जेव्हा एखाद्या दुसऱ्या देशामध्ये जातो, आणि जेव्हा `हरे कृष्णा` म्हणणारे लोक तेथे आपल्याला भेटतात, तेव्हा आपल्याला आपलेपणाची भावना जाणवते आणि निश्चितच अभिमान वाटतो. जेव्हा मेक इन इंडिया उत्पादनांना अगदी अशीच समान आत्मीयता मिळेल तेव्हादेखील मनात अशाच प्रकारची भावना येते, असे पंतप्रधान म्हणाले. या संदर्भात आपण इस्कॉनकडून बरेच काही शिकू शकतो.
पंतप्रधान म्हणाले की, गुलामगिरीच्या काळात भक्ती या एकाच भावनेने भारतातील चैतन्य जिवंत ठेवले. ते म्हणाले की, आज विद्वान असे मानतात की, भक्ती काळातील सामाजिक क्रांती झाली नसती तर भारताची स्थिती आणि स्वरूप यांची कल्पना करणे देखील कठीण झाले असते. श्रद्धा, विविध सामाजिक गट आणि त्यांचे विशेषाधिकार यांचा दुजाभाव काढून भक्तीने जिवाला परमेश्वराशी जोडले आहे. अगदी या कठीण अशा काळात देखील, चैतन्य महाप्रभू यांच्यासारखे संत, ज्यांनी समाजाला भक्तीतील चैतन्यभावाने एकत्र बांधून ठेवले आहे आणि त्यांनी समाजाला `श्रद्धा ते विश्वास` असा एक मंत्र देखील दिला आहे.
पंतप्रधान म्हणाले, एकेकाळी वेदांताला पश्चिमेकडे घेऊन जाणारे स्वामी विवेकानंदांसारखे ज्ञानी होते, तर जेव्हा जगाला भक्ती योग देण्याची वेळ आली तेव्हा श्रील प्रभुपाद आणि इस्कॉनने हे महान कार्य हाती घेतले. त्यांनी भक्ती वेदांताला जगाच्या चैतन्याशी जोडले, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले आज इथे शेकडो इस्कॉन मंदिरे आणि अनेक गुरुकुल जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय संस्कृती जिवंत ठेवीत आहेत. इस्कॉनने जगाला सांगितले आहे की, भारतासाठी विश्वास म्हणजे आस्था, उत्साह, चैतन्य, आनंद आणि मानवतेवरील विश्वास आहे. मोदी यांनी कच्छमधील भूकंप, उत्तराखंडमध्ये घडलेली दुर्घटना आणि बंगालमधील चक्रीवादळे या दरम्यान इस्कॉनकडून झालेले सेवा कार्य प्रकर्षाने नमूद केले. महामारीच्या काळात इस्कॉनने घेतलेल्या प्रयत्नांचे देखील पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केले.
* * *
M.Chopade/Radhika/Seema/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751174)
Visitor Counter : 307
Read this release in:
Hindi
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam