पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान येत्या 10 ऑगस्ट रोजी उज्ज्वला 2.0 योजनेला प्रारंभ करणार

Posted On: 08 AUG 2021 6:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी,10 ऑगस्ट, 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता उत्तर प्रदेशातील महोबा येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, एलपीजी कनेक्शन देऊन उज्ज्वला 2.0 (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- पीएमयूवाय)योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला  प्रारंभ करणार आहेत. या  कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत तसेच राष्ट्राला संबोधितही करणार आहेत.

उज्ज्वला योजना  1.0 (पहिला टप्पा) ते उज्ज्वला 2.0 (दुसरा टप्पा) प्रवास

2016 मध्ये सुरू झालेल्या उज्ज्वला 1.0 (पहिल्या टप्प्यात) योजनेदरम्यान, दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 5 कोटी महिला सदस्यांना एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानंतर, एप्रिल 2018 मध्ये या योजनेचा विस्तार करत आणखी सात श्रेणींमधील (अनुसूचित जाती/जमाती/प्रधानमंत्री आवास योजना, अंत्योदय अन्न योजना, सर्वाधिक मागासवर्गीय, चहाच्या मळ्यांतील, आदिवासी, बेटांवरील महिला) अशा महिला लाभार्थींचा यात समावेश करण्यात आला. तसेच, 8 कोटी एलपीजी जोडणीचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. हे उद्दिष्ट निर्धारीत तारखेच्या सात महिने अगोदर ऑगस्ट 2019 मध्येच साध्य झाले.

आर्थिक वर्ष 21-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त एक कोटी एलपीजी जोडणीची तरतूद जाहीर करण्यात आली. ही एक कोटी अतिरिक्त कनेक्शन्स पीएमयूवायच्या आधीच्या टप्प्यात जे समाविष्ट होऊ शकले नाहीत अशा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना (उज्ज्वला 2.0 अंतर्गत)  डिपॉझिट-मुक्त एलपीजी जोडणी देण्याच्या उद्देशाने देण्यात आली.

विनामूल्य एलपीजी जोडणीसोबत, उज्ज्वला 2.0 लाभार्थ्यांना प्रथम रिफिल आणि हॉटप्लेट मोफत दिली जाईल. तसेच, नावनोंदणी प्रक्रियेसाठी कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असेल. उज्ज्वला 2.0 मध्ये, स्थलांतरीतांना रेशन कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. 'कौटुंबिक घोषणा' आणि 'पत्त्याचा पुरावा' या दोन्हीसाठी स्व-प्रतिज्ञापत्र पुरेसे आहे. उज्ज्वला 2.0 ही योजना, पंतप्रधानांचे एलपीजी कनेक्शनच्या सार्वत्रिक वापराच्या संधीचे स्वप्न साकार करण्यात मदत करेल.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित रहाणार आहेत.

 

S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1743835) Visitor Counter : 1223