पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे भारतासाठी विशेष व्यापार दूत टोनी ॲबॉट यांच्यात बैठक

Posted On: 05 AUG 2021 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान  टोनी ॲबॉट यांची भेट घेतली. ते  2-6 ऑगस्ट 2021 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर असून ऑस्ट्रेलियाच्या  पंतप्रधानांचे विशेष व्यापार दूत म्हणून आले आहेत.

दोन्ही नेत्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया व्यापक धोरणात्मक भागीदारीची  पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उपायांवर  चर्चा केली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातले  वाढलेले आर्थिक सहकार्य दोन्ही देशांना कोविड -19 महामारीमुळे उद्‌भवलेल्या  आर्थिक आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यास मदत करेल आणि त्यांना एक स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध हिंद -प्रशांत क्षेत्राचे सामायिक स्वप्न  साकारण्यास मदत करेल यावर त्यांनी भर दिला.

अलिकडच्या काळात भारत-ऑस्ट्रेलिया संबंध वृद्धिंगत झाल्याबद्दल  पंतप्रधान मोदींनी समाधान व्यक्त केले आणि या प्रवासात पंतप्रधान मॉरिसन आणि माजी पंतप्रधान ॲबॉट यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी गेल्या वर्षी पंतप्रधान मॉरिसन यांच्यासोबत झालेल्या आभासी शिखर परिषदेची आठवण सांगितली आणि परिस्थिती सुधारल्यावर भारतात पंतप्रधान मॉरिसन यांचे स्वागत करण्याच्या आपल्या इच्छेचा पुनरुच्चार केला.

4 जून 2020 रोजी पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात झालेल्या लीडर व्हर्च्युअल शिखर परिषदेत, द्विपक्षीय संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्यात  आले होते. या अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी परस्पर फायद्यासाठी विस्तारित व्यापार आणि गुंतवणूकीच्या प्रवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध राहून द्विपक्षीय व्यापक आर्थिक सहकार्य करारात (सीईसीए) पुन्हा सामील होण्याचा निर्णय घेतला होता. टोनी ॲबॉट यांची सध्याची भेट या सामायिक महत्त्वाकांक्षेचे प्रतिबिंब आहे.

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1742925) Visitor Counter : 237