पंतप्रधान कार्यालय

टॉयकेथॉन -2021 मध्ये सहभागी झालेल्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद


टॉयोकोनॉमी मध्ये मजबूत पाय रोवण्याचे केले आवाहन

गरजू लोकांपर्यंत विकास पोहोचवण्यात खेळणी क्षेत्राचे महत्व केले अधोरेखित

स्थानिक खेळण्यांसाठी ‘व्होकल फॉर लोकल’ मंत्र आचरणात आणण्याची गरज - पंतप्रधान

भारताच्या क्षमता, कला, संस्कृती आणि समाज याविषयी जाणून घेण्यासाठी जग उत्सुक, खेळणी यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात - पंतप्रधान

डिजिटल गेमिंगमध्ये भारताकडे मोठी क्षमता – पंतप्रधान

भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे ही खेळणी उद्योगामधल्या कारागीर आणि नवोन्मेशी यांच्यासाठी मोठी संधी – पंतप्रधान

Posted On: 24 JUN 2021 2:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जून 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टॉयकेथॉन -2021 मध्ये सहभागी झालेल्यांशी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि संजय धोत्रे यावेळी उपस्थित होते.

गेल्या 5-6 वर्षात देशातला युवावर्ग हॅकेथोनच्या मंचाद्वारे देशातल्या महत्वाच्या आव्हानांशी जोडला गेला आहे.  देशाच्या क्षमता संघटित करून त्यांना माध्यम उपलब्ध करून देणे हा यामागचा विचार असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले.

बालकांचा पहिला मित्र या महत्वाबरोबरच खेळण्यांच्या आणि गेमिंगच्या आर्थिक पैलूवर भर देत पंतप्रधानांनी त्याला टॉयोकोनॉमी असे संबोधले. खेळण्यांची जागतिक बाजारपेठ सुमारे 100 अब्ज डॉलर्सची आहे मात्र या बाजारपेठेत भारताचा वाटा केवळ 1.5 टक्केच आहे. भारत जवळजवळ 80 टक्के खेळणी आयात करतो. म्हणजेच यासाठी कोट्यवधी रुपये देशाबाहेर जातात असे सांगून या परिस्थितीत बदल घडवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. गरजू लोकांपर्यंत विकास पोहोचवण्याची क्षमता या क्षेत्राकडे असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.   खेळणी क्षेत्राचा स्वतःचा लघु उद्योग असून यामध्ये ग्रामीण कारागीर, दलित, गरीब आणि आदिवासी वर्ग समाविष्ट आहे. या क्षेत्रातले महिलांचे योगदान त्यांनी स्पष्ट केले. या क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी स्थानिक खेळण्यांना पसंती देत त्यांचा प्रचार करायला हवा अर्थात व्होकल फॉर लोकल चा आग्रह धरायला हवा असे पंतप्रधान म्हणाले. जागतिक स्तरावर भारतीय खेळणी स्पर्धात्मक रहावीत याकरिता कल्पकता आणि वित्त पुरवठा यासाठी नवे मॉडेल आणण्याचे आवाहन त्यांनी केले. नव कल्पना रुजवायला हव्यात, नव्या स्टार्ट अप्सना प्रोत्साहन, पारंपारिक खेळणी तयार करणाऱ्यांकडे नवे तंत्रज्ञान पोहोचवणे आणि नवी मागणी निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. टॉयकेथॉन सारख्या कार्यक्रमामागे हाच विचार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 

स्वस्त डाटा आणि इंटरनेटची व्यापकता वाढल्यामुळे ग्रामीण कनेक्टीव्हिटी वाढली असून भारतात आभासी, डिजिटल आणि ऑनलाईन गेमिंगच्या शक्यतांचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बाजारात उपलब्ध असणारे बरेचसे ऑनलाईन आणि डिजिटल गेम भारतीय संकल्पनांवर आधारी नसतात याबद्दल खंत व्यक्त करत यापाकी बरेच गेम हिंसा आणि मानसिक तणावाला निमंत्रण देत असल्याचे ते म्हणाले. भारताच्या क्षमता, कला आणि संस्कृती आणि समाज याविषयी जाणून घेण्यासाठी जग उत्सुक असल्याचे सांगून यामध्ये खेळणी क्षेत्र मोठी भूमिका बजावू शकते असे पंतप्रधान म्हणाले. डिजिटल गेमिंग साठी  भारताकडे मोठा आशय आणि क्षमता आहे. भारताच्या क्षमता आणि कल्पना यांचे यथार्थ दर्शन जगाला घडवण्यासाठी युवा नवोन्मेशी आणि स्टार्ट अप्सनी आपली  जबाबदारी जाणावी असे आवाहन त्यांनी केले.

 

भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे ही खेळणी उद्योगामधल्या कारागीर आणि नवोन्मेशी यांच्यासाठी मोठी संधी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आपले स्वातंत्र्य सैनिक, शोर्य आणि नेतृत्वाचे अनेक प्रसंग गेमिंगसाठी संकल्पना निर्माण करू शकतात. या नवोन्मेशीची जनतेला भविष्याशी जोडण्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. मनोरंजन आणि  शिक्षण यांचा संगम असणारे मनोरंजक गेम निर्माण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

 

* * *

S.Tupe/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730010) Visitor Counter : 277