गृह मंत्रालय

कोविड-19 महामारीमुळे भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांचा भारतीय व्हिसा अथवा निवासाचा पूर्वनिश्चित कालावधी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वैध आहे असे मानले जाणार

Posted On: 04 JUN 2021 5:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जून 2021

 

मार्च 2020 पासून सुरु झालेल्या कोविड-19 महामारीच्या प्रसारामुळे, व्यावसायिक विमानांची सामान्य परिचालन सेवा उपलब्ध नसल्याकारणाने मार्च 2020 पूर्वी वैध भारतीय व्हिसावर भारतात आलेले अनेक परदेशी नागरिक भारतात अडकून पडले आहेत. अशा परदेशी नागरिकांना टाळेबंदीच्या काळात  त्यांच्या व्हिसाची मुदत वाढविण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने 29 जून 2021 रोजी यासंदर्भात एक आदेश जारी केला. या आदेशानुसार, ज्या परदेशी नागरिकांचा भारतीय व्हिसा किंवा भारतातील निवासासाठीचा पूर्वनिश्चित कालावधी 30 जून 2021 नंतर संपत असेल तर तो आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे परिचालन सुरु झाल्या दिवसानंतर आणखी 30 दिवसांसाठी वैध आहे असे मानण्यात येईल. मात्र, असे परदेशी नागरिक त्यांच्या व्हिसाची मुदत अथवा निवासाचा पूर्वनिश्चित कालावधी मासिक तत्वावर वाढविण्यासाठी अर्ज करीत आहेत.

व्यावसायिक विमानांचे सामान्य परिचालन अजूनही पूर्ववत झालेले नाही हे बघता केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने ह्या विषयावर पुनर्विचार केला आणि त्यानुसार असा निर्णय घेण्यात आला की भारतात अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांचा भारतीय व्हिसा किंवा निवासाचा पूर्वनिश्चित कालावधी आता 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वैध मानण्यात येईल. तसेच सरकारकडून ही मुदतवाढ मोफत केली जाणार असून यासाठी त्या नागरीकांना कोणतेही वाढीव शुल्क किंवा अधिक काळ निवास केल्याबद्दलचा दंड आकारला जाणार नाही. या परदेशी नागरिकांनी व्हिसाच्या मुदतवाढीशी संबंधित परदेशीय नोंदणी कार्यालय अथवा परदेशीय प्रादेशिक नोंदणी कार्यालयात कोणताही अर्ज सादर करण्याची गरज नाही.

या नागरिकांना भारत सोडून जाताना परदेशीय नोंदणी कार्यालय अथवा परदेशीय प्रादेशिक नोंदणी कार्यालयात निर्गमन परवानगीसाठी अर्ज करता येतील आणि कोणतेही वाढीव शुल्क किंवा अधिक काळ निवास केल्याबद्दलचा दंड न आकारता त्यांना ही परवानगी मोफत दिली जाईल.

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1724437) Visitor Counter : 263