आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याविषयी अद्यतन माहिती


कोविन डिजिटल मंचामध्ये नवे सुरक्षाविषयक वैशिष्ट्य अंतर्भूत करण्यात आले

ऑनलाईन नोंदणी तसेच वेळ निश्चिती प्रक्रियेतील त्रुटी कमी करण्यासाठी 8 मे 2021 पासून “चार अंकी सुरक्षा कोड” च्या वापराची सुरुवात

Posted On: 07 MAY 2021 4:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2021

 

देशातील काही नागरिकांनी कोविन पोर्टलच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठीची दिवस, वेळ निश्चित केली होती मात्र ठरलेल्या दिवशी ते प्रत्यक्ष लस घेण्यासाठी गेलेच नाहीत, तरीही त्यांनी ठरलेल्या दिवशी लस घेतली आहे असा लघुसंदेश  त्यांच्या मोबाईलवर आला असे निदर्शनास आले आहे.याबाबतीतल्या परीक्षणाअंती असे दिसून आले की लसीकरण करणाऱ्यांनी त्या नागरिकांनी लस घेतली आहे अशी चुकीची माहिती संगणक प्रणालीत नोंदली होती, म्हणजेच यात  लसीकरण करणाऱ्या संस्थेच्या माहिती भरण्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या.

अशा त्रुटी कमी करण्यासाठी आणि त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी, कोविन प्रणालीमध्ये 8 मे 2021पासून  चार अंकी सुरक्षा कोड असलेल्या नव्या वैशिष्ट्याचा समावेश करण्यात येणार आहे. आता, नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या सत्यपडताळणी नंतर जर लाभार्थी लस घेण्यास पात्र आहे असे निश्चित झाले तर लसीची मात्रा द्यायच्या आधी पडताळणी करणारा किंवा लसीकरण करणारा कर्मचारी लाभार्थ्याला त्याचा किंवा तिचा चार अंकी सुरक्षा कोड विचारेल आणि हा कोड कोविन प्रणालीत नोंदल्यानंतरच लसीकरणाच्या योग्य स्थितीची प्रणालीत नोंद होईल.

लसीकरणाच्या दिवस-वेळ निश्चितीसाठी ज्या नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे फक्त अशाच नागरिकांनाच हे नवीन वैशिष्ट्य वापरण्यास मिळेल. हा चार अंकी सुरक्षा कोड ऑनलाईन नोंदणीनंतर मिळणाऱ्या पावतीवर छापलेला असेल आणि लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्याला तो कोड माहित नसेल. लसीकरणासाठी दिवस-वेळ निश्चितीसाठी यशस्वीपणे  नोंदणी केल्यावर लाभार्थी नागरिकाला येणाऱ्या पुष्टीकरण संदेशात देखील हा चार अंकी सुरक्षा कोड दिलेला असेल. ऑनलाईन नोंदणीनंतर मिळणारी पावती मोबाईलमध्ये सुरक्षित करून ठेवता येईल आणि लसीकरणाच्या वेळी हा कोड बघता येईल.

या नव्या सोयीमुळे, ज्या नागरिकांनी लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे, त्यांच्या लसीकरणाच्या स्थितीची माहिती संगणक प्रणालीत योग्य रीतीने नोंदली जाईल आणि या नागरिकांनी ज्या केंद्रावर लस घेण्यासाठी नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर लस घेतली असेल फक्त अशाच नागरिकांसाठी चार अंकी सुरक्षा कोडची सुविधा कार्यान्वित होईल. या नव्या वैशिष्ट्यामुळे, तोतयेगिरी करून फसवणुकीने लस घेण्याची आणि कोविन पोर्टलमध्ये पुरविण्यात आलेल्या काही सुविधांचा गैरवापरहोण्याची शक्यता कमी होईल.

नागरिकांसाठी सूचना

  • लसीकरणासाठी येताना नागरिकांनी त्यांच्या ऑनलाईन नोंदणीची पावती (डिजिटल अथवा प्रत्यक्ष प्रत) स्वतःसोबत आणावी तसेच ज्या मोबाईलवर नोंदणीचा पुष्टीकरण संदेश प्राप्त झाला आहे असा नोंदणीकृत मोबाईल देखील आणावा. जेणेकरून लसीकरण नोंदणी प्रक्रिया सुलभरीत्या पूर्ण करण्यासाठी चार अंकी सुरक्षा कोड उपलब्ध असेल.
  • हा चार अंकी कोड पडताळणी करणाऱ्या किंवा लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्याला लसीची मात्रा देण्यापूर्वी सादर करावा. लसीची मात्रा दिल्यानंतर लसीकरण प्रमाणपत्र जारी होत असल्यामुळे या नियमाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
  • लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्याला हा चार अंकी सुरक्षा कोड सांगणे अनिवार्य आहे कारण लसीकरणासंबंधीची माहिती त्या कोडसह भरल्यानंतरच डिजिटल स्वरूपातील लसीकरण प्रमाणपत्र जारी होणार आहे.
  • ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर नागरिकांना पुष्टीकरण संदेश प्राप्त होणे अपेक्षित आहे. लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाली असून डिजिटल स्वरुपात प्रमाणपत्र जारी झाले आहे याचा हा पुष्टीकरण संदेश निदर्शक आहे. जर कोणाला हा पुष्टीकरण संदेश मिळाला नाही तर त्यांनी त्वरित लसीकरण कर्मचारी किंवा लसीकरण केंद्र प्रमुखांना संपर्क करावा.

 

 Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1716817) Visitor Counter : 360