पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

Posted On: 07 MAY 2021 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

भारताच्या कोविडच्या दुसऱ्या लाटेविरुद्धच्या लढ्यात, ऑस्ट्रेलिया सरकार आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी तातडीने आणि दानशूरपणे केलेया मदतीबद्दल पंतप्रधानांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.

कोविडसाठी आवश्यक ती औषधे आणि लसी सर्व देशांना माफक दरात आणि समानतेने सहजपणे उपलब्ध व्हायला हव्यात या मुद्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. जागतिक आरोग्य संघटनेकडे भारत आणि दक्षिण अफिकेने ट्रिप्स करारातील-म्हणजेच बौध्दिक संपदा अधिकारातील व्यापार तरतुदी तात्पुरत्या शिथिल करण्याबाबत मांडलेल्या प्रस्तावाला ऑस्ट्रेलियानेही समर्थन द्यावे अशी विनंती यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केली.

भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान 4 जून 2020 मध्ये झालेल्या आभासी शिखर परिषदेनंतर दोन्ही देशातील सर्वसमावेशक राजनैतिक भागीदारीच्या प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला. तसेच दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ करणे आणि लोकांमधील परस्पर संपर्क वाढवण्यावर यावेळी दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी भर दिला.

दोन्ही नेत्यांनी यावेळी काही प्रादेशिक मुद्यांवरही चर्चा केली, मुक्त, स्वायत्त आणि सर्वसमावेशक भारत-प्रशांत महासागर प्रदेशात नियमांवर-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था प्रस्थापित करण्याचे महत्वही या चर्चेत  अधोरेखित करण्यात आले.

 

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716795) Visitor Counter : 196