पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी घेतली कोविड परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक


एक राष्ट्र म्हणून काम केले तर संसाधनांची कमतरता भासणार नाही : पंतप्रधान

प्राणवायू वाहतूकीचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे व हवाईदलाची मदत घेतली जात आहे : पंतप्रधान

महत्वाची औषधे व इंजेक्शन्सची साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी राज्यांनी कडक कारवाई करावी : पंतप्रधानांची सर्व राज्यांना विनंती

केंद्राकडून राज्यांना लसींच्या 15 कोटींपेक्षा जास्त मात्रांचा विनाशुल्क पुरवठा : पंतप्रधान

रुग्णालयांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष नको : पंतप्रधान

लोकांकडून निष्कारण खरेदीची घाई केली जाऊ नये म्हणून जागरूकता वाढवावी : पंतप्रधान

Posted On: 23 APR 2021 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 एप्रिल 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19च्या परिस्थिती संदर्भात, ज्या राज्यांमध्ये सध्या सर्वाधिक कोविड बाधित आहेत ती 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांची एक उच्चस्तरीय बैठक झाली.

विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण अनेक राज्यांमध्ये त्याचप्रमाणे श्रेणी -2 आणि श्रेणी -3 शहरांमध्येही दिसून येत आहे हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी या महामारीशी एकत्रित शक्तीनिशी लढण्याचे आवाहन केले. महामारीच्या पहिल्या लाटेवर भारताने मात केली, याच्या मुळाशी मुख्यत्वे  आपले एकत्रित प्रयत्न आणि सहयोगी धोरण होते असे सांगून ते म्हणाले की सध्याच्या आव्हानांना त्याच पद्धतीने तोंड देणे आवश्यक आहे.

या लढाईत राज्यांना केंद्राचे संपूर्ण पाठबळ आहे ही खात्री पंतप्रधान मोदींनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचप्रमाणे राज्यांना वेळोवेळी आवश्यक ते सल्ले या मंत्रालयाकडून दिले जात आहेत असे त्यांनी नमूद केले.

प्राणवायू पुरवठ्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी राज्यांकडून उपस्थित केल्या गेलेल्या मुद्द्यांचा विचार केला आणि प्राणवायूच्या पुरवठ्यात वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.  सर्व संबंधित मंत्रालये व विभाग यावर एकत्रितपणे काम करत आहेत. तातडीच्या मागणीला प्रतिसाद म्हणून औद्योगिक वापरासाठीचा प्राणवायूसुद्धा वैद्यकीय उपचारासाठी पुरवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व राज्यांनी संयुक्तपणे काम करावे तसेच औषधे आणि ऑक्सिजन याबाबतच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एकमेकांशी संपर्कात रहावे अशी विनंती पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना केली. प्राणवायू व औषधांची साठेबाजी  तसेच काळाबाजार यावर नियंत्रण ठेवण्याची विनंतीही त्यांनी राज्यांना केली. कोणत्याही राज्यासाठी पाठवला गेलेला प्राणवायूचा टँकर कुठल्याही प्रकारे थांबवला वा अडविला जाणार नाही याची याची खबरदारी प्रत्येक राज्याने घ्यावी असेही पंतप्रधानांनी सूचित केले. राज्यांमधील विविध रुग्णालयांपर्यंत प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी उच्चस्तरीय संपर्क समिती स्थापन करावी अशी सूचना राज्यांना त्यांनी केली. केंद्राकडून प्राणवायूचे वाटप झाल्यानंतर राज्यामधील विविध रुग्णालयांना त्यांच्या गरजेनुसार तातडीने प्राणवायू पुरवठा करण्यासंदर्भातील निर्णय ही समिती घेऊ शकेल. काल आपल्या अध्यक्षतेखाली प्राणवायू पुरवठादारांसोबत एक बैठक झाली आणि आजही प्राणवायूचा पुरवठा वाढवण्यासाठीच्या सर्व उपाययोजनांच्या संदर्भात एक  बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी राज्यांना दिली.

प्राणवायू पुरवठा करणाऱ्या वाहनांना लागत असणारा प्रवासासाठीचा काळ त्याचप्रमाणे संपूर्ण प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी व्हावा याकरीता शक्य त्या सर्व पर्यायांवर केंद्र सरकार काम करत आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. याच कारणासाठी रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेस सुरू केली आहे, त्याचप्रमाणे किमान एका बाजूचा वेळ वाचवण्यासाठी रिक्त प्राणवायू टॅंकरची वाहतूक हवाई दलाच्या सहाय्याने केली जात आहे.

संसाधने अद्ययावत करण्यासोबत आपण नैदानिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे असे पंतप्रधानांनी सुचवले. सार्वत्रिक नैदानिक चाचण्या केल्या तर बाधितांना ताबडतोब मदत मिळू शकेल यावर पंतप्रधानांनी भर दिला.

या परिस्थितीतसुद्धा आपला लसीकरण कार्यक्रम कुठेही मंदावता  कामा नये अशी सूचना पंतप्रधानांनी केली. जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारताने हाती घेतलेला आहे याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी आत्तापर्यंत 15 कोटींपेक्षा  जास्त लसींचा मात्रा राज्यांना केंद्र सरकारकडून विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. पंचेचाळीस वर्षाहून जास्त वयाच्या सर्व नागरिकांना तसेच आरोग्य सेवक आणि आघाडीवरच्या कर्मचाऱ्यांना विनाशुल्क लसीकरण उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने मोहीम हाती घेतली आहे; ती तशीच पुढे सुरू राहील असे आश्वासनही त्यांनी दिले. 1 मे पासून अठरा वर्षे व त्याहून जास्त वय असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी लस उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी आपल्याला युद्धपातळीवर काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोविड रुग्णांवर उपचारासाठी सर्व वैद्यकीय उपाय अवलंबण्याबरोबरच रुग्णालयांची सुरक्षा हीसुद्धा अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी नमूद केले.  प्राणवायुची गळती किंवा रुग्णालयातील आग अशासारख्या नुकत्याच घडलेल्या दुर्घटनांबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधान मोदी म्हणाले की रुग्णालयांच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा नियमांच्या पालनाबद्दल जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊन निष्कारण खरेदी करत सुटू नये यासाठी प्रशासनाने  योग्य ती खबरदारी घेत राहण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांनी या महामारीच्या दुसऱ्या लाटेला आपण थोपवू शकू अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीपूर्वी  नीती आयोगाचे सदस्य डॉ .व्ही. के. पॉल यांनी संसर्गाची नवीन लाट थोपवण्यासंदर्भात केले जात असलेले प्रयत्न अधोरेखित करणारे प्रेझेंटेशन दिले. वैद्यकीय सोयीसुविधा वाढवणे तसेच रुग्णांना विशिष्ट औषध उपचार देणे यासंबंधीचा आराखडा त्यांनी सादर केला. मूलभूत औषधोपचार सुविधा, त्यासाठीची पथके  आणि पुरवठा, वैद्यकीय व्यवस्थापन, विलगीकरण, लसीकरण आणि सामुदायिक प्रयत्न याबद्दल त्यांनी माहिती दिली.

या संवादादरम्यान, सध्याच्या कोविड लाटेला थोपवण्यासाठी संबंधित राज्यांमध्ये जी पावले उचलली जात आहेत त्याबद्दल संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना अवगत केले. पंतप्रधानांकडून मिळालेल्या सूचना तसेच निती आयोगाकडून मिळालेला आराखडा यामुळे आपल्याला नियोजन परिपूर्ण करण्यासाठी मदत होईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 

* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713592) Visitor Counter : 380