पंतप्रधान कार्यालय

भारत-सेशेल्स उच्चस्तरीय दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या (8 एप्रिल, 2021) कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 08 APR 2021 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2021

 

राष्ट्राध्यक्ष, रिपब्लिक ऑफ सेशेल्स

माननिय वेव्हेल रामकलावान जी,

मान्यवर आमंत्रित,

नमस्कार,

आरंभी, मी राष्ट्राध्यक्ष रामकलावान जी यांना हार्दिक शुभेच्छा प्रदान करतो. ते भारताचे सुपुत्र असून, बिहारमधील गोपालगंज येथे त्यांची मुळे रुजलेली आहेत. आज त्यांच्या परसौनी या गावातीलच नव्हे तर भारतातील प्रत्येक नागरिकाला त्यांचा यशाचा अभिमान वाटतो आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून झालेली त्यांची  निवड त्यांच्या सार्वजनिक सेवेप्रति समर्पणावर सेशेल्सच्या नागरिकांनी दाखवलेला विश्वास सिद्ध करते.

मित्रहो,

मला माझी 2015 मध्ये सेशेल्सला दिलेली भेट आठवते आहे. भारतीय उपसागर विभागातील देशांच्या दौऱ्यात हे माझे पहिले मुक्कामाचे ठिकाण होते. सागरी शेजारी असलेल्या भारत आणि सेशेल्समध्ये मजबूत आणि महत्वाची भागीदारी आहे.

भारताच्या  ‘SAGAR’ (विभागीय क्षेत्रातील सर्व राष्ट्रांना संरक्षण व विकास) या दृष्टीकोनाच्या केंद्रस्थानी सेशेल्स आहे. संरक्षण क्षमता विकास आणि पायाभूत सुविधा व विकासात्मक आवश्यकता साधण्याच्या प्रवासात सेशेल्सचा भागीदार असणे ही भारतासाठी सन्मानाची बाब आहे.  आज या संबधातील मैलाचा दगड आपण गाठतो आहोत. आपल्या विकासात्मक भागीदारीत पूर्णत्वाला गेलेल्या अनेक नव्या प्रकल्पांचे आपण एकत्र उद्घाटन करत आहोत.

मित्रहो,

मुक्त, स्वतंत्र आणि कार्यक्षम न्यायव्यवस्था ही सर्वच लोकशाहींसाठी मोलाची बाब आहे. सेशेल्समध्ये नवीन दंडाधिकारी न्यायालय इमारतीच्या बांधणीतील सहभागाबद्दल आम्हाला संतोष वाटतो आहे.  ही अत्याधुनिक इमारत कोविड-19 च्या परिक्षा घेणाऱ्या काळातही पुर्ण झाली. सखोल आणि अतूट मैत्रीचे प्रतिक म्हणून ही इमारत सदैव आठवणीत राहील.

विकासात्मक भागीदारीत भारताने नेहमीच मानवकेंद्री  धोरण ठेवले आहे. याच तत्वाचे प्रतिबिंब आज उद्घाटन होत असलेल्या दहा सार्वजनिक विकासाच्या भव्य प्रकल्पामध्ये दिसून येते. हे प्रकल्प सेशेल्समधील समाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील.

मित्रहो,

सेशेल्सच्या सागरी संरक्षणासाठी भारत कटीबद्ध आहे. आज आम्ही भारतात निर्मित, नवीन अत्याधुनिक, वेगवान, पेट्रोलवर चालणारे जहाज सेशेल्स किनारा संरक्षण दलाकडे सुपूर्द करत आहोत. आपल्या सागरी संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी हे जहाज सेशेल्सला सहकार्य करेल.

हवामानबदल ही बेटांवर वसलेल्या देशांसाठी अतिशय धोकादायक गोष्ट आहे. म्हणूनच सेशेल्समध्ये भारताच्या सहकार्याने उभारलेले एक मेगावॅटहून जास्त शक्तीचे सौर उर्जा प्रकल्प सेशेल्सला सुपूर्द करत आहोत. ‘निसर्गाची काळजी घेत विकास’ ही सेशेल्सची विकासाची प्राथमिकता हे प्रकल्प प्रतिबिंबित करतात.

मित्रहो,

कोविड महामारीशी लढ्यात भारताने सेशेल्सशी उत्तमप्रकारे भागीदारी निभावली. वेळप्रसंगी आम्ही आवश्यक ती औषधे आणि भारतीय लसींच्या 50,000 मात्रा सेशेल्सला पुरवल्या. भारतनिर्मित कोविड-19 ची लस मिळवणारे सेशल्स हे पहिले आफ्रिकन राष्ट्र आहे. महामारीपश्चात आर्थिक उभारीच्या प्रयत्नातही भारत सेशेल्ससोबत पाय रोवून उभा असेल अशी खात्री मी राष्ट्राध्यक्ष रामकलावानजी यांनी देऊ इच्छितो.

मित्रहो,

भारत-सेशेल्स मैत्री ही खऱ्या अर्थाने खास आहे, आणि भारताला या संबधांचा अभिमान आहे. मी राष्ट्राध्यक्ष रामकलावानजी आणि सेशेल्सच्या नागरिकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.

धन्यवाद

सर्वाना खूप धन्यवाद

नमस्ते.

 

* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1710534) Visitor Counter : 182