पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान सुगा योशिहिडे यांच्यादरम्यान दूरध्वनीवरून संवाद

Posted On: 09 MAR 2021 9:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान महामहिम सुगा योशिहिडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

रस्पर विश्वास आणि सामायिक मूल्यांच्या आधारे मागील काही वर्षांत भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीतील सकारात्मक विकासाबाबत उभय नेत्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. कोविड-19 साथीच्या आजाराचा सगळीकडे उद्रेक असताना देखील मागील वर्षभरात झालेल्या द्विपक्षीय देवाणघेवाणीचे त्यांनी कौतुक केले. नुकत्याच, निर्दिष्ट कुशल कामगार (एसएसडब्ल्यू) या क्षेत्रातील भागीदारीसाठीच्या सहकार्य करारावर झालेल्या स्वाक्षऱ्यांचे त्यांनी स्वागत केले आणि लवकरात लवकर याच्या अंमलबजावणीची अपेक्षा केली.

पंतप्रधान मोदींनी मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (एमएएचएसआर) प्रकल्प हा भारत-जपान द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीचे एक महत्वपूर्ण उदाहरण असल्याचे नमूद करत या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्याची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली.

उभय नेत्यांनी यावेळी परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांविषयी मते व्यक्त केली आणि दोन्ही देशांमधील समान आव्हाने सोडविण्यासाठी दोन्ही देशांमधील भागीदारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल यावर सहमती दर्शविली. या संदर्भात, त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या समविचारी देशांसोबत असणाऱ्या संबंधांविषयी केली जाणारी चौफेर सल्लामसलत अत्यंत मोलाची असून ही उपयुक्त चर्चा अशीच सुरु राहिली पाहिजे यावर जोर दिला.

उभय देशांमधील मुत्सद्दी संबंधाना 2022 मध्ये 70 वर्षे पूर्ण होतील असे नमूद करत हा कार्यक्रम योग्य पद्धतीने साजरा करण्याचे उभय नेत्यांनी मान्य केले.

पंतप्रधान सुगा यांनी वार्षिक द्विपक्षीय परिषदेसाठी लवकरात लवकर भारतात यावे असे आमंत्रण यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिले.

 

M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1703640) Visitor Counter : 207