पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुद्दुचेरीमध्ये विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि भूमिपूजन


पुद्दुचेरी म्हणजे विद्वान, कवी आणि क्रांतिकारकांचे वास्तव्यस्थान राहिल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमुळे आर्थिक घडामोडीना अधिक वेग येण्याबरोबरच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार : पंतप्रधान

Posted On: 25 FEB 2021 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराईकल जिल्ह्यातून जाणाऱ्या एनएच 45 – ए च्या चौपदरीकरणाचे, कराईकल नवा परिसर – टप्पा I कराईकल जिल्हा (जेआयपीएमईआर) इथे वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन केले. सागरमाला योजनेअंतर्गत पुद्दुचेरी इथे लघु बंदर विकास आणि पुद्दुचेरी इथल्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातल्या सिंथेटिक अ‍ॅथलेटिक ट्रॅकची पायाभरणी केली.

जवाहरलाल स्नातकोत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था (जेआयपीएमईआर), इथे ब्लड सेंटरचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.  पुद्दुचेरीच्या लॉसपेट येथे 100 खाटांची सुविधा असणाऱ्या महिला खेळाडूंच्या वसतिगृहाचे उद्घाटन त्यांनी केले. पुनर्बांधणी करण्यात आलेल्या हेरिटेज मेरी बिल्डिंगचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.

पुद्दुचेरी म्हणजे विद्वान, कवी आणि क्रांतिकारकांचे वास्तव्यस्थान राहिले असल्याचे सांगून महाकवी सुब्रमण्य भारती आणि श्री अरबिंदो यांचा उल्लेख त्यांनी केला.  पुद्दुचेरी म्हणजे विविधतेचे प्रतिक असल्याचे प्रशंसोद्गार  काढत इथे लोकांची  विविध भाषा, विविध श्रद्धास्थाने आहेत मात्र ते एकतेने आणि एकोप्याने रहात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पुनर्बांधणी करण्यात आलेल्या मेरी इमारतीचे उद्घाटन करताना या इमारतीमुळे प्रोमोनेड सागर किनाऱ्याच्या सौंदर्यात भर पडणार असून अधिक पर्यटक आकृष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एनएच 45–ए च्या चौपदरीकरणामध्ये कराईकल जिल्ह्याचा समावेश असून यामुळे पवित्र शनीस्वरण मंदिरापर्यंत कनेक्टीव्हिटी सुधारणार असून बासीलीका ऑफ अवर लेडी ऑफ गुड हेल्थ आणि नागोर दर्गा इथेही सुलभ कनेक्टीव्हिटी प्राप्त होणार आहे. ग्रामीण आणि किनारी कनेक्टीव्हिटी सुधारण्यासाठी सरकारने अनेक उपाय योजना केल्या असून  कृषी क्षेत्राला याचा लाभ होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कृषिमाल उत्तम बाजारपेठेत आणि वेळेवर पोहोचावा यासाठी सरकार कटीबद्ध असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्तम रस्ते सहाय्यकारक ठरणार आहेत. रस्त्यांच्या चौपदरीकरणामुळे आर्थिक घडामोडीना अधिक वेग येण्याबरोबरच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.

आर्थिक भरभराट ही उत्तम आरोग्याशी संलग्न असल्याने  गेल्या सात वर्षात सरकारने  जनतेची तंदुरुस्ती आणि वेलनेस सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी खेलो इंडिया योजने अंतर्गत 400 मीटर सिंथेटीक अ‍ॅथलेटिक ट्रॅकची पायाभरणी केली. भारतातल्या युवकांच्या क्रीडा कौशल्याची जोपासना यामुळे होणार आहे. उत्तम क्रीडा सुविधा आल्यामुळे पुद्दुचेरीच्या युवकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  क्रीडा स्पर्धात उत्तम कामगिरी करता येईल. लॉसपेट येथे 100 खाटांची सुविधा असणाऱ्या महिला खेळाडूंच्या आज उद्घाटन झालेल्या वसतिगृहामध्ये, हॉकी, व्हॉलीबॉल, भारत्तोलन, कबड्डीपटूची सोय होणार असून त्यांना एसएआय प्रशिक्षणाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

येत्या काळात आरोग्य सेवा महत्वाची भूमिका बजावणार आहेत.सर्वाना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्दिष्टांतर्गत जेआयपीएमईआर इथे ब्लड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामध्ये रक्त साठा दीर्घकाळ राहण्यासाठी आधुनिक सुविधा, स्टेमसेल बँकिंग सुविधांचा समावेश आहे.

आरोग्यसेवा सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला दर्जेदार आरोग्य व्यावसायिकांची आवश्यकता भासणार आहे. कराईकल नव परिसरात वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या पहिल्या टप्याचा प्रकल्प पर्यावरण स्नेही संकुल असून यामध्ये एमबीबीएस विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक आधुनिक सुविधांचा समावेश राहणार आहे.

सागरमाला  प्रकल्पा अंतर्गत पुद्दुचेरी बंदर विकासाची पायाभरणी करताना, हे काम पूर्ण झाल्यानंतर याचा मच्छिमारबांधवाना लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे चेन्नईला आवश्यक सागरी कनेक्टीव्हिटी प्राप्त होणार आहे. पुद्दुचेरी इथल्या मालाची वाहतूक यामुळे सुलभ होणार  असून किनारी शहरामध्ये  प्रवासी वाहतुकीची शक्यता खुली होणार आहे.

थेट लाभ हस्तांतरणाचे  विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींना सहाय्य झाले आहे. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या  विविध शैक्षणिक संस्थामुळे पुद्दुचेरीला समृध्द मनुष्य बळ लाभले आहे. इथे औद्योगिक आणि पर्यटन विकासाची मोठी क्षमता असून  यातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि संधी प्राप्त होतील. पुद्दुचेरीचे लोक प्रतिभावान आहेत,इथली भूमी नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहे असे सांगून पुद्दुचेरी च्या विकासासाठी केंद्र  सरकारकडून सर्वतोपरी सहाय्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

 

* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1700744) Visitor Counter : 205