पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान येत्या 22 फेब्रुवारीला आसाम आणि पश्चिम बंगालचा दौरा करणार
पंतप्रधानांच्या हस्ते महत्वाच्या तेल आणि वायू प्रकल्पांचे लोकार्पण तसेच आसाममधील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभ
पंतप्रधानांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन
Posted On:
20 FEB 2021 4:08PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 22 फेब्रुवारी 2021 रोजी आसाम आणि पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमाराला पंतप्रधान आसाममधील धेमाजी जिल्ह्यातल्या सिलापथार येथे उभारण्यात आलेल्या तेल आणी नैसर्गिक वायू प्रकल्पाचे लोकार्पण करतील. तसेच यावेळी आसाममधील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभही त्यांच्या हस्ते होईल. दुपारी साडे चार वाजता पंतप्रधान पश्चिम बंगालमधील हुगली येथे विविध रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि उद्घाटन करतील.
पंतप्रधानांचे आसाममधील कार्यक्रम :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामधील इंडियन ऑईलच्या बॉन्गाईगांव तेलशुद्धीकरण प्रकल्पातील इंडमैक्स युनिटचे, दिब्रुगढच्या मधुबन येथील ऑईल इंडिया लिमिटेडच्या दुय्यम टँक फार्मचे आणि तीनसुखिया, माकम येथील हेबेदा गावात असलेल्या गैस कॉम्प्रेसर स्टेशनचेही लोकार्पण करतील. सुवालकुची अभियांत्रिकी महाविद्यालयाचे भूमीपूजन करतील. या प्रकल्पांमुळे, भारतात उर्जा क्षमता वाढून सुरक्षा आणि समृद्धी येण्यास मदत होईल. पंतप्रधानांच्या पूर्वोदयाच्या संकल्पनेला अनुसरून पूर्व भारताचा सामाजिक-आर्थिक विकास करण्यासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरतील. आसामचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसेच, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री यावेळी उपस्थित राहतील.
इंडियन ऑईलच्या बॉन्गाईगांव तेलशुद्धीकरण प्रकल्पातील इंडमैक्स प्रकल्पात इंडियन ऑईल-संशोधन आणि विकास विभागाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, यामुळे अतिरिक्त एलपीजी वायूनिर्मिती आणि घनकचऱ्यातून उच्च दर्जाचे एलपीजी आणि हाय ऑक्टेन गैसोलिन मिळू शकेल. या विभागामुळे, तेलशुद्धीकरण प्रकल्पातील कच्चे तेल प्रकियेचा वार्षिक वेग 2.35 दशलक्ष मेट्रिक टन पासून 2.7 दशलक्ष मेट्रिक टन पर्यंत वाढेल. या प्रकल्पामुळे एलपीजी चे उत्पादन 50 टीएमटी (हजार मेट्रिक टन) वरुन 257 टीएमटी पर्यंत वाढेल आणि वाहनातील पेट्रोलचे उत्पादन 210 टीएमटीवरुन 533 टीएमटी पर्यंत वाढेल.
ऑईल इंडिया लिमिटेडचा दुय्यम टँक फार्म 40, 000 किलो लिटर्स कच्च्या तेलाच्या सुरक्षित साठ्यासाठी बांधण्यात आला असून ओल्या कच्च्या तेलापासून पाणी वेगळे करण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकेल. 490 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या प्रकल्पात 10,000 किलो लिटर्सची कार्यक्षमता असलेला निर्जलीकरण विभागही असेल.
तिनसुखियाच्या माकूम येथील गैस कॉम्प्रेसर स्टेशनमुळे भारताची कच्चे तेल निर्मिती क्षमता सुमारे 16500 मेट्रिक टन/वर्ष एवढी वाढेल. 132 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या प्रकल्पात, 3 कमी दाबाचे कॉम्प्रेसर्स आणि तीन उच्च दाबाचे लिफ्टर कॉम्प्रेसर्स आहेत.
धेमाजी अभियांत्रिकी महाविद्यालाय 276 बिघा जमिनीवर बांधण्यात आले असून त्यासाठी 45 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. हे राज्यातील सातवे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालाय असून यात सिव्हील, मेकॅनिकल आणि कॉम्पुटर सायन्सचे अभियांत्रिकी चे अभ्यासक्रम असतील. सुवालकुची अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पायाभरणी कार्यक्रमही होणार असून ते महाविद्यालय 55 कोटी रुपये खर्चून 116 बिघा जमिनीवर बांधले जाणार आहे.
पंतप्रधानांचे पश्चिम बंगालमधील कार्यक्रम :
पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये नोआपरा ते दक्षिणेश्वर दरम्यान मेट्रो रेल्वेच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन करतील आणि या मार्गावरील पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. 4.1 किमी च्या विस्तारीकरणासाठी 464 कोटी रुपयांचा खर्च आला असून ती संपूर्ण खर्च केंद्र सरकारने वहन केला आहे. या मेट्रोमुळे रस्त्यांवरची वाहतूककोंडी कमी होऊन, नागरी वाहतुकीत सुधारणा होईल. तसेच या विस्तारित मार्गावरुन, कालीघाट आणि दक्षिणेश्वर येथील जगप्रसिद्ध काली मंदिराकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा निर्माण होईल. या मार्गावरच्या बारानगर आणि दक्षिणेश्वर या स्थानकांवर अत्याधुनिक प्रवास सुविधा असून अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांची रचना करण्यात आली आहे.
त्याशिवाय, कलाईकुंड आणि झारग्राम या दरम्यानच्या 30 किमी मार्गाचे आणि दक्षिण-पूर्व रेल्वेच्या खरगपूर-आदित्यपूर दरम्यानच्या 132 किमी च्या तिसऱ्या रेल्वेमार्गाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्त होईल.या प्रकल्पासाठी 1312 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मार्गावरील चार स्थानकांचे आधुनिकीकरण, सहा नवे पादचारी पूल आणि 11 नवे फलाट बांधण्यात आले असून जुन्या पायाभूत सुविधांची दुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची सोय होईल तसेच हावडा-मुंबई रेल्वेमार्गावरील प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक सोपी होईल.
हावडा- बांदेल- अजीमगंज मार्गावरील अजीमगंज-खारग्राघाट रोड स्टेशन दरम्यानच्या मार्गाचेही पंतप्रधान लोकार्पण करतील. 240 कोटी रुपये खर्चून हा मार्ग बांधण्यात आला आहे.
दान्कुनी आणि बारुईपारा (11.28 किमी) या हावडा-वर्धमान कॉर्ड लाईनचे आणि रासूलपूर-मगरा दरम्यानच्या हावडा-वर्धमान मेन लाईनवरील तिसऱ्या मार्गाचे लोकार्पणही पंतप्रधान करतील. या मार्गासाठी 759 कोटी रुपयांचा खर्च येणार असून, दान्कुनी ते बारुईपारा मार्गासाठी 195 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
या प्रकल्पांमुळे रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ होईल तसेच प्रवाशांचा वेळ वाचेल शिवाय त्यांना सुरक्षित प्रवास करता येईल. तसेच या प्रदेशातील आर्थिक विकासाच्या दृष्टीनेही हे प्रकल्प महत्वाचे आहेत.
***
S.Tupe/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699635)
Visitor Counter : 201
Read this release in:
Odia
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam