पंतप्रधान कार्यालय

केरळमध्ये 19 फेब्रुवारीला वीज आणि शहरी क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि शिलान्यास

Posted On: 17 FEB 2021 10:21PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 4:30 वाजता केरळमधील वीज आणि शहरी क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन आणि शिलान्यास करतील. केरळच्या  मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

 

पुगलूर त्रिशूर वीज ट्रान्समिशन प्रकल्प

पंतप्रधान 320 केव्ही क्षमतेच्या पुगलूर (तमिळनाडू) त्रिशूर (केरळ) वीज ट्रान्समिशन प्रकल्पाचे उद्घाटन करतील. हा व्होल्टेज सोर्स कन्व्हर्टर (व्हीएससी) आधारित हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट (एचव्हीडीसी) प्रकल्प आहे आणि अत्याधुनिक व्हीएससी तंत्रज्ञान असलेला हा भारताची पहिली एचव्हीडीसी लिंक आहे. 5070 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

 

कासारगोड सौर उर्जा प्रकल्प

पंतप्रधान 50 मेगावॅट क्षमतेच्या कासारगोड सौर उर्जा प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियानांतर्गत हा प्रकल्प विकसित केला आहे.

 

एकात्मिक परिचालन व नियंत्रण केंद्र

पंतप्रधान तिरुअनंतपुरम येथे एकात्मिक परिचालन व नियंत्रण केंद्राची पायाभरणी करतील. 94 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा हा प्रकल्प तिरुअनंतपुरम महानगरपालिकेसाठी अद्ययावत उपाययोजना अंतर्गत केला जात असून आपत्कालीन परिस्थितीत समन्वित कृती सुलभ करण्यासाठी सामान्य केंद्र म्हणून काम करेल.

 

स्मार्ट रस्ते प्रकल्प

पंतप्रधान तिरुअनंतपुरममध्ये स्मार्ट रोड प्रकल्पांची पायाभरणी करतील. या प्रकल्पासाठी अंदाजे 427 कोटी रुपये खर्च होणार असून तिरुअनंतपुरमधील सध्याचे 37 किलोमीटर लांबीचे रस्ते जागतिक दर्जाचे करण्यात येतील.

 

अरुविक्कारा येथे जलशुद्धीकरण प्रकल्प

अमृत मिशन अंतर्गत अरुविक्कारा येथे उभारण्यात आलेल्या 75 एमएलडी (दररोज दशलक्ष लिटर) क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. यामुळे तिरुवनंतपुरममधील लोकांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होईल आणि अरुविक्कारामधील विद्यमान जलशुद्धीकरण प्रकल्पाचे दुरुस्तीचे काम सुरु असताना देखील शहराला पिण्याच्या पाण्याचा अखंडित पुरवठा होण्यास मदत होईल.

***

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1698885) Visitor Counter : 183