आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी लसीकरणाबाबत संकोच आणि चुकीची माहिती खोडून काढण्यासाठी आयईसी मोहिमेचा प्रारंभ केला

“या खोटेपणाला विराम देऊया”

लोकांना सत्याचे अनुसरण करण्याचे आणि विश्वासार्ह स्त्रोतांकडून अचूक माहिती मिळवण्याचे केले आवाहन

Posted On: 21 JAN 2021 4:54PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल यांच्या उपस्थितीत देशातील लोकसंख्येच्या काही घटकांमध्ये लसीबाबत उद्भवत असलेला संकोच दूर करण्यासाठी आय.ई.सी. पोस्टर्सचे अनावरण केले.

 

 

 

कोविड -19 विरूद्ध जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात पंतप्रधानांनी 16 जानेवारी 2021 रोजी सुरू केली. 21 जानेवारी 2021 पर्यंत सकाळी  7  वाजेपर्यंत 8 लाखांहून अधिक आरोग्यसेवकांना लस देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्वांना देशाच्या कामगिरीची आठवण करून दिली. ते म्हणाले, कोविड -19 चा प्रसार थोपवणाऱ्या आणि त्याचवेळी कोविड प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. देशाला महामारीपासून मुक्त करण्यासाठी वैयक्तिकपणे लक्ष देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाचे त्यांनी आभार मानले. आज, देशात सक्रिय रुग्णांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.

रोग निर्मूलनात लसीकरणाची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की  पोलिओ आणि देवी या रोगांचे निर्मूलन मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे शक्य झाले. एकदा लसीकरण केल्यावर, त्या व्यक्तीला रोगाचा प्रादुर्भाव होत  नाही तसेच ती इतरांनाही संसर्ग पोहचवू शकत नाही.

डॉ हर्ष वर्धन यांनी प्रत्येकाला असत्य आणि चुकीची  माहिती देणाऱ्या मोहिमेचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले. हा खोटेपणा थांबवूया, असे त्यांनी ठासून सांगितले. आरोग्य मंत्रालय, पत्र सूचना कार्यालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, मायगव्ह संकेतस्थळ यांसारख्या विश्वसनीय आणि अस्सल स्त्रोतांकडून लोकांना योग्य माहिती घेण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. सत्यात ताकद आहे आणि त्याचा विजय होईल याचा पुनरुच्चार त्यांनी केला आणि सर्वांना सत्याचा प्रसार करण्यासाठी आयईसीची पत्रके सामायिक करण्यासाठी प्रोत्साहित केले

या लसींच्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेबद्दल ते म्हणाले, सर्व नामांकित रुग्णालयांतील प्रख्यात डॉक्टरांनी ही लस घेतली आणि ते परिणामकारक असल्याबद्दल लसीकरण मोहिमेची  प्रशंसा केली. लोकांमध्ये अफवा पसरविण्यात आणि लसीबाबत संकोच निर्माण करण्यास इच्छुक असे काही राजकीय स्वार्थी लोक आहेत. विरोधाभास म्हणजे जगातील देश आपल्याकडे लस मागत आहेत तर आपलेच काही लोक राजकीय हेतूंसाठी चुकीची माहिती आणि संदेह वाढवत आहेत.

 

अश्विनी कुमार चौबे म्हणाले की, कोविड विरूद्ध लसीकरण मोहिमेस अंतिम प्रहारअसे संबोधतांना ते म्हणाले की, लवकरात लवकर लस देण्याचा भारताने क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. त्यांनी प्रत्येकाला चुकीच्या मोहिमेचे अनुसरण करु नका तर योग्य माहिती सामायिक करुन सर्वांना मदत करण्याचे आवाहन केले.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि बीएमजीएफ, युनिसेफ आणि डब्ल्यूएचओ सारख्या विकास भागीदारांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला व्हर्च्युअली उपस्थित होते.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1690889) Visitor Counter : 2833