पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान येत्या 23 जानेवारीला आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार


कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीवर्षानिमित्त आयोजित ‘पराक्रम दिवस’ या विशेष समारंभात पंतप्रधान संबोधित करणार

आसामच्या शिवसागर येथे एक लाखांपेक्षा अधिक भूमी पट्ट्यांचे पंतप्रधानांच्या हस्ते वितरण

Posted On: 21 JAN 2021 4:28PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 जानेवारी 2021 रोजी कोलकात्याला जाणार असून, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीवर्षानिमित्त होणाऱ्या पराक्रम दिवसाच्या विशेष कार्यक्रमात ते आपले विचार मांडतील. तसेच, पंतप्रधान त्यानंतर, आसाममधील जीरांगा पठार या ठिकाणीही भेट देणार असून तिथे एक लाख सहा हजार भूमी पट्ट्यांचे वाटप लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते केले जाईल.

 

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान

कोलकाता इथल्या व्हिक्टोरिया मेमोरियल येथे होणाऱ्या पराक्रम दिवसाच्याउद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवतील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अदम्य साहसी कार्य आणि देशासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेचा सन्मान करण्यासाठी, त्यांची 23 जानेवारीला असलेली जयंती दरवर्षी पराक्रम दिवसम्हणून साजरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दिवसापासून लोकांना विशेषतः युवकांना प्रेरणा मिळून तेही, नेताजींसारखीच अडचणींवर, संकटातून मार्ग काढण्याची प्रेरणा या युवकांना मिळावी आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जाणार आहे.

यावेळी नेताजींच्या जीवनकार्याचा परिचय देणाऱ्या कायमस्वरूपी प्रदर्शन आणि दृक श्राव्य शोचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. तसेच नेताजींच्या स्मरणार्थ पंतप्रधान एक विशेष नाणे आणि टपाल तिकीटाचेही अनावरण करतील. नेताजींच्या आयुष्यावर आधारित आम्रा नुतोन जौबोनेरी दूतहा सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी सादर केला जाईल.

या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान कोलकात्याच्या राष्ट्रीय वाचनालयाला देखील भेट देतील. याठिकाणी, एकविसाव्या शतकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वारशाला पुनर्भेट या विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. त्याशिवाय, कलाकारांचे एक शिबीरही तिथे होणार आहे. पंतप्रधान यावेळी कार्यक्रमातील मान्यवर आणि कलाकारांशी संवाद साधतील.

 

पंतप्रधानांचा आसामदौरा

त्याआधी पंतप्रधानाच्या हस्ते आसाममधील शिवसागर येथे, 1.06 लाख जणांना भूमिपट्टे विरतीत करण्यात येतील. आसामामधील स्थानिकांच्या जमिनीचे रक्षण करण्याची तातडीची गरज लक्षात घेत आसाम सरकारने नवे सुधारित भूमी धोरण आणले, ज्यामुळे स्थानिकांच्या जमिनीच्या हक्काचे रक्षण करण्यावर नव्याने भर देण्यात आला. या स्थानिकांमध्ये सुरक्षित असल्याची भावना निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. 2016 साली झालेल्या जनगणनेनुसार आसाममध्ये 5.75 लाख कुटुंब भूमीहीन होते.  सध्याच्या सरकारने मे 2016 पासून 2.28 लाख भूमीपट्टे दिले आहेत. याच मालिकेत, 23 जानेवारीचा कार्यक्रम या दिशेने आणखी एक पाउल पुढे नेणारा ठरेल.

***

S.Tupe/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690877) Visitor Counter : 137