आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

उद्यापासून सुरु होणाऱ्या देशव्यापी कोविड – 19 लसीकरण मोहिमेच्या सज्जतेचा डॉ हर्ष वर्धन यांनी घेतला आढावा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयामधल्या समर्पित कोविड नियंत्रण कक्षाला दिली भेट


कोविड-19 लसीबाबतच्या अपप्रचाराचे केले निराकरण, स्वदेशात उत्पादित लस प्रभावी असल्याचे सांगून देशाला केले आश्वस्त

Posted On: 15 JAN 2021 8:32PM by PIB Mumbai

 

उद्यापासून सुरु होणाऱ्या देशव्यापी कोविड – 19 लसीकरण मोहिमेच्या सज्जतेचा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज आढावा घेतला.  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्माण भवन इमारतीत उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड नियंत्रण कक्षाला त्यांनी भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारी म्हणजे उद्या सकाळी 10:30 वाजता कोविड-19 लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेच्या पहिल्या टप्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे झेंडा दाखवून सुरवात करतील.  यावेळी देशभरातली राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातली एकूण 3006 लसीकरण केंद्रे दूर दृश्य प्रणालीद्वारे जोडली जातील. प्रत्येक केंद्रावर सुमारे 100 जणांना उद्या लस दिली जाईल. प्राधान्यानुसार लसीकरण मोहीम टप्या टप्याने आखण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा कर्मचाऱ्यांसह सरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यात लस दिली जाईल.

कोविड नियंत्रण कक्षाला दिलेल्या भेटी दरम्यान डॉ हर्ष वर्धन यांनी को विन या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विकसित केलेल्या डिजिटल मंचाच्या प्रत्येक पैलूची बारकाईने पाहणी केली. देशातल्या कोविड लसीकरणासाठी या मंचाचा उपयोग करण्यात येणार आहे.  लसीचा साठा, साठवणुकीसाठीचे तापमान आणि कोविड- 19 लसीच्या लाभार्थ्यांची लसी संदर्भातली माहिती याद्वारे ठेवता येणार आहे. लसीकरणासाठी देशभरातल्या राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर कार्यक्रम व्यवस्थापकांना हा डिजिटल मंच सहाय्य करणार आहे. लाभार्थी, आखण्यात आलेली सत्रे, घेण्यात आलेली सत्रे इत्यादीची माहिती ठेवण्यासाठी हा मंच मदत करणार आहे. लिंग, वय आणि बहु व्याधी यानुसार लाभार्थींच्या माहितीची वर्गवारी करण्यासाठी हा मंच राष्ट्रीय आणि राज्य प्रशासकांना मदत करेल. सॉफटवेअर सुधारणा आणि अतिशय प्रगत को- विन मंचाचा उपयोग करताना लक्षात आलेल्या बाबी यांचा भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात अंगीकार करण्याची सूचना हर्ष वर्धन यांनी केली.

प्राधान्य नसलेल्या  गटातल्या लाभार्थी नोंदणी पानाचा  त्यांनी को- विन मध्ये आढावा घेतला. देशभरातल्या कोविड-19 विषयी जिल्हा निहाय डाटावर देखरेख त्याच बरोबर महामारीच्या स्थितीचे मुल्यांकन करण्यासाठी डाटाचे सखोल विश्लेषण हा समर्पित कोविड नियंत्रण कक्ष करणार आहे.

कम्युनिकेशन नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचीही केंद्रीय मंत्र्यांनी पाहणी केली. कोविड- 19 लसी बाबत अफवा आणि अपप्रचार यावर हा कक्ष बारकाईने लक्ष ठेवणार आहे.

भारतातले कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण हे जगातले सर्वात मोठे लसीकरण अभियान ठरणार असल्याचे डॉ हर्ष वर्धन म्हणाले. देशात निर्मित कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी सुरक्षित असून महामारी रोखण्यासाठी महत्वाचे साधन असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

 

S.Tupe/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688913) Visitor Counter : 161