आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

गेल्या 7 दिवसांपासून भारतात दररोज 20,000 पेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद


मृत्यूच्या संख्येत मोठी घट; गेल्या 20 दिवसांपासून दैनंदिन मृत्यूंची संख्या 300 च्या खाली

22 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी मृत्यू दर

सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या 1.65 कोटी मात्रा वितरित

Posted On: 14 JAN 2021 1:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जानेवारी 2021

 

भारतात दररोज आढळणाऱ्या नवीन कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत घसरणीचा कल कायम आहे. गेल्या 7 दिवसांपासून भारतात दररोज 20,000 पेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24  तासांत, केवळ 16,946 कोविड बाधित रुग्ण आढळले आहेत. तर याच कालावधीत 17,652 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्येत 904 इतकी निव्वळ  घट झाली आहे.

भारतातील दररोज मृत्यू पावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घसरण सुरूच  आहे. गेल्या 20 दिवसांपासून दररोज 300 पेक्षा कमी मृत्यूची नोंद झाली आहे.

भारताचा मृत्यु दर आज 1.44 टक्के आहे. 22 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी मृत्यू दर आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2,13,603 आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी उपचार सुरु असलेल्या रुग्णांचा हिस्सा आणखी कमी होऊन 2.03 टक्के झाला आहे.

25 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5,000 पेक्षा कमी उपचाराधीन रुग्ण आहेत.

भारतात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 10,146,763 आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 96.52 टक्के झाला आहे.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी  82.67 टक्के रुग्ण  10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत.

केरळमध्ये काल एका दिवसात सर्वाधिक 5,158 रुग्ण बरे झाले. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 3,009 रुग्ण बरे झाले, त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 930 रुग्ण बरे झाले.

नवीन रुग्णांपैकी 76.45% रुग्ण सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

केरळमध्ये काल 6,004 इतक्या सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये अनुक्रमे 3,556 आणि 746 नवीन रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24  तासांत 198  मृत्यूंची नोंद झाली आहे.

नवीन मृत्यूंपैकी 75.76 टक्के मृत्यू सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक (70) मृत्यू झाले आहेत. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये काल अनुक्रमे 26 आणि 18 मृत्यू झाले.

16 जानेवारी 2021 पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी देश सज्ज झाला आहे.

कोविड-19 प्रतिबंधक कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींच्या 1.65 कोटी मात्रा सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना  आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या डेटाबेसच्या प्रमाणात वितरित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे  लसीकरण मात्रांच्या वाटपात कोणत्याही राज्याविरूद्ध भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नाही. लसींच्या मात्रांचा हा प्रारंभिक पुरवठा आहे आणि आगामी आठवड्यात त्यात आणखी वाढ होईल.  म्हणूनच, अपुऱ्या पुरवठ्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या शंका  पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत.

राज्यांना 10% राखीव / नासाडी मात्रा आणि दररोज प्रत्येक सत्रात सरासरी 100 जणांचे लसीकरण लक्षात घेऊन लसीकरण सत्र आयोजित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. म्हणून, दररोज प्रत्येक ठिकाणी  अवास्तव संख्येने लसीकरण आयोजन करण्याची घाई कोणत्याही राज्यांनी करू नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

लसीकरण प्रक्रिया स्थिर झाल्यावर आणि पुढे गेल्यावर हळूहळू लसीकरण स्थळांची संख्या वाढवण्याचा सल्ला राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आला आहे.

 

* * *

U.Ujgare/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1688489) Visitor Counter : 275