मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

देशातली एवीयन इन्फ्लूएंजाची स्थिती

Posted On: 08 JAN 2021 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2021
 

हरियाणातल्या पंचकुला जिल्ह्यात दोन कुक्कुटपालन केंद्रात एवीयन इन्फ्लूएंजाचे पॉझीटीव्ह नमुने आढळल्याची आयसीएआर- एनआयएचएसएडी या प्राणी रोग विषयक राष्ट्रीय संस्थेने पुष्टी दिल्यानंतर आणि गुजरातमधल्या जुनागड जिल्ह्यात स्थलांतरित पक्ष्यात आणि राजस्थान मधल्या सवाई माधोपुर, पाली, जैसलमेर आणि मोहर जिल्ह्यात कावळ्यांमध्ये पॉझीटीव्ह नमुने आढळल्याच्या   वृत्ताच्या पार्श्वभूमीवर बाधित राज्यानी एवीयन इन्फ्लूएंजा आटोक्यात आणण्यासाठीच्या कृती आराखड्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना  पशुपालन विभागाने दिल्या आहेत. आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश,हरियाणा आणि गुजरात या सहा राज्यात या रोगाची पुष्टी झाली आहे. केरळमधल्या बाधित दोन्ही जिल्ह्यात कलिंग ऑपरेशन पूर्ण झाल्याचे वृत्त असून निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुरु आहे. 

ज्या राज्यात या रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही अशा राज्यानी पक्ष्यांमध्ये असाधारण मृत्यू आढळल्यास त्यावर लक्ष ठेवावे आणि आवश्यक पावले वेगाने उचलता यावीत यासाठी तातडीने कळवावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

केरळ, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात यासंदर्भात भेट देण्यासाठी केंद्रीय पथके तैनात करण्यात आली आहेत.  

दिल्लीतल्या हस्तसाल व्हिलेजमधल्या डीडीए पार्क मध्ये 16 पक्षांचा असाधारण मृत्यू झाल्याचे समजते. दिल्लीच्या एनसीटीच्या पशुपालन विभागाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या असून नमुने आयसीएआर-एनआयएचएसएडीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.  

कुक्कुट पालक शेतकरी आणि जनता (अंडी आणि चिकनचे ग्राहक) यांच्यात या रोगासंदर्भात जागरूकता अतिशय महत्वाची आहे. अंडी आणि चिकनसंदर्भात ग्राहकांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी पशुपालन विभागाच्या सचिवानी आरोग्य मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. यासंदर्भात अफवांना थारा न राहता ग्राहकांचा विश्वास कायम राहील यासाठी आरोग्य मंत्रालयाने योग्य त्या मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी विनंतीही करण्यात आली आहे. याशिवाय कुक्कुट उत्पादनाच्या सुरक्षिततेसंदर्भात, वापरासाठी सुरक्षित अशा शिजवण्याच्या पद्धती याबाबत   जागरूकता वाढवण्याची विनंतीही राज्यांना करण्यात आली आहे. 

 

* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1687150) Visitor Counter : 242