पंतप्रधान कार्यालय

पश्चिमी मालवाहतूक समर्पित मार्गिकेच्या रेवारी-मदार भागाचे 7 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण


जगातील पहिल्या डबल स्टॅक लॉन्ग हॉल प्रकारच्या आणि विद्युत कर्षणावर चालणाऱ्या 1.5 किमी लांबीच्या कंटेनर गाडीलाही पंतप्रधान दाखवणार हिरवा कंदील

Posted On: 05 JAN 2021 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जानेवारी 2021

 

WDFC अर्थात पश्चिमी मालवाहतूक समर्पित मार्गिकेच्या 306 किमी लांबीच्या रेवारी-मदार दरम्यानच्या भागाचे, येत्या 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्रार्पण होणार आहे. तसेच डबल स्टॅक लॉन्ग हॉल प्रकारच्या 1.5 किमी लांबीच्या, जगातील पहिल्या कंटेनर गाडीलाही पंतप्रधान याच कार्यक्रमात हिरवा कंदील दाखवणार आहेत. विद्युत कर्षणावरील ही गाडी नव अटेली-नव किशनगढ दरम्यान धावणार आहे. राजस्थान आणि हरयाणाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री श्री. पीयूष गोयल यावेळी उपस्थित राहणार आहेत.

 

WDFC चा रेवारी- मदार भाग

पश्चिमी मालवाहतूक समर्पित मार्गिकेचा हा भाग हरियाणा (अंदाजे 79किमी, महेंद्रगड आणि रेवारी जिल्हे) आणि राजस्थान (अंदाजे 227किमी, जयपूर, अजमेर, शिकार, नागौरआणि अलवार जिल्हे) यादरम्यान पसरलेला आहे. यामध्ये नव्याने बांधलेली नऊ मालवाहतूक समर्पित स्थानके समाविष्ट असून त्यापैकी नव डाबला, नव भगेगा आदी सहा क्रॉसिंग स्थानके तर  रेवारी, नव अटेली आणि नव फुलेरा ही तीन जंक्शन स्थानके आहेत.

या पट्ट्याच्या उद्घाटनामुळे राजस्थान आणि हरयाणातील रेवारी, मानेसर, नारनौल, फुलेरा आणि किशनगडमधील विविध उद्योगांना फायदा होईल. तसेच कथुवासमधील काँकॉरच्या कंटेनर आगाराचे अधिक चांगले उपयोजन होऊ शकेल. गुजरातमधील कांडला, पिपावाव, मुन्ध्रा आणि दाहेज ही पश्चिमी बंदरेही विना-अडथळा वाहतुकीसाठी जोडली जातील.

या भागाच्या उद्घाटनाने पश्चिम आणि पूर्वेकडील समर्पित मालवाहतूक मार्गिकांदरम्यानही विना-अडथळा वाहतूक होऊ शकेल. यापूर्वी, 29 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधानांनी पूर्वीय मालवाहतूक समर्पित मार्गिकेच्या नव भौपूर-नव खुर्जा या भागाचे राष्ट्रार्पण केले होते.

 

डबल स्टॅक लॉन्ग हॉल कंटेनर ट्रेन प्रचालन

डबल स्टॅक लॉन्ग हॉल कंटेनर ट्रेन प्रचालन यामध्ये 25 टन इतका वाढीव अक्षीय भार पेलला जाऊ शकेल. DFCCIL करिता याची रचना RDSOच्या वाघिणीच्या विभागाने केली आहे. संबंधित प्रकारच्या वाघिणीच्या नमुन्यांची प्रायोगिक परीक्षणे करून झाली आहेत. या रचनेमुळे क्षमतेचा सर्वाधिक वापर करणे शक्य होणार आहे. या वाघिणींमधून भारतीय रेल्वेच्या सध्याच्या वाहतुकीच्या चौपट कंटेनर वाहून नेले जाऊ शकतात.

आता DFCCIL भारतीय रेल्वेच्या रुळांवरून सध्याच्या 75 किमी प्रति तास ऐवजी 100 किमी प्रति तास इतक्या वेगाने  मालगाड्या चालवेल. तसेच मालगाड्यांचा सरासरी वेगही भारतीय रेल्वेरूळांवरील सध्याच्या ताशी 26 किमीवरून समर्पित मालवाहतूक मार्गिकांवर ताशी 70 किमी पर्यंत पोहाचेल.

 

* * *

M.Iyengar/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686298) Visitor Counter : 237