विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

पंतप्रधान उद्या भारताच्या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन करणार

Posted On: 21 DEC 2020 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2020 

देशातील सहाव्या आयआयएसएफ अर्थात भारताच्या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची उलट गणती सुरु झाली आहे. या वर्षीच्या ह्या महाविज्ञान सोहळ्याची सुरुवात उद्या 22 डिसेंबर 2020 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनपर भाषणाने होईल. या महोत्सवाच्या आयोजनाची सुरुवात 2015 या वर्षी झाली. “कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत, आयआयएसएफ-2020 चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने होत आहे आणि आभासी वातावरणात आयोजित झालेला हा सर्वात मोठा विज्ञान महोत्सव असणार आहे”, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी आज दिल्ली इथे बातमीदारांना सांगितले.

आयआयएसएफ-2020 ची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या कर्टन रेझर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की या कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनपर भाषणाने होईल तर समारोपाच्या 25 डिसेंबर 2020 ला होणाऱ्या सत्राला उपराष्ट्रपती वेंकैया नायडू संबोधित करतील.

सध्या सर्वत्र पसरलेल्या कोविड-19 विषाणूच्या नव्या प्रजातीविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना “आपण कोणत्याही नव्या आव्हानाचा सामना करू शकतो हे वैज्ञानिकांनी दाखवून दिले आहे आणि यापुढे येणाऱ्या आव्हानांसाठी ते तशाच प्रकारे तयार असतील”, अशा शब्दात केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले. “आरोग्यविषयक समस्यांनी आता जनआंदोलनाचे स्वरूप घेतले आहे आणि अशा परिस्थितीत सर्व प्रकारची योग्य खबरदारी घेऊन तसेच योग्य रीतीने वर्तन करून स्वतःचे संरक्षण कसे करायचे याची जाणीव भारतीय जनतेत निर्माण झाली आहे”, असे सांगत त्यांनी खऱ्या परिस्थितीची उपस्थितांना आठवण करून दिली.

आयआयएसएफ हा भारत सरकारचा उपक्रम असून तो वार्षिक पद्धतीने साजरा होणारा महोत्सव आहे असे डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले.

आभासी मंचाच्या उपलब्धतेमुळे भारतातील तसेच परदेशातील शास्त्रज्ञ, युवावर्ग आणि सामान्य जनता यांनी आयआयएसएफ-2020 मधील मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याचा आनंद मिळविण्यासाठी नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.

या महोत्सवाची सविस्तर माहिती आयआयएसएफच्या पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे- -www.scienceindiafest.org

तसेच पत्रसूचना कार्यालयाच्या संकेतस्थळावर pib.gov.in/iisf  येथेदेखील ही माहिती मिळू शकेल.

आयआयएसएफ-2020 वरील सादरीकरण 


* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1682490) Visitor Counter : 205