पंतप्रधान कार्यालय

फिक्कीच्या 93 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण

मजबूत आणि निर्णयक्षम सरकार सर्व संबधितांना त्यांची क्षमता मापण्यास प्रोत्साहन देतेः पंतप्रधान

आपल्या उद्योगक्षेत्राला भिंतींची नाही तर पुलांची आवश्यकता : पंतप्रधान

धोरणे आणि धारणा यामार्फत शेतकऱ्यांचे कल्याण करण्यासाठी सरकार कटीबद्ध: पंतप्रधान

उद्योगक्षेत्रातील दिग्गजांना गावांमध्ये आणि छोटया शहरांत गुंतवणूक करण्याचे आवाहन

Posted On: 12 DEC 2020 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2020

 

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा (फिक्की) 93 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व वार्षिक अधिवेशनात आज पंतप्रधानांनी दूरसंवाद पद्धतीने  उद्घाटनपर भाषण केले. भारतीय खासगी क्षेत्राने फक्त देशीवासियांच्या गरजाच भागवल्या नाहीत तर विश्वात भारत हा ब्रॅण्ड मजबूतीने स्थापित केला याबद्दल पंतप्रधानांनी खासगी उद्योगक्षेत्राला धन्यवाद दिले.  प्रत्येक भारतीयाची आत्ननिर्भर भारताप्रति असलेली बांधिलकी ही देशाचा खासगी क्षेत्रावर असलेला विश्वास सिद्ध करते असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.

आत्मविश्वास असणारी माणसे जीवनात किंवा कारभारात कोणालाही मोकळीक देण्यास कचरत नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले. भारी बहुमतात असणाऱ्या दृढ सरकारमध्ये हा आत्मविश्वास, ही निष्ठा आपोआप येते. निर्णयक्षम सरकार नेहमीच इतरांच्या मार्गातील अडथळेही दूर करण्यासाठी झटते तसेच समाजाप्रती आणि देशाप्रती आपले योगदान देते. अशा सरकारला नियंत्रणाची नाही तर पुढाकाराची इच्छा असते. प्रत्येक क्षेत्रात सरकार होते अशा कालखंडाबद्दल ते बोलले आणि या पद्धतीमुळे अर्थव्यवस्थेला जी अवकळा आली त्याचे वर्णनही त्यांनी केले. त्याविरुद्ध दूरदृष्टी असणारे आणि निर्णयक्षम सरकार सर्व संबधितांना त्यांची क्षमता मापण्याची प्रोत्साहन देते. गेल्या सहा वर्षात सरकार सर्व क्षेत्रातील संबधितांना प्रोत्साहन देत आहे, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. कृषी ते पायाभूत विकास, तंत्रज्ञान ते करआकारणी, बांधकाम ते नियमनसुलभता अशा सर्व क्षेत्रातील सर्वंकष सुधारणांमध्ये हे प्रतिबिंबित झाल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या उद्योगक्षेत्राला भिंतींची गरज नसून पूलांची गरज आहे असे पंतप्रधान म्हणाले. अर्थव्यवस्थेच्या अनेकानेक क्षेत्रांमधील भिंती काढून टाकल्या तर प्रत्येकासाठी नवी संधी निर्माण होईल, विशेषतः शेतकऱ्यांना नवा पर्याय उपलब्ध होईल. तंत्रज्ञानात, शीतगृह आणिव कृषीक्षेत्रातील गुंतवणूकीमुळे शेतकऱ्यांना लाभ होईल. शेती, सेवा, उत्पादन आणि सामाजिक ही सर्व क्षेत्रे परस्परपूरक होण्यासाठी गुंतवणूक ऊर्जा कामी येते, असे ते म्हणाले. फिक्किसारखी संस्था  या प्रवासात पूल आणि ऊर्जा दोन्हीचे काम करते. स्थानिक मुल्य व पुरवठासाखळी मजबूत करण्यासाठी आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताची भूमिका कशी वाढेल यावर आपण काम केले पाहिजे. “भारताकडे बाजारपेठ आहे, मनुष्यबळ आहे आणि समर्पणवृत्तीने काम करण्याची क्षमताही आहे.” असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.

J-A-M (जनधन, आधार व मोबाईल) या त्रिसूत्रीवर आधारित यश हे या सरकारच्या नियोजनपूर्ण व एकत्रित प्रयत्नांनी झालेल्या सुधारणांच्या यशाचे प्रतिक आहे. महामारी कालखंडात एका क्लिकवर करोडो खात्यांमध्ये पैसे जमा झाल्यावर जगातील सर्वात भव्य असलेल्या थेट हस्तांतरण योजनेला गौरवले गेले.

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि कृषीक्षेत्रासाठी उचललेल्या पावलांचे विवेचन केले. धोरण आणि धारणा यांच्या मार्फत सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे. कृषीक्षेत्रातील वाढता उत्साह नमूद करून मोदींनी शेतकऱ्यांना मंड्यांच्या बाहेर माल विकायला आसलेली सूट, मंडयांचे आधुनिकीकरण आणि इलेक्ट्रॉनिक व्यासपीठावर माल विकायचा पर्याय याबदद्ल सांगितले. हे सर्व काही शेतकऱ्यांना सधन आणि सधन शेतकऱ्यांचा समृद्ध  भारत निर्माण करण्यासाठी आहे असेही त्यांनी सांगितले.

शेतीक्षेत्रातील खासगी गुंतवणूक फारशी समाधानकारक नसल्याचे निरिक्षण पंतप्रधानानी नोंदवले. पुरवठा साखळी, शीतगृहे, आणि खते यासारख्या क्षेत्रांमध्ये खासगी क्षेत्राची गुंतवणूक व रस वाढला पाहिजे असे ते म्हणाले. ग्रामीण कृषी आधारित व्यवसायांना भरपूर संधी अहेत आणि त्यादिशेने धोरण राबवण्याची गरज असल्याचे असे मोदींनी नमूद केले.

ग्रामीण, अर्ध ग्रामीण आणि टायर-2, टायर-3 शहरांमध्ये सकारात्मक बद्ल घडून येत असल्याच्या ठळक खुणा दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. जेष्ठ व्यावसायिक आणि व्यवसायक्षेत्रातील नेतृत्वाला पंतप्रधानांनी अशा क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येने शहरातील इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येला मागे टाकल्याचे आणि भारतातील अर्ध्याहून अधिक नवउद्योग म्हणजे स्टार्टअप्स हे टायर-2 टायर-3 शहरात असल्याचे ते म्हणाले. सार्वजनिक वाय-फाय (Wi-Fi) हॉटस्पॉटसाठी नुकतेच मंजूरी मिळालेले पीएम-वाणी अ‍ॅपविषयी सांगताना त्यांनी नवउद्योजकांनी ग्रामीण कनेक्टीविटीच्या प्रयत्नांमध्ये भागीदार होण्याचे आवाहन केले. 21 व्या शतकात भारताच्या विकासाचा मार्ग ग्रामीण भागांमधून व छोट्या शहरांतून जाणार आहे. आपल्या सारख्या नवउद्योजकांनी ग्रामीण भागातील गुंतवणूकीपासून मागे फिरता कामा नये. आपली गुंतवणूक ग्रामीण भागातील बंधू-भगिनींसाठी नवी दारे खुली करेल, असे पंतप्रधान म्हणाले.

कोविड सारख्या मोठ्या धक्क्यातून सावरण्यात योगदान दिल्याबद्दल  पंतप्रधानांनी व्यवसायिक व नवउद्योजकांचे आभार मानले. महामारीच्या काळात नागरीकांचे आरोग्य ही देशाची प्राथमिकता होती, आणि त्यात यश आले. ज्या वेगाने परिस्थिती गंभीर होत गेली त्याच वेगाने ती पूर्वपदावर येत आहे, असे मोदी म्हणाले.

फिक्किचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग आणि त्यांची जवळ आलेली शतकपूर्ती यांची आठवण करून देत या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राष्ट्रउभारणीत त्यांची भूमिका विस्तारण्याची आवश्यकता व्यक्त केली.

 

* * *

S.Thakur/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1680230) Visitor Counter : 11