पंतप्रधान कार्यालय
संसदेच्या नव्या वास्तूच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
10 DEC 2020 8:45PM by PIB Mumbai
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला जी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी प्रल्हाद जोशी जी, हरदीप सिंह पुरी जी, इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, आभासी माध्यमातून जोडले गेलेले अनेक देशांच्या संसदेचे सभापती, अनेक देशांचे राजदूत, आंतर-संसदीय संघटनेचे सदस्य, इतर माननीय आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, आजचा दिवस खूप ऐतिहासिक आहे. आजचा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे. भारतीयांच्यावतीने, भारतीय विचारांनी ओतप्रोत भरलेल्या, भारताच्या नव्या संसद भवनाच्या निर्माण कार्याचा शुभारंभ आपल्या लोकशाही परंपरेमध्ये एक सर्वात महत्वाचा टप्पा आहे. आपण भारतातले लोक मिळून आपल्या संसदेच्या या नूतन भवनाचे निर्माण करणार आहोत.
मित्रांनो, भारत आपल्या स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन उत्सव साजरा करताना, त्या उत्सवाची साक्षात प्रेरणा म्हणजे आपल्या संसदेची नवीन वास्तू बनणार आहे, यापेक्षा सुंदर काय असणार, यापेक्षा पवित्र काय असणार आहे. आज 130 कोटींपेक्षा जास्त भारतीयांसाठी अतिशय सौभाग्याचा दिवस आहे, आपण सर्वजण या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार बनत आहोत, त्याचा सर्वांना अभिमान-गर्व वाटत आहे.
मित्रांनो, नवीन संसद भवनाचे निर्माण, नूतन आणि पुरातन यांचे सह-अस्तित्व याचे एक उदाहरण आहे. काळ आणि गरजा यांच्या अनुरूप स्वतःमध्ये परिवर्तन आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. ज्यावेळी 2014 मध्ये मला पहिल्यांदा एक खासदार म्हणून संसदेच्या भवनामध्ये येण्याची संधी मिळाली होती, आपल्या जीवनातला ‘तो’ एक क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. त्यावेळी लोकशाहीच्या या मंदिरामध्ये पाऊल ठेवण्याआधी, मी आपले मस्तक लवून, माथा टेकवून लोकशाहीच्या या मंदिराला वंदन केले होते. आपल्या वर्तमान संसद भवनाने स्वातंत्र्याचे आंदोलन आणि मग स्वतंत्र भारताच्या निर्मितीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका निभावली आहे. स्वंतत्र भारतातल्या पहिल्या सरकारची निर्मितीही इथेच झाली होती आणि पहिल्या संसदेची बैठकही इथेच झाली. या संसद भवनामध्ये आपली घटना तयार झाली, आपल्या लोकशाहीची पुनर्स्थापना झाली. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर वरिष्ठांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये सखोल विचार मंथन करून आपल्याला आपली घटना दिली. संसदेची सध्याची वास्तू, स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक चढ-उतारांची, आपल्या प्रत्येक आव्हानांची, आपण केलेल्या उपायांची, आपल्या आशांची, आकांक्षांची, आपल्या यशाची प्रतीक आहे. या भवनामध्ये बनलेला प्रत्येक कायदा, या कायद्यांच्या निर्माणाच्या काळामध्ये संसद भवनामध्ये मांडण्यात आलेल्या अभ्यासपूर्ण गोष्टी, हे सगळे काही आपल्या लोकशाहीचा वारसा आहेत.
मित्रांनो, संसदेच्या शक्तिशाली इतिहासाबरोबरच यथार्थ गोष्टींचा स्वीकार करणेही तितकेच आवश्यक आहे. या वास्तूला आता जवळ-जवळ शंभर वर्षे होत आहेत. गेल्या दशकामध्ये काळाची गरज लक्षात घेऊन या इमारतीचे निरंतर अद्यतन करण्यात आले. या प्रक्रियेमध्ये अनेकदा भिंती पाडण्यात आल्या आहेत. कधी नवी साउंड सिस्टिम बसविण्यासाठी, तर कधी आग प्रतिबंधक प्रणाली लावण्यासाठी तर कधी आय टी सिस्टिम बसविण्यासाठी गरजेनुसार भिंती पाडण्यात आल्या. लोकसभेमध्ये आसन व्यवस्था वाढविण्यासाठीही भिंती पाडून सभागृह मोठे करण्यात आले. इतके काही झाल्यानंतर हे संसदेचे भवन आता विश्राम करण्याची मागणी करीत आहे. आत्ताच लोकसभेचे अध्यक्षही सांगत होते की, गेल्या काही वर्षांपासून संसदेमध्ये किती अवघड परिस्थिती निर्माण होत आहे, अनेक वर्षांपासून संसदेसाठी नवीन वास्तूची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा गरजेच्या काळामध्ये आपल्या सर्वांची एक जबाबदारी निर्माण होते की, 21 व्या शतकामध्ये भारताला आता एक नवीन संसद भवन मिळावे. याच दिशेने वाटचाल करण्याचा आज शुभारंभ होत आहे. आणि म्हणूनच आज ज्यावेळी आम्ही एक नवीन संसद भवनाच्या निर्माणाचे कार्य सुरू करीत आहोत, त्यावेळी वर्तमान संसद परिसराच्या जीवनामध्ये एक नवीन वर्षही जोडत आहोत.
मित्रांनो, नव्या संसद भवनामध्ये अनेक नवीन गोष्टी करण्यात येणार आहे. त्यामुळे संसदेची कार्यक्षमता वाढेल, खासदारांची कार्यसंस्कृती आधुनिक बनेल. आत्ता ज्याप्रमाणे आपल्या खासदारांना भेटण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातून लोक येतात, त्यावेळी सध्याच्या संसद भवनामध्ये लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. सामान्य जनतेला त्रास होतो, नागरिकांना त्रास होतो, सामान्य नागरिकांना आपल्या समस्या आपल्या लोकप्रतिनिधीला- खासदाराला सांगायच्या असतात. सर्वजण तर आपले सुख-दुःखं वाटण्यासाठीच येत असतात. मात्र त्यासाठी लोकांना संसद भवनामध्ये जागा अतिशय अपुरी पडत होती. सर्व खासदारांना आपल्या मतदारसंघातल्या लोकांना सहजपणे संसदेत भेटता यावे अशी सुविधा भविष्यामध्ये प्रत्येक खासदाराकडे असणार आहे. या विशाल परिसरामध्ये मधल्या भागामध्ये खासदार आपल्या मतदारसंघातून आलेल्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊ शकतील.
मित्रांनो, आधीच्या संसद भवनाने स्वातंत्र्यानंतरच्या भारताला दिशा दिली तर नवीन संसद भवन आत्मनिर्भर भारताच्या निर्माणाचे साक्षीदार बनेल. आधीच्या संसद भवनामध्ये देशाच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी काम झाले तर नवीन संसद भवनामध्ये 21व्या शतकामध्ये भारताच्या आकांक्षांची पूर्तता केली जाईल. ज्याप्रमाणे आज इंडिया गेटच्या पुढे राष्ट्रीय युद्ध स्मारकाने राष्ट्रीय ओळख स्वत:ची निर्माण केली आहे, तसेच हे नवीन संसद भवन आपली स्वतःची ओळख निर्माण करेल. देशाच्या लोकांना, येणा-या पिढ्यांना नवीन संसद भवन पाहून अभिमान-गर्व वाटेल. ही वास्तू स्वतंत्र भारतामध्ये बनली आहे, स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचे स्मरण करतानाच या वास्तूची निर्मिती झाली आहे, याचा सर्वांना अभिमान वाटेल.
मित्रांनो, संसद भवन शक्तीचे स्त्रोत आहे. त्याच्या ऊर्जेचा स्त्रोत आपली लोकशाही आहे. स्वातंत्र्याच्या काळामध्ये काहीतरी कारणाने एका लोकशाही राष्ट्राच्या रूपामध्ये भारताच्या अस्तित्वावर साशंकता आणि संशय व्यक्त केला गेला होता; हा एक इतिहासाचा भाग आहे. अशिक्षितपणा, गरीबी, सामाजिक विविधता आणि अनुभवहीनता यासारखे अनेक तर्क लावून भविष्यवाणीही केली होती की, भारतामध्ये लोकशाही अयशस्वी होणार!! आज आपण अतिशय अभिमानाने सांगू शकतो की, आपल्या देशाने त्या सर्व शंकांना चुकीचे सिद्ध केले आहे इतकेच नाही, तर 21 व्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये भारत एक प्रमुख लोकशाहीवादी देश म्हणून पूर्ण ताकदीनिशी पुढे जात आहे, हे सर्वजण पाहत आहेत.
मित्रांनो, लोकशाही भारतामध्ये का यशस्वी ठरली, का यशस्वी आहे आणि लोकशाहीवर कधीही गदा का येऊ शकत नाही, ही गोष्ट आपल्या प्रत्येक पिढीला जाणून घेणे, समजून घेणे खूप आवश्यक आहे. आपण पाहतो-ऐकतो की, दुनियेमध्ये 13 व्या शताब्दीमध्ये रचलेल्या मॅग्ना कार्टा याची खूप चर्चा होते. काही विद्वान लोक त्याला लोकशाहीचा पाया असेही म्हणतात. परंतु मॅग्ना कार्टाच्याही आधी 12 व्या शताब्दीमध्येच भारतामध्ये भगवान बसवेश्वर यांचे ‘अनुभव मंटपम’ अस्तित्वात आले होते, ही गोष्टही तितकीच योग्य आहे. ‘अनुभव मंटपम’च्या रूपामध्ये त्यांनी लोकसंसदेची केवळ निर्मिती केली नाही तर त्याचे संचालनही सुनिश्चित केले होते. आणि भगवान बसवेश्वरजी यांनी सांगितले होते की, ‘‘यी अनुभवा मंटप जन सभा, नादिना मट्ठु राष्ट्रधा उन्नतिगे हागू, अभिवृद्धिगे पूरकावगी केलसा मादुत्थादे!’’ याचा अर्थ असा आहे की, हे अनुभव मंटपम म्हणजे एक अशी जनसभा आहे, ती राज्य आणि राष्ट्र यांच्या हितासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी सर्वांना एकजूट होऊन काम करण्यासाठी प्रेरणा देत राहील. अनुभव मंटपम, लोकशाहीचेच तर एक स्वरूप होते.
मित्रांनो, या कालखंडाच्याही आणखी मागे जाऊन पाहिले तर तामिळनाडूमध्ये चेन्नईपासून 80-85 किलोमीटरवर उत्तरोरूर नावाच्या गावामध्ये एक खूप ऐतिहासिक साक्ष पहायला मिळते. या गावामध्ये चोल साम्राज्याच्या काळामध्ये 10 व्या शताब्दीमध्ये पाषाणांवर तमिळमध्ये लिहिलेले पंचायत व्यवस्थेचे वर्णन आहे. आणि त्यामध्ये सांगितले आहे की, प्रत्येक गावामध्ये एक ‘कुडुंबु’ म्हणून कशी वर्गवारी, गट विभागणी केली जात होती, या विभागणीला आपण आज ‘वार्ड’ असे म्हणतो. या ‘कुडुंबु’मधून एक-एक प्रतिनिधी महासभेमध्ये पाठवला जात होता. असेच आजही केले जाते. या गावामध्ये हजार वर्षापूर्वी जी महासभा भरविण्यात येत होती, तीच पद्धत आजही तिथं अस्तित्वात आहे.
मित्रांनो, एक हजार वर्षांच्या आधी बनलेल्या या लोकशाही व्यवस्थेमध्ये आणखी एक गोष्ट अतिशय महत्वपूर्ण होती. या पाषाणावर नमूद करण्यात आलेल्या आलेखामध्ये त्याचे वर्णन आहे आणि त्यामध्ये म्हटले आहे की, लोकप्रतिनिधीला निवडणूक लढविण्यासाठी अयोग्य घोषित करण्याची तरतूदही त्या काळामध्ये होती आणि त्यासाठी नियम काय होता - तर नियम असा होता की, जो लोकप्रतिनिधी आपल्या संपत्तीची माहिती देणार नाही तो निवडणूक लढवू शकणार नाही आणि त्याचे जवळचे नातेवाईकही निवडणूक लढवू शकणार नाहीत. हे सगळे किती वर्षांपूर्वीचे आहे, याचा जरा विचार करा. त्या काळामध्ये किती बारकाईने सर्व पैलूंचा विचार केला गेला होता, सगळ्या गोष्टी किती सखोल जाणून नियम केले होते आणि ते आपल्या लोकशाही परंपरांचा हिस्सा बनवले होते.
मित्रांनो, लोकशाहीचा आपला हा इतिहास देशाच्या प्रत्येक, अगदी सर्व कानाकोप-यांमध्ये नजरेस येतो. काही शब्दांचा तर आपल्याला चांगलाच परिचय आहे. यामध्ये -सभा, समिती, गणपती, गणाधिपती ही शब्दावली आपल्या मन-मस्तिष्कामध्ये अनेक युगांपासून प्रवाहित होत आली आहे. अनेक युगांपूर्वी शाक्य, मल्लम आणि वेज्जी यासारखे प्रजासत्ताक असो, लिच्छवी, मल्लक मरक आणि कम्बोज सारखे प्रजासत्ताक असो अथवा मौर्य काळातले कलिंग, सर्वांनी लोकशाहीलाच शासनाचा आधार बनवला होता. हजारों वर्षांपूर्वी रचलेल्या आमच्या वेदांमध्ये ऋग्वेदामध्ये लोकशाहीच्या विचाराला ‘ समज्ञान’ म्हणजेच समूह चेतना, ‘कलेक्टिव्ह कॉन्शसनेस‘ म्हणजेच सामूहिक जाणीवाच्या रूपामध्ये पाहिले आहे.
मित्रांनो, सर्वसाधारणपणे इतर ठिकाणी ज्यावेळी लोकशाहीविषयी चर्चा होत असते, त्यावेळी बहुतांशवेळा निवडणुका, निवडणुकीची प्रक्रिया, निवडून आलेले सदस्य, त्यांच्या गठणाची रचना, शासन-प्रशासन, लोकशाहीची व्याख्या या गोष्टींच्या अवतीभवती चर्चा होत असते. अशा प्रकारच्या व्यवस्थेवर अधिक भर देणे म्हणजेच बहुतांश ठिकाणी त्याला लोकशाही असे म्हणतात. परंतु भारतामध्ये लोकशाही हा एक संस्कार आहे. भारतासाठी लोकशाही जीवनमूल्य आहे. ती एक जीवन पद्धती आहे. हा राष्ट्र जीवनाचा आत्मा आहे. भारताची लोकशाही, अनेक युगांच्या अनुभवाने विकसित झालेली व्यवस्था आहे. भारतासाठी लोकाशाहीमध्ये जीवन मंत्रही आहे आणि त्याचबरोबर ही व्यवस्था म्हणजे एक तंत्रही आहे. काळानुरूप वेळोवेळी यामध्ये, व्यवस्थेमध्ये बदल होत आला आहे. प्रक्रियेमध्ये परिवर्तन घडून आले आहे, परंतु लोकशाहीचा आत्मा कायम आहे. आणि आता विडंबन पहा, आज भारताची लोकशाही आपल्याला पाश्चिमात्य देशांकडून समजावली जात आहे. ज्यावेळी आपणच विश्वासाने आपल्या लोकशाहीच्या इतिहासाचे गौरवगान करू, तो दिवस आता दूर नाही. त्यावेळी संपूर्ण दुनियाही म्हणेल - इंडिया इज मदर ऑफ डेमॉक्रसी !!
मित्रहो, भारताच्या लोकशाहीत सामावलेली शक्तीच देशाच्या विकासाला नवी उर्जा बहाल करत आहे. देशवासियांना नवा विश्वास देत आहे. दुनियेतील अनेक देशात जेथे लोकशाही प्रक्रियांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे, तेथे भारतातील लोकशाही सतत नवीन रुप घेत आहे. सध्या काही वर्षांपासून आपण हे बघतो आहोत की कित्येक लोकशाही देशात वोटर टर्नआउट सतत कमी होत आहे याविरुद्ध भारतात मात्र एकेका निवडणुकीसोबत वोटर टर्नआउट वाढताना दिसतो आहे. यात महिला आणि युवावर्गाचा सहभाग सतत वाढत आहे.
मित्रहो, या विश्वासाचे, या आस्थेचे एक कारण आहे. भारतात लोकशाही हे नेहमीच गवर्नेसशी असलेले मतभेद आणि विरोधाभास सोडवण्याचे महत्वाचे माध्यम आहे. वेगवेगळे विचार, वेगवेगळे दृष्टीकोन, या सगळ्या गोष्टी एका vibrant democracy ला सशक्त करतात. Differences साठी नेहमीच मोकळीक असावी पण disconnect नसावे, हेच उद्दिष्ट ठेवून आपली लोकशाही वाटचाल करत असते. गुरू नानक देव जी म्हणाले आहेत, जब लगु दुनिआ रहीए नानक। किछु सुणिए, किछु कहिए।। अर्थ असा की जोपर्यंत जग चालू आहे तोपर्यंत संवाद सुरू रहायला हवं. काही सांगणे काही ऐकणे हाच तर संवादाचा प्राण आहे. हाच लोकशाहीचा आत्मा आहे. Policies मध्ये अंतर असू शकते, Politics मध्ये वेगळेपण असू शकते, पण आपण Public च्या सेवेसाठी आहोत या अंतिम उद्दिष्टात मतभेद नसावेत.
वाद-संवाद संसदेच्या आत असो की संसदेच्या बाहेर, राष्ट्रसेवेचा संकल्प, राष्ट्रहिताप्रति समर्पण यासाठी असले पाहिजे, आणि यासाठीच आज जेव्हा संसद भवनाचे निर्माण सुरू होत आहे, तेव्हा आपण हे ध्यानात घेतले पाहिजे संसदेत पोचलेल्या प्रत्येक सदस्यावर एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी जनतेच्या प्रति आहे आणि संसदेच्या प्रति सुद्धा आहे. आपला प्रत्येक निर्णय हा राष्ट्र प्रथम या भावनेने झाला पाहिजे, आपल्या प्रत्येक निर्णयात राष्ट्रहित सर्वोच्च असले पाहिजे. राष्ट्रीय संकल्पांच्या सिद्धीसाठी आपण एक स्वर, एक आवाज या भावनेने उभे राहणे आवश्यक आहे.
मित्रहो, आपल्याकडे जेव्हा मंदिरभवन बांधले जाते तेव्हा सुरूवातीला त्याचा आधार फक्त दगड-वीटाच असतात. कारागीर, शिल्पकार या सर्वांच्या परिश्रमाने ते भवन पूर्ण होते. पण ते भवन तेव्हाच मंदिर बनते, त्याला पूर्णता तेव्हा येते जेव्हा त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होते. प्राणप्रतिष्ठा होईपर्यत ती फक्त इमारत असते.
मित्रहो, नवे संसद भवन बांधून तयार तर होईल पण जेव्हापर्यंत त्यात प्राणप्रतिष्ठा होणार नाही तोपर्यंत तोवर ती एक इमारतच आहे. ही प्राणप्रतिष्ठा एखाद्या मूर्तीची नाही. लोकशाहीच्या मंदिरात याबाबत काही नियम- कायदे नाहीत. या मंदिराची प्राणप्रतिष्ठा करतील त्यात निवडून आलेले लोकप्रतिनिधी. त्यांचे समर्पण, त्यांचा सेवाभाव या मंदिरात प्राण-प्रतिष्ठा करतील. त्यांचे वर्तन-विचार-आचार या लोकशाहीच्या मंदीराची प्राणप्रतिष्ठा करतील. भारताची एकता-अखंडत्वासाठी केले गेलेले त्यांचे प्रयत्न या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची उर्जा बनतील.
जेव्हा एक एक लोकप्रतिनिधी, आपले ज्ञान, आपले कौशल्य, आपली बुद्धी, आपले शिक्षण, आपले अनुभव याचे सार संपूर्णतः इथे ओतेल, राष्ट्रहितासाठी ओतेल, त्यांचा अभिषेक करेल तेव्हा या नव्या संसदभवनाची प्राणप्रतिष्ठा होईल. येथे राज्यसभा Council of States आहे. ही एक अशी व्यवस्था आहे जी भारताच्या फेडरल स्ट्रक्चर ला बळ पुरवते. राष्ट्राच्या विकासासाठी राज्याचा विकास, राष्ट्राच्या मजबूतीसाठी राज्याची मजबूती, राष्ट्राच्या कल्याणासाठी राज्याचे कल्याण, या मूलभूत सिद्धांतासह काम करण्याचा पण आपल्याला केला पाहिजे। पिढ्यान् पिढ्या, उद्या जे लोकप्रतिनिधी येथे येतील, त्यांच्या शपथग्रहणाबरोबर प्राणप्रतिष्ठेच्या या महायज्ञात त्यांचे योगदान सुरू होईल. याचा लाभ देशातील कोटी-कोटी जनतेला होईल. संसदेची नवीन इमारत एक असे तपोवन बनेल, जे देशवासियांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी काम करेल, जनकल्याणाचे काम करेल.
मित्रहो, 21 वे शतक भारताचे असावे हे आपल्या देशातील महापुरुष, महान स्त्रियांचे स्वप्न आहे. बऱ्याच काळापासून याबद्दल आपण ऐकत आलो आहोत. 21 वे शतक भारताचे शतक तेव्हाच होईल जेव्हा भारताचा प्रत्येक नागरिक आपल्या भारताला सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी स्वतःचे योगदान देईल. बदलत जाणाऱ्या या जगात भारतासाठी वाढत्या संधी आहेत. कधी कधी तर असे वाटते की संधींचा महापूर आला आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत या संधी आपल्या हातातून निसटू देता कामा नयेत. मागील शतकाच्या अनुभवाने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. त्या अनुभवांचे शिक्षण आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देते की आता वेळ वाया घालवता कामा नये तर वेळ साधता आली पाहिजे.
मित्रहो, एका खूप जुन्या आणि महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख मी करू इच्छितो. वर्ष 1897 मध्ये स्वामी विवेकानंदजींनी देशाच्या जनतेस पुढील 50 वर्षांसाठी एक आवाहन केले होते. स्वामीजी म्हणाले होते की येणाऱ्या 50 वर्षांपर्यंत भारतमातेची आराधनाच सर्वोच्च असावी. देशवासियांसाठी त्यांनी एकच काम योजले होते, भारतमातेची आराधना करणे. आणि आपण पाहिली त्या महापुरूषाच्या वाणीची ताकद, त्यानंतर अगदी 50 वर्षांनंतर, 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. आज जेव्हा संसदेच्या नवीन भवनाचे शिलान्यास होत आहे, तेव्हा देशाला एका नवीन संकल्पाचाही शिलान्यास करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाला नवीन संकल्पाचा शिलान्यास करायला हवा.
स्वामी विवेकानंदांच्या त्या आवाहनाला स्मरताना आपल्याला हा संकल्प करायचा आहे. हा संकल्प आहे India First हा, भारत सर्वोच्च. आपण फक्त आणि फक्त भारताची प्रगती, भारताच्या विकासालाच आपली आराधना समजूया. आपला प्रत्येक निर्णय देशाची ताकद वाढवेल, आपल्या प्रत्येक निर्णयाची तुळणा केली पाहिजे. ती म्हणजे देशाचे हित सर्वोच्च, देशाचे हित सर्वप्रथम. आपला प्रत्येक निर्णय वर्तमान आणि भावी पिढीच्या हिताचा असला पाहिजे.
मित्रहो, स्वामी विवेकानंदजींनी 50 वर्षांबाबत म्हणाले होते. आपल्या समोर 25-26 वर्षांनंतर येणारा भारताच्या स्वातंत्र्यांचा शंभरावा वाढदिवस आहे. जेव्हा देश 2047 मध्ये आपल्या स्वातंत्र्यांच्या 100व्या वर्षात प्रवेश करेल तेव्हा आपला देश कसा असावा आपल्या देशाला कोठे न्यायचे आहे, येत्या 25-26 वर्षात आपल्याला किती कष्ट करायला हवेत, यासाठी आजच संकल्प घेऊन काम करायला हवे. जेव्हा आपण आज संकल्प घेऊन, देशहित सर्वोच्च मानून काम करु तेव्हा देशाचा वर्तमानच नव्हे तर देशाचे भविष्यही उत्तम साकारू. आत्मनिर्भर भारताची निर्मिती, समृद्ध भारताची निर्मिती, आता थांबणार नाही, कोणी थांबवू शकणारही नाही.
मित्रहो, आपण भारतीय ही शपथ घेऊ, आपल्यासाठी देशहितापेक्षा मोठे आणि कोणतेही हित नाही. आपण भारतीय ही शपथ घेऊ आपल्यासाठी देशाची चिंता, आपल्या स्वतःच्या चिंतेहून मोठी असेल। आपण भारतीय ही शपथ घेऊ – आमच्यासाठी देशाचे ऐक्य, अखंडत्व याहून मोठे काहिही नसेल । आपण भारतीय ही शपथ घेऊ – आपल्यासाठी देशाच्या संविधानाची मान-मर्यादा आणि त्याची अपेक्षापूर्ति, जीवनातील सर्वात महान ध्येय असेल.
आपल्याला गुरुदेव रविंद्र नाथ टागोरांची ही भावना नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे. आणि गुरुदेव रविंद्र नाथ टागोरांची भावना काय होती, गुरुदेव म्हणत असत एकोता उत्साहो धॉरो, जातियो उन्नॉति कॉरो, घुशुक भुबॉने शॉबे भारोतेर जॉय! म्हणजे एकतेचा उत्साह असला पाहिजे, प्रत्येक नागरिक उन्नति करो, संपूर्ण विश्वात भारताचा जय-जयकार होवो.
मला विश्वास आहे, आपल्या संसदेचे नवे भवन आपणा सर्वांना एक नवा आदर्श पुढे ठेवण्याची प्रेरणा देईल. आपल्या लोकतांत्रिक संस्थाची विश्वसनीयता नेहमीच अजून बळकट होत राहील. या कामनेसह मी आपल्या वाणीला विराम देतो आणि 2047 च्या संकल्पासह सर्व देशवासियांना मार्गक्रमणा करण्यासाठी आमंत्रण देतो.
आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद!
*****
M.Chopade/S.Bedekar/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679806)
Visitor Counter : 1114
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam