पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण


विचाराधारेला देशहितापेक्षा अधिक महत्व कधीही दिले जाऊ नये :पंतप्रधान

विचार आणि कल्पनांची देवघेव आणि नवे विचारप्रवाह अखंड वाहत रहायला हवे

Posted On: 12 NOV 2020 9:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 नोव्‍हेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या जेएनयु म्हणजेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले.

यावेळी जेएनयु चे विद्यार्थी आणि देशातल्या युवाशक्तीशी त्यांनी संवाद साधला. देशहितापलीकडे विचारधारेला प्राधान्य देण्यातले धोके आणि नुकसान त्याविषयी त्यांनी आपली मते मांडली. या एका गोष्टीमुळे देशाच्या लोकशाही व्यवस्थेची मोठी हानी झाली आहे, असे ते म्हणाले. “माझी विचारधारा मला असे सांगते आहे, त्यामुळे मी त्याच चौकटीतून, देशहिताच्या मुद्दयांचाही विचार करेन, मी त्याच निकषांवर इथेही वागेन, हा विचार अयोग्य आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येकाला आपापल्या विचारधारेचा अभिमान असतो, आणि ते साहाजिकही आहे, मात्र, देशहिताचा विषय असेल, तर आपली विचारधारा देशासोबत उभी असायला हवी, देशाविरुद्ध नाही” यावर त्यांनी भर दिला.

देशाच्या इतिहासात, जेव्हाही काही संकटाचा काळ आला, तेव्हा सर्व प्रकारच्या विचारधारेचे लोक देशहितासाठी एकत्र आले. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत विविध विचारांचे लोक एकत्र आले होते. ते एकत्रितपणे देश स्वतंत्र करण्यासाठी लढले. आणीबाणीच्या वेळी देखील देशाने हीच एकात्मतेची भावना पहिली. कॉंग्रेसचे माजी नेते आणि कार्यकर्ते देखील आणीबाणीच्या विरोधात लढले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते आणि जनसंघाचेही लोक होते, समाजवादी आणि साम्यवादी एकत्र आले होते.

या एकात्मिक लढ्यात कोणालाही आपल्या विचार धारेशी तडजोड करावी लागली नव्हती. तिथे केवळ एकच उद्देश होता-देशहित ! त्यामुळेच जेव्हा प्रश्न राष्ट्रीय एकता, एकात्मता आणि देशहिताचा असतो, तेव्हा एखाद्या विचारधारेच्या प्रभावाखाली निर्णय घेणे, देशासाठी घातक ठरु शकते.

विचार आणि कल्पनांची देवघेव निरंतर, विना अडथळा सुरूच राहिली पाहिजे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. आपला देश अशी भूमी आहे, जिथे विविध बौद्धिक कल्पना आणि विचारांचे बीज कायमच वाढले आहे, फोफावले आहे. ही परंपरा पुढेही अधिक बळकट करणे,  ही युवकांची जबाबदारी आहे. या परंपरेमुळेच आज भारत जगातील सर्वात व्यापक आणि विविधरंगी लोकशाही म्हणून विकसित झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी त्यांच्या सरकारचा सुधारणांचा अजेंडा विद्यार्थ्यांसमोर मांडला. आत्मनिर्भर भारताची कल्पना आज 130 कोटी भारतीयांचा एक सामुदायिक-एकात्मिक विचार बनली आहे, आपल्या आशा-आकांक्षांचा भाग बनली आहे, असे ते म्हणाले. भारतातील सुधारणांविषयी बोलतांना ते म्हणाले की चांगल्या सुधारणा म्हणजे चुकीचे राजकारण असा समज पूर्वी देशात होता, मात्र आज चांगल्या सुधारणा म्हणजेच चांगले राजकारण असा विचार अभिव्यक्त होत आहे. हा बदल कसा झाला, याचा जेएनयुच्या सामाजिक शास्त्र अभ्यासकांनी नक्की अभ्यास करावा, असा सल्ला त्यांनी दिला. सरकारने केलेल्या प्रत्येक सुधारणेमागे देश अधिकाधिक उत्तम करण्याचा निश्चय होता. या सुधारणा घडवण्यामागचा हेतू आणि दृढनिश्चय दोन्ही शुद्ध आणि भक्कम आहे, असेही ते म्हणाले. प्रत्येक सुधारणेआधी, एक सुरक्षिततेचे एक जाळे तयार करण्यात आले, आणि विश्वास हा या सुरक्षिततेचा पाया होता, असेही त्यांनी सांगितले.

देशात अनेक वर्षे गरिबांना केवळ घोषणाबाजीतच स्थान होते, त्यांना देशाशी, देशातल्या व्यवस्थांशी जोडण्यासाठी काहीही प्रयत्न करण्यात आले नाही, असे पंतप्रधान म्हणाले.गरीब लोक सर्वात दुर्लक्षित, समाजापासून तुटलेले आणि आर्थिक प्रवाहांपासून दूर असलेला घटक होता. आता गरीबांना त्यांचे हक्काचे पक्के घर, शौचालय, , गॅस , स्वच्छ पेयजल, डिजिटल बँकिंग, परवडणाऱ्या दारात मोबाईल संपर्कसेवा आणि जलद गतीची इंटरनेट सेवा दिली जात आहे.  हे सुरक्षिततेचे जाळे गरिबांभोवती विणले गेले आहे, त्यांच्या आकांक्षाना भरारी घेण्याची ताकद मिळावी, यासाठी हे सुरक्षा जाळे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, उत्तम सिंचन सुविधा, बाजारसमित्यांचे आधुनिकीकरण, ई-नाम, मृदा आरोग्य कार्ड, युरियाची उपलब्धता, उत्तम हमीभाव अशा सुविधांचे सुरक्षा जाळे शेतकऱ्यांच्या आजूबाजूला विणले गेले. आधी सरकारने त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम केले, आता त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

जेएनयु परिसरात उभारलेला स्वामी विवेकानंदांचा पुतळा, प्रत्येकाला प्रेरणा देत राहील, धैर्य देत राहील, अशी  त्यांनी आशा  व्यक्त केली. स्वामी विवेकानंदांना सुद्धा प्रत्येक व्यक्ती अशीच बघायची होती. हा  पुतळा आपल्याला देशाप्रती संपूर्ण समर्पित भावनेची शिकवण देईल, देशाविषयी निस्सीम प्रेमाची भावना निर्माण करेल आणि हाच स्वामीजींच्या आयुष्यातील महत्वाचा संदेश आहे, असे ते म्हणाले. हा पुतळा सर्वांच्या मनात एक राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करेल आणि युवा-प्रणित विकासाकडे देशाला घेऊन जाईल, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. हीच स्वामीजींची देशाकडून अपेक्षा होती, असे ते म्हणाले. एक मजबूत आणि समृद्ध भारत घडवण्याचे स्वामीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा पुतळा सर्वांना प्रेरणा देत राहो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1672444) Visitor Counter : 233