पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते येत्या 13 नोव्हेंबर 2020 रोजी भविष्यासाठी सज्ज- अशा दोन आयुर्वेदिक संस्थांचे जामनगर आणि जयपूर येथे उद्‌घाटन

Posted On: 11 NOV 2020 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  11 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 13 नोव्हेंबर 2020 ला, पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त, गुजरातच्या जामनगर येथे आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था-ITRA आणि राजस्थानच्या जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्था- NIA चे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्‌घाटन होणार आहे. एकविसाव्या शतकात आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर विकास करण्याच्या कार्यात या संस्थांचे मोठे योगदान असेल, अशी अपेक्षा आहे.

पार्श्वभूमी :

वर्ष 2016 पासून, धन्वंतरी जयंतीनिमित्त दरवर्षी आयुर्वेद दिन साजरा केला जातो. यंदा ही जयंती 13 नोव्हेंबरला आहे.आयुर्वेद दिवस म्हणजे केवळ एक उत्सव नसून, या व्यवसायाप्रती आणि समाजाप्रती अधिक समर्पित भावनेने काम करण्यासाठीची कटिबद्धता अधिक दृढ करण्याचा दिवस आहे. यावर्षीच्या आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमात, ‘कोविड-19 आजाराच्या व्यवस्थापनात आयुर्वेदाची भूमिका’, या विषयावर भर दिला जाणार आहे. 

आयुष अंतर्गतच्या आरोग्य व्यवस्थांमध्ये आजही पूर्णतः वापरल्या न गेलेल्या अनेक क्षमतांचा पुरेपूर वापर करणे शक्य आहे, ज्यातून देशातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रापुढे असलेल्या अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रभावी आणि परवडणाऱ्या उपाययोजना शोधण्यास सरकारचे प्राधान्य आहे.  त्यासाठीच, आयुष शाखांचे आधुनिकीकरण देखील प्राधान्याने करण्यावर भर देण्यात आला आहे. या अनुषंगाने, गेल्या तीन-चार वर्षात अनेक पावले उचलण्यात आली आहेत. जामनगर येथील राष्ट्रीय स्तरावरील आयुर्वेदिक संस्था आणि जयपूर येथील स्वायत्त आयुर्वेदिक विद्यापीठ, राष्ट्राला समर्पित करणे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. केवळ आयुर्वेदिक शिक्षणाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीनेच  नव्हे, तर प्राचीन वैद्यकशास्त्राच्या उत्क्रांतीचे हे पाऊल आहे.यामुळे आयुर्वेद शिक्षण अद्ययावत करण्याची संधी मिळेल. तसेच सध्याच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार अभ्यासक्रम निश्चित केले जाऊ शकतील. तसेच आधुनिक संशोधनाचा लाभ घेत आयुर्वेद चिकित्सापद्धतीबाबत अधिकाधिक संशोधन आणि पुरावे शोधता येतील.

 

Jaydevi.P.S/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1671946) Visitor Counter : 202