पंतप्रधान कार्यालय

भारत-इटली आभासी शिखर परिषद (6 नोव्हेंबर, 2020)

Posted On: 06 NOV 2020 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 नोव्‍हेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान प्राध्यापक जीसेपे  काँते यांच्या दरम्यान आज, दि. 6 नोव्हेंबर, 2020 रोजी आभासी  व्दिपक्षीय शिखर परिषद झाली.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी काँते यांनी सन 2018 मध्ये भारत भेटीची  आठवण केली. तसेच अलिकडच्या काळामध्ये भारत आणि इटली यांच्यामधील संबंध अधिक वेगाने वृद्धिंगत होत असल्याबद्दल कौतुक केले. सध्या कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर इटली दौ-यावर अवश्य येण्याचे निमंत्रण प्राध्यापक काँते यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले.

या आभासी शिखर परिषदेमुळे उभय नेत्यांना व्दिपक्षीय संबंधांविषयी व्यापक, सर्वंकष पुनरावलोकन करण्याची संधी उपलब्ध झाली. कोविड-19 महामारीसह संपूर्ण विश्वासमोर निर्माण झालेल्या इतरही आव्हानांच्या विरोधात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी असलेली बांधिलकीची पुष्टी दोन्ही नेत्यांनी केली.

यावेळी दोन्ही नेत्यांनी राजकीय, आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ आणि संरक्षण सहकार्य या विषयांवर व्यापक चर्चा केली. क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर विशेषतः जी 20 विषयी उभय पक्षी समन्वय साधण्यास सहमती दर्शविण्यात आली. डिसेंबर 2021मध्ये इटली जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. त्यापाठोपाठ सन 2022 मध्ये भारताकडे हे पद येणार आहे. भारत आणि इटली डिसेंबर, 2020 पासून जी-20 त्रयीचा हिस्सा असणार आहेत. इटलीने आयएसएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे भारताच्या वतीने स्वागत करण्यात आले. यासंबंधीची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होताच इटलीचा आयएसए मध्ये प्रवेश निश्चित होणार आहे.

या शिखर परिषदेमध्ये 15 सहकार्य सामंजस्य करार करण्यात आले. त्यामध्ये ऊर्जा, मत्स्यउद्योग, जहाज बांधणी, आरेखन आदि विविध क्षेत्रात सहकार्य करण्याचे यावेळी ठरवून करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या.

 

* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1670824) Visitor Counter : 117