पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद


तरूण अधिकाऱ्यांना देशहिताचे निर्णय घेण्याची सूचना

"आरंभ" हा इंटिग्रेटेड फाउंडेशन कोर्स म्हणजे फक्त सुरूवातच नाही तर नवीन परंपरेचे द्योतक- पंतप्रधान

नागरी सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना वोकल फॉर लोकल हा मंत्र लक्षात ठेवून आत्मनिर्भर होण्याचा सल्ला

Posted On: 31 OCT 2020 4:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑक्‍टोबर 2020

 

पंतप्रधानांनी आज भारतीय नागरी सेवेच्या LBSNAA मसूरी येथील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी (OTs) केवडिया येथून व्हीडियो कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. ही 2019 मध्ये सुरूवात झालेल्या ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाचा हा एक भाग होता.

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी तयार केलेली प्रेझेंटेशन्स बघितल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी या उमेदवारांनी “देशातील नागरिकांची सेवा हे नागरी सेवेतील व्यक्तीचे सर्वोच्च कर्तव्य आहे” या वल्लभभाई पटेलांच्या तत्वज्ञानाचे पालन करावे असे आग्रहाने सांगितले.

या तरूण अधिकाऱ्यांनी देशहित लक्षात घेऊन निर्णय घ्यावे व देशाची एकता व अखंडता कायम राखावी असे सांगत पंतप्रधानांनी प्रोत्साहन दिले. अधिकारी काम करत असलेल्या विभागाच्या मर्य़ादेची  बंधने असोत वा कोणत्याही प्रभागात काम करत असोत, नागरी सेवेतील अधिकाऱ्यांचे निर्णय सामान्य नागरीकांच्या हिताचे असले पाहिजे.

फक्त दैनंदिन कामांचे व्यवस्थापन हे देशाच्या ‘स्टील फ्रेम’चे उद्दीष्ट नसावे तर देशाची प्रगती हे लक्ष्य असावे या वर पंतप्रधानांनी भर दिला. संकटाच्या काळात तर याची सर्वात गरज असते असे त्यांनी नमूद केले.

नवनवीन लक्ष्ये गाठणे, नवे मार्ग स्वीकारणे आणि देशाला नवी दिशा देणे यासाठी कौशल्ये विकसित करण्यात प्रशिक्षणाचा मोठा हातभार लावतो असे सांगत पंतप्रधानांनी प्रशिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.

आधीपेक्षा आता मनुष्यबळाला प्रशिक्षण देणारे आधुनिक प्रकार देशात राबवले जात आहेत असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या दोन तीन वर्षात नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण नमून्यात खूप बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. आरंभ हा इंटिग्रेटेड फाउंडेशन कोर्स म्हणजो फक्त सुरूवातच नाही तर नवीन परंपरेचे द्योतक आहे असे त्यांनी नमूद केले.

मिशन कर्मयोगी या नागरी सेवेतील अधिकाऱ्यांसाठी हल्लीच झालेल्या बदलाचा त्यांनी संदर्भ दिला. नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून त्यांना जास्त निर्मितीक्षम आणि स्वतःवर विश्वास ठेवणारे बऩवण्याचा तो एक प्रय़त्न होता,  असे त्यांनी सांगितले.

वरपासून खालपर्यंत (टॉप डाउन पद्धतीने) सरकार  काम करत नाही. ज्यांच्यासाठी धोरणे आखली जातात त्या नागरिकांचा व्यवस्थेतील सहभागही महत्वाचा आहे. निष्ठाबळ असणारी माणसे हीच शासनाची खरी शक्ती असते असे ते म्हणाले.

मिनिमम गवर्नमेंट अँड मॅक्झिमम गवर्नन्स याची सिध्दता हाच सध्याच्या वातावरणात नोकरशाहीची भूमिका असायला हवी असंही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेप  आणि सर्वसामान्य माणसाचे सबलीकरण या दृष्टीने नोकरशाहीचे काम असले पाहिजे असे ते म्हणाले.

देशाच्या आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नातील वोकल फॉर लोकल हा मंत्र लक्षात ठेवण्याचा सल्ला नागरी सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी यावेळी दिला.

 

 

* * *

B.Gokhale/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1669101) Visitor Counter : 247