पंतप्रधान कार्यालय

अमेरिकेच्या संरक्षण आणि परराष्ट्र प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

Posted On: 27 OCT 2020 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2020

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पीओ आणि संरक्षण मंत्री डॉ. मार्क टी एस्पर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शुभेच्छा संदेश त्यांनी पंतप्रधानांना दिला. फेब्रुवारी 2020 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा यशस्वी झाला होता, त्याच्या आठवणी जाग्या करून त्यांनी पंतप्रधानांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. आज भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये करावयाच्या सहकार्याविषयी तसेच इतर क्षेत्रातल्या संयुक्त प्रकल्पांविषयी मंत्रीस्तरावर झालेल्या उपयुक्त आणि सकारात्मक संवादाची थोडक्यात माहिती अमेरिकेच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांना दिली. अमेरिकेचे सरकार भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच सामायिक दृष्टीकोन आणि उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी  एकत्रित काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे उभय मंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले.

उभय देशांच्या मंत्रीस्तरावरील ही तिसरी व्दिपक्षीय बैठक यशस्वी झाली असून या संवादातून निघालेल्या निष्कर्षाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. अलिकडच्या वर्षांमध्ये अशा प्रकारच्या बहुआयामी सर्वंकष वैश्विक व्यूहरचनात्मक भागीदारीच्या वृद्धीविषयी पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. यामुळे उभय देशांमध्ये विश्वास, सामायिक मूल्ये वृद्धिंगत होत आहे. तसेच उभयपक्षी संबंध अधिक दृढ होत असल्याचे नमूद केले.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667961) Visitor Counter : 215