पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी म्हैसूर विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी दीक्षांत सोहळ्याला संबोधित केले


शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती आणि संरचना सुधारणांवर विशेष लक्ष : पंतप्रधान

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांना नवीन दिशा आणि नवीन सामर्थ्य प्राप्त होईल: पंतप्रधान

देशातील सर्व शिक्षण स्तरांवर मुलींच्या एकूण पटनोंदणीचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त : पंतप्रधान

स्कीलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग काळाची सर्वात मोठी गरज: पंतप्रधान

Posted On: 19 OCT 2020 5:05PM by PIB Mumbai

                                                 नवी दिल्ली, 19 ऑक्‍टोबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी दीक्षांतसोहळा-2020 ला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले.

याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, म्हैसूर विद्यापीठ प्राचीन भारतातील महान शिक्षण केंद्र आणि भविष्यातील भारताच्या आकांक्षा आणि क्षमतांचे केंद्र आहे. विद्यापीठाने "राजर्षी" नलवडी कृष्णराज वाडियार आणि एम. विश्वेश्वरय्या जी यांचे स्वप्न साकार केले आहे.

त्यांनी या विद्यापीठात अध्यापन केलेल्या भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जी यांचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग वास्तविक जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावर करण्याचे आवाहन केले. त्यांनी वास्तविक जीवनाला एक महान विद्यापीठ म्हणून संबोधले जे ज्ञानाच्या वापरासाठीचे विविध मार्ग शिकवते.

पंतप्रधानांनी कन्नड लेखक आणि विचारवंत गोरूरु रामस्वामी अय्यंगर जी यांचे विचार उद्धृत केले ते म्हणजे, “शिक्षण जीवनातल्या कठीण काळात प्रकाश देते”.

ते म्हणाले, पायाभूत सुविधांची निर्मिती आणि संरचनात्मक सुधारणांचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत, जेणेकरुन 21 व्या शतकाच्या शैक्षणिक गरजा भागवता येतील. भारताला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी आणि युवकांमध्ये स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी गुणात्मक आणि परिणामात्मक प्रयत्न केले आहेत.

पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही 2014 मध्ये देशात केवळ 16 आयआयटी होत्या. गेल्या 6 वर्षांत, सरासरी दरवर्षी एक आयआयटी सुरु केली जात आहे. त्यापैकी एक धारवाड, कर्नाटक येथे आहे. ते म्हणाले, 2014 मध्ये देशात केवळ 9 आयआयटी, 13 आयआयएम आणि 7 एम्स होते. तर, गेल्या 5 वर्षांत 16 आयआयटी, 7 आयआयएम आणि 8 एम्स स्थापन केले आहेत किंवा काहींचे काम पूर्ण होत आहेत.

पंतप्रधान म्हणाले, गेल्या 5- 6 वर्षात उच्च शिक्षणातील प्रयत्न केवळ नवीन संस्था उघडण्यापुरते मर्यादित नाहीत तर समानता आणि सामाजिक समावेशकता सुनिश्चित करण्यासाठी या संस्थांमधील प्रशासकीय सुधारणांवरही काम केले गेले आहे. अशा संस्थांना अधिक स्वायत्तता दिली जात आहे जेणेकरून ते त्यांच्या गरजेनुसार निर्णय घेऊ शकतील.

ते म्हणाले, पहिला आयआयएम कायदा देशभरातील आयआयएम्सना अधिक स्वातंत्र्य देणारा आहे. वैद्यकीय शिक्षणात पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना करण्यता आली आहे. होमिओपॅथी आणि इतर भारतीय वैद्यकीय प्रणालींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी दोन नवीन कायदे केले आहेत.

पंतप्रधानांनी देशात सर्व शैक्षणिक पातळीवर मुलींची पटनोंदणी संख्या मुलांपेक्षा अधिक असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. 

पंतप्रधान म्हणाले की, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल घडवून आणून नवीन चालना देईल.

ते म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बहुआयामी आहे, लवचिक आणि जुळवून घेण्याजोग्या शैक्षणिक प्रणालीद्वारे आपल्या तरुणांना स्पर्धात्मक बनविणे हा याचा उद्देश आहे. ते म्हणाले, स्किलिंग (कौशल्य), रिस्किलींग आणि अपस्किलिंग ही काळाची मोठी गरज आहे.

देशातील एक सर्वोत्तम शिक्षण संस्था असल्यामुळे पंतप्रधानांनी म्हैसूर विद्यापीठाला  बदलत्या परिस्थितीनुसार नवीन शोध हाती घेण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यापीठाला इन्क्युबेशन केंद्र, तंत्रज्ञान विकास केंद्र, उद्योग-शैक्षणिक संबंध आणि 'आंतर-शाखीय संशोधन यावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. त्यांनी विद्यापीठाला स्थानिक, जागतिक आणि समकालीन मुद्द्यांसह स्थानिक संस्कृती, स्थानिक कला आणि इतर सामाजिक विषयांवर संशोधनास प्रोत्साहन देण्याची विनंती केली. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक सामर्थ्यावर उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.

 

* * *

M.Iyengar/S.Thakur/D.Ran

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1665831) Visitor Counter : 193