पंतप्रधान कार्यालय

अन्न आणि कृषी संघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानाच्या हस्ते 75 रुपयांच्या विशेष नाण्याचे प्रकाशन


पंतप्रधानांच्या हस्ते आठ पिकांच्या नव्याने विकसित 17 बायोफोर्टीफाईड  वाणांचेही राष्ट्रार्पण

Posted On: 14 OCT 2020 1:56PM by PIB Mumbai

 

अन्न आणि कृषी संघटना (FAO)च्या 75 व्या वर्धापनदिना निमित्त, येत्या 16 ऑक्टोबर 2020 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते,75 रुपयांच्या एका विशेष नाण्याचे प्रकाशन होणार आहे.या संघटनेने गेली अनेक वर्षे कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, हे नाणे जारी  केले जाणार आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते, आठ पिकांच्या 17 नव्याने विकसित फोर्टीफाईड म्हणजेच, अधिक पोषणमूल्य असलेल्या वाणांचेही राष्ट्रार्पण केले जाईल.

केंद्र सरकारने कृषी आणि पोषाहाराला दिलेले सर्वोच्च महत्व आणि देशातून भूक, अल्पपोषण आणि कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्याचा दृढनिश्चय आणि कटीबद्धता व्यक्त करणारा हा कार्यक्रम आहे. अंगणवाड्या, कृषी विज्ञान केंद्र, सेंद्रिय आणि बागायती अभियान या सर्व ठिकाणी ऑनलाइन स्वरुपात हा कार्यक्रम बघता येईल. केंद्रीय कृषी मंत्री, वित्त मंत्री आणि महिला व बालकल्याण मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

 

भारत आणि अन्न व कृषी संघटना

देशातील दुर्बल घटक आणि सर्वसामान्य जनतेला आर्थिक तसेच पोषक आहारादृष्ट्या अधिक मजबूत बनवण्यासाठी, अन्न आणि कृषी संघटनेने आजवर केलेले कार्य अतुलनीय आहे. भारतीय सनदी अधिकारी डॉ बिनय रंजन सेन यांनी वर्ष 1956-1967 मध्ये या संस्थेचे महासंचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. यंदा, म्हणजेच 2020 साली नोबेल शांतता पुरस्काराचा मानकरी ठरलेला, जागतिक अन्न कार्यक्रम त्यांच्याच कारकीर्दीत स्थापन करण्यात आला होता. वर्ष 2016 हे डाळींसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून आणि 2023 हे बाजरीसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करावे, अशा भारताच्या दोन्ही प्रस्तावांचे अन्न आणि कृषी संघटनेने स्वागत आणि कौतुक केले आहे.

 

कुपोषणावर प्रहार :- 

देशातील आकडीचा आजार, अल्पपोषण, अशक्तपणा आणि जन्माच्या वेळी वजन कमी असणे, या सगळ्या समस्यांवर  मात करण्यासाठी केंद्र सरकारने पोषणही अत्यंत महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. कुपोषण ही एक जागतिक समस्या असून, जगभरातील सुमारे दोन अब्ज लोक पोषाहाराच्या कमतरतेचा सामना करत असतात. मुलांच्या अपमृत्यूपैकी 45 टक्के मृत्यू, कुपोषणाशी सबंधित समस्यांमुळे होतात. त्यामुळेच, संयुक्त राष्ट्रसंघाच्या 17 शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये, या समस्येवर तोडगा काढण्याचाही समावेश आहे. 

आंतरराष्ट्रीय प्राधान्यक्रमाशी सुसंगत भूमिका घेत, भारत सरकारनेही देशात पोषक आहाराला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यानुसारच, दर्जेदार पोषक आहारयुक्त पिकांच्या वाणांवर संशोधन करून, ही वाणे अधिकच उन्नत करण्यात आली आहेत. यात, लोह, जस्त, कॅलशियम, समग्र प्रथिने, प्रथिनांचा उत्तम दर्जा, ट्रायटोफान आणि लिसिन हे अमायनो आम्ल, प्रो व्हिटामिन, ओलिक आम्ल असे पोषणासाठी आवश्यक पदार्थ असतील.  

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या(ICAR) मार्गदर्शनाखाली, कार्यरत राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेने गेल्या पाच वर्षात असे 53 वाण विकसित केले आहेत. 2014 पूर्वी असे बायोफोर्टीफाईड म्हणजेच, अधिक पोषणमूल्य असलेले केवळ एकच वाण विकसित झाले होते.

 

भारतीय जेवणाची थाळी पोषाहारयुक्त थाळी म्हणून विकसित करणे

अलीकडेच, आठ पिकांवर संशोधन करुन विकसित करण्यात आलेल्या 17 बायोफोर्टीफाईड वाणांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार असून, या वाणांमुळे या पिकांचे पोषणमूल्य तिपटीने वाढणार आहे. सीआर धान 315 ही तांदळाच्या जातीत जस्त मोठ्या प्रमाणावर आढळते. तर एचआय 1633 या गव्हाच्या वाणात प्रथिने, लोह आणि जस्त आहे. HD 3298 तांदळात प्रथिने आणि लोह तर DBW 303 आणिDDW 48 या गव्हाच्या जातीत, प्रथिने असतात. हायब्रीड मक्याच्या लाधोवाल वाणात प्रथिने आणि लिसिन तसेच ट्रायटोफान ही अमायनो आम्ले असतात. बाजरीत कॅल्शियम, लोह आणि जस्त असते. तर पुसा मोहरी 32, मध्ये इरोकिक आम्ल आणि गिरनार शेंगदाण्यात ओलिक आम्ल, आणि याम वाण श्री नीलिमा तसेच DA 340 मध्ये जस्त, लोह असते.

या सर्व वाणांमुळे, इतर अन्नपदार्थांसह भारतीय थाळी एक पोषणआहार युक्त थाळी ठरणार आहे. ही वाणे विकसित करतांना स्थानिक देशी वान आणि शेतकऱ्याकडे असलेली वाणे यांचा वापर करण्यात आला आहे. आसामच्या गारो हिल्स येथून मिळवलेल्या तांदळाच्या स्थानिक देशी वाणातून उच्च जस्तयुक्त धान तयार करण्यात आला आहे, तर गुजरातच्या डांग जिल्ह्यातून मिळालेल्या बाजरीच्या देशी वाणातून उन्नत वाण विकसित करण्यात आले आहे.

कृषीक्षेत्राला पोषाहाराशी जोडण्यासाठी, ICAR ने पोषण-आधारित  कृषी संसाधने आणि नवोन्मेष कार्यक्रम विकसित केला आहे. यात कुटुंबशेती, ग्रामशेतीचीही सांगड घालण्यात आली आहे. ज्यातून प्रत्येक गावातत्या त्या स्थानिक वातावरण आणि आहारविहारानुसार पोषण सुरक्षा विकसित होईल. कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून अशा पोषणयुक्त  धान्याचे वितरण आणि प्रचार केला जातो. तसेच स्थानिक पातळीवर, असे सुदृढ, पोषणयुक्त धान्य मिळण्याची व्यवस्था केली जाते.

या बायोफोर्टीफाईड अन्नधान्याची सांगड देशाची माध्यान्ह भोजन योजना, अंगणवाडी इत्यादींशी घातली जाऊन मुलांपर्यंत हे विकसित धान्य पोचवले जाईल. ज्यातून नैसर्गिक पोषाहारातूनच कुपोषण मुक्त भारताचे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. यातून शेतकऱ्याचे उत्पन्नही वाढेल आणि उद्यमशीलता विकसित होण्याचे मार्ग खुले होतील.

******

U.Ujgare/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1664289) Visitor Counter : 312