पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्र प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी केलेले भाषण

Posted On: 13 OCT 2020 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, चंद्रकांत पाटील जी, राधाकृष्ण पाटील जी, सुजय विखे पाटील जी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर लोकप्रतिनिधी गण, माझे सर्व शेतकरी बंधू, भगिनी आणि सज्जन, छत्रपती शिवाजी महाराज तसेच वीर-वीरांगना आणि कर्मयोग्यांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो!!

राधाकृष्ण विखे पाटील जी, त्यांचे कुटुंबिय आणि अहमदनगरच्या सर्व मित्रांचे मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्या आमंत्रणामुळे मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. आधी खरंतर तिथे येण्याचे निश्चित ठरले होते. आपल्यामध्ये येवून या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार होतो. परंतु कोरोनामुळे आज असा आभासी कार्यक्रम करावा लागत आहे.

मित्रांनोडॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन भले आज झाले असेल, परंतु त्यांच्या जीवनाची कथा तर आपल्याला महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पहायला मिळेल. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटलांच्या पावलावर पाऊल टाकत बाळासाहेब विखे पाटलांनी केलेली मार्गक्रमणा मीसुद्धा अगदी जवळून पाहिली आहे. बाळासाहेब विखे पाटलांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वतःला समर्पित केले होते. गाव, गरीब शेतक-याचे जीवन अधिक सुलभ-सुकर-सुसह्य बनविणे, त्यांचे दुःखं, त्यांचे त्रास कमी करणे हाच विखे पाटील जी यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. आपल्या आत्मचरित्रामध्येही त्यांनी लिहिले आहे –

‘‘मी स्वतः सत्तेपासून वा राजकारणापासून अलिप्त राहिलो नाही, मात्र ‘समाजासाठीच राजकारण आणि सत्ता’ हे पथ्य मी कायम सांभाळले. राजकारण करताना माझा सतत समाजाचे प्रश्न सोडवण्यावर भर राहिला.’’

त्यांनी सत्ता आणि राजकारण यांच्या माध्यमातून नेहमीच समाजाच्या भल्याचा प्रयत्न केला. राजकारण हे समाजामध्ये सार्थक परिवर्तनाचे माध्यम कसे बनवता येईल, यावरच त्यांनी नेहमी भर दिला. गाव आणि गरीबांच्या समस्यांचे समाधान कसे होईल, हे त्यांनी पाहिले. बाळासाहेब विखे पाटीलजींचे नेमके हेच विचार ते इतरांपेक्षा वेगळे आहेत, हे दर्शवतात. याच कारणामुळे आजही प्रत्येक पक्ष, प्रत्येक गट त्यांचा खूप आदर, सन्मान करतात. गावातल्या गरीबांच्या विकासासाठी, शिक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान असो, महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र यशस्वी ठरावे, म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न असो, हे सर्व आगामी पिढ्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल. म्हणूनच बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवनकार्यावरचे हे पुस्तक सर्वांसाठी खूप महत्वपूर्ण आहे.

मित्रांनो, डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी गाव, गरीब आणि शेतकरी बांधवांचे दुःख, त्यांच्या यातना अगदी जवळून पाहिल्या, त्या जाणल्याही परिस्थिती अनुभवली. म्हणूनच त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना एकत्र केलं. त्यांना सहकाराच्या माध्यमातून जोडले. या क्षेत्रामध्ये कोणे एके काळी सर्व गोष्टींचा अभाव होता, लोकांना अशा अभावग्रस्त स्थितीमध्ये जगण्याशिवाय पर्याय नव्हता. आज त्याच क्षेत्राचे चित्र अगदी बदलून गेले आहे. सहकाराच्या महत्वाविषयी त्यांनी लिहिले आहे की - ‘‘ सहकारी चळवळ ही ख-या अर्थाने निधर्मी चळवळ आहे. ती कुठल्याही एका जातीची किंवा धर्माची बटीक नाही. आत्तापर्यंत सगळ्या समाजाला, जातींनाही प्रतिनिधित्व दिले आहे. याचाच अर्थ सहकार चळवळ मोहीम ही ख-या अर्थांने निःष्पक्ष होती. या चळवळीचा कोणत्याही जाती आणि पंथाशी कोणत्याही प्रकारे घेणे-देणे नव्हते. त्यामध्ये समाजाच्या सर्व वर्गांला प्रतिनिधित्व होते. एक प्रकारे त्यांच्यासाठी तर सहकार चळवळ म्हणजे  सर्वांना बरोबर घेवून सर्वांच्या कल्याणाच्या मार्गावरून वाटचाल करणे होते. केवळ महाराष्ट्रच नाही तर अटलजी यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी देशात अनेक क्षेत्रांमध्ये सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले. यासाठी प्रयत्नही केले. त्यांच्या या आत्मचरित्राला दिलेले ‘देह वेचावा कारणी’ हे शीर्षकही अतिशय प्रासंगिक आहे, अगदी योग्य आहे. संत तुकाराम महाराजांच्या या एका ओळींमध्ये बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवनाचे सार आहे.

मित्रांनो, ज्यावेळी देशामध्ये ग्रामीण शिक्षणाविषयी फारशी चर्चाही होत नव्हती, त्यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गावांमधल्या युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. या मंडळाच्या माध्यमातून गावातल्या युवकांच्या शिक्षण आणि कौशल्य विकासाविषयी गावामध्ये चेतना जागविण्यासाठी त्यांनी जे काम केले आहे, ते आपण सर्वजण खूप चांगल्या प्रकारे जाणतो. अशामध्ये आजपासून प्रवरा ग्रामीण शिक्षण मंडळाबरोबर आता बाळासाहेबांचे नाव जोडले जाणे उचित आहे. ते गावांमध्ये, शेतांमध्ये शिक्षणाचे महत्व जाणून होते. त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिले आहे- ‘‘ शेतीचं कौशल्य असल्याशिवाय सुशिक्षित माणूसही सहज शेती करू शकत नाही. खरंतर शेतीला एंटरप्राइज का म्हणत नाहीत?’’ याचाच अर्थ व्यक्ती कितीही शिकलेला असला तरी त्याच्याकडे जर शेती करण्याचे कौशल्य नसेल तर तो शेती करू शकणार नाही. जर अशी गोष्ट असेल तर मग आपण शेतीला एंटरप्राइज- उद्योग- असे का म्हणत नाही?

मित्रांनो, बाळासाहेब विखे पाटलांच्या मनामध्ये हा प्रश्न काही उगाच सहज म्हणून आलेला नाही. जमिनी स्तरावर अनेक दशके काम केल्यानंतर त्यांनी जे काही अनुभवले, त्याच्या आधारे त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. बाळासाहेब विखे पाटील यांच्या या प्रश्नाचे उत्तर आजच्या ऐतिहासिक कृषी सुधारणा कायद्यामध्ये आहे. आज शेतीला, शेतक-याला अन्नदात्याच्या भूमिकेच्याही पुढे नेवून  उद्योजक बनविणे, त्याला आंत्रप्रेनरशिपच्या दिशेने जाण्यासाठी संधी तयार करण्यात येत आहे. साखर उद्योगाने महाराष्ट्रामध्ये जी क्रांती केली आहे, दुधाने जी क्रांती गुजरातमध्ये घडवून आणली आहे, जे परिवर्तन गव्हाने पंजाबामध्ये केले आहे, स्थानिक अर्थव्यवस्था, स्थानिक उद्योग हे मॉडेल देशाला पुढे घेवून जाणार आहे.

मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर एक असाही काळ होता की, ज्यावेळी देशाकडे पोट भरण्याइतके पुरेसे अन्न नव्हते. त्या परिस्थितीमध्ये पिकांच्या उत्पादन वाढीचा विचार करणे, याला सरकारचे प्राधान्य होते, त्यामुळे संपूर्ण लक्ष शेतकरी बांधव कोणते पिक घेत आहेत, किती उत्पन्न, किती अन्नधान्य घेत आहेत, याकडेच फक्त दिले जात होते. आमच्या शेतकरी बांधवांनी आपला घाम गाळला, अगदी जीव तोडून परिश्रम केले आणि देशाच्या गरजेपेक्षा जास्तीत जास्त अन्नधान्य पिकवले. परंतु उत्पादकतेच्या चिंतेत असणाऱ्या सरकारांनी, त्यांच्या धोरणांनी शेतकरी बांधवांना किती नफा होतो, याचा कधीच विचार केला नाही, लक्ष दिले नाही. शेतक-याला किती उत्पन्न मिळते, हेही पाहिले पाहिजे, याचाच लोकांना विसर पडला. परंतु देशामध्ये पहिल्यांदाच या विचारामध्ये बदल करण्यात आला आहे.

देशाने पहिल्यांदाच शेतकऱ्याच्या उत्पन्नाविषयी चिंता केली आहे. त्याचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मग त्यासाठी किमान आधारभूत मूल्य लागू करणे असोत्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेणे असो, यूरियाला निंबोणीचा थर देण्याचा निर्णय असो, अधिक चांगली- लाभदायक पीक विमा योजना असो, सरकारने शेतकरी बांधवांच्या प्रत्येक लहान-लहान समस्या दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत. पीएम-किसान सन्मान निधी योजनेमुळे शेतक-यांच्या छोट्या-छोट्या खर्चांसाठी इतरांकडे पैसे मागायला लागू नये, याची सोय करून दिली आहे. पैसे मागण्याच्या त्रासातून एकप्रकारे सरकारने त्यांना मुक्त केले आहे. या योजनेतून एक लाख कोटी रुपये थेट शेतक-यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरीत करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर शीतगृह शृंखला, मेगा फूड पार्क आणि कृषी प्रक्रिया पायाभूत सुविधांवर खूप प्रचंड प्रमाणावर काम झाले आहे. गावांतल्या बाजारांपासून ते मोठ्या बाजारपेठांपर्यंत सर्वांचे आधुनिकीकरण केले आहे, त्याचाही लाभ शेतकरी बांधवांना होवू लागला आहे.

मित्रांनो, बाळासाहेब विखे पाटील म्हणत होते- ‘‘शेती निसर्गाधारित केली जात होती. हे ज्ञान आज सांभाळून ठेवलं पाहिजे. तसेच नव्या आणि जुन्याचा मेळ तरी घातला पाहिजे.’’ म्हणजेच आधीच्या काळी शेती-वाडी नैसर्गिक परिस्थिती ध्यानात घेवून केली जात होती. आधीच्या त्या कृषी ज्ञानाला आपण सुरक्षित ठेवले पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये नवीन आणि जुन्या पद्धतीचा मेळ घालणे खूप आवश्यक आहे. नवीन आणि जुन्या पद्धतीचा मेळ घालून केलेल्या शेतीचे अगदी योग्य उदाहरण म्हणजे - उसाची शेती आहे. अहमदनगर, पुणे आणि परिसरातल्या क्षेत्रामध्ये  तर हे अधिकच महत्वाचे आहे. आता उसापासून साखर बनविण्याबरोबरच इथेनॉल तयार करण्याचे उद्योगही सुरू होत आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या जवळपास 100 असे उद्योग सुरू आहेत आणखी डझनावारी नवी उद्योगांना सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व ती मदत करण्यास स्वीकृतीही देण्यात आली आहे. जसजसे पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वापराची क्षमता वाढेल, तसतसे तेलाच्या खरेदीसाठी आपला जो पैसा बाहेर जातो, तो पैसा शेतकरी बांधवांच्या खिशामध्ये येणार आहे.

मित्रांनो, डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील हे महाराष्ट्रातल्या गावांमध्ये असलेल्या आणखी एका समस्येवर तोडगा काढण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील होते. ही समस्या आहे पेयजलाची आणि कृषी क्षेत्रासाठी लागणा-या सिंचनासाठी पाण्याची! महाराष्ट्रामध्ये पाणी परिषदांच्या माध्यमातून त्यांनी या दिशेने एक जन-आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न केला होता. आज मला आपण आनंदाने असे म्हणू शकतो की, सन 2014 नंतर अशा प्रयत्नांना अभूतपूर्व बळ दिले गेले आणि देवेंद्रजी यांच्या सरकारची ओळखच या पाण्यासाठी केलेल्या कामामुळे गावां-गावांमध्ये, घरां-घरांपर्यंत पोहोचली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या 26 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करण्यात आले. यामध्ये आत्तापर्यंत 9 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनांच्या पूर्तीमुळे जवळ-जवळ पाच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. याच प्रकारे जुलै 2018 मध्ये महाराष्ट्रातल्या लहान-मोठ्या आणखी 90 सिंचन प्रकल्पांवर काम सुरू करण्यात आले होते. आगामी 2-3 वर्षांमध्ये ज्यावेळी ही कामे पूर्ण होतील, त्यावेळी जवळपास 4 लाख हेक्टर भूमी सिंचनाखाली येणार आहे. राज्यातल्या 13 जिल्ह्यांमधली भूजल पातळी अतिशय कमी आहे. या जिल्ह्यांमध्ये अटल भूजल योजना सुरू करण्यात आली आहे.

मित्रहो, केवळ सिंचनच नव्हे तर गावांमध्ये प्रत्येक  कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे कामही महाराष्ट्राच्या भूमीवर वेगाने सुरू आहे.जल जीवन मिशन अंतर्गत गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात 19 लाख कुटुंबांना शुद्ध पाणी सुविधा पुरवण्यात आली आहे.यापैकी 13 लाख पेक्षा जास्त गरीब कुटुंबाना तर कोरोना महामारीच्या काळातही पाणी पोहोचवण्याचे काम करण्यात आले.ज्या प्रकारे घरा-घरात शौचालय बांधून भगिनींना सन्मान आणि सुविधा पुरवण्यात आली त्याच प्रमाणे घरा घरात नळाने पाणी पुरवठा करून त्यांचा वेळ आणि कष्ट वाचवण्याचा प्रयत्न आहे. शुद्ध पाणी आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे.

मित्रहो, गावांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेत, सूक्ष्म वित्तची विशेष भूमिका आहे.मुद्रा सारख्या योजनेतून गावांमधे स्वयं रोजगाराच्या शक्यता वाढल्या आहेत.गेल्या वर्षांमध्ये देशात स्वयं सहाययता गटाशी संबंधित सुमारे 7 कोटी भगिनींना 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज देण्यात आले आहे.शेतकरी,पशुपालक आणि मच्छीमार या तीनही घटकांना बँकांकडून सुलभ कर्ज मिळावे यासाठी त्यांना किसान क्रेडिट कार्डाची सुविधा देण्यात आली आहे.सुमारे अडीच कोटी छोटी शेतकरी कुटुंबे जी आधी किसान क्रेडिट कार्डा पासून वंचित होती त्यांना अभियान चालवून सुविधा देण्यात येत आहे.

मित्रहो, गावात, गावकऱ्यात, गरिबांमध्ये विश्वास निर्माण होईल, त्यांचा आत्मविश्वास दृढ होईल, तेव्हा आत्मनिर्भरतेचा संकल्पही दृढ होईल. गावांमधे आत्मनिर्भरतेचा हाच विश्वास बाळासाहेब विखेपाटील यांनाही जागृत करायचा होता. हा आत्मविश्वास ते जागृत करत राहिले.जे त्यांच्या आत्मचरित्राचे वाचन करतील त्यांच्यात नवी चेतना जागृत होईल. बाळासाहेब विखे पाटील यांना पुन्हा एकवार आदरपूर्वक नमन करत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.

मात्र संबोधन समाप्त करण्यापूर्वी एक गोष्ट जरूर सांगू इच्छितो आणि महाराष्ट्राच्या जनतेला विशेषकरून सांगू इच्छितो, कोरोनाचा धोका अद्यापही आहे.महाराष्ट्रात ही चिंता थोडी अधिक आहे म्हणून महाराष्ट्राच्या सर्व नागरिक बंधू-भगिनींना प्रार्थना आहे की चेहऱ्यावर मास्क,वारंवार हात धुणे, सुरक्षित शारीरिक अंतर, या नियमांचा वापर करण्यात थोडाही निष्काळजीपणा नको.औषध नाही तोपर्यंत जराही कुचराई नाही हे आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायचे आहे.

बाळासाहेबांच्या कुटुंबाच्या चार पिढ्या समाज सेवेत मग्न राहिल्या, संपूर्ण कुटुंबाला पुन्हा एकदा आदरपूर्वक नमन. चार पिढ्या समाजसेवेत ही छोटी बाब नाही, आनंदाची बाब ही की, प्रत्येक पिढी जास्त कार्य करत आहे, उत्तम कार्य करत आहे, नाहीतर आपण जाणतो की काही पिढ्यात ,एका पिढीनंतर दुसरी पिढी थोडी कमी ताकदवान दिसून येते, तिसरी पुढे आणखी कमजोर आणि हळूहळू खालावत जाते.मात्र बाळासाहेबांचे संस्कार असे आहेत,की त्यांच्या सर्व पिढ्या उत्तरोत्तर अधिक शक्तिशाली, जन सेवेत मग्न आहेत, अशा कुटुंबाला आज प्रणाम करण्याची ही संधी आहे.

आपणा सर्वांचे खूप- खूप आभार.

धन्यवाद.

B.Gokhale/S.Bedekar/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1664039) अभ्यागत कक्ष : 257