आदिवासी विकास मंत्रालय
आगळ्या उपक्रमाअंतर्गत आदिवासी उत्पादनासाठीच्या ‘ट्राईब्स इंडिया ई-मार्केट प्लेस‘ या सर्वात मोठ्या बाजारपेठेचे अर्जुन मुंडा यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार
Posted On:
01 OCT 2020 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2020
केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा, गांधी जयंतीचे औचित्य साधून उद्या 2 ऑक्टोबर 2020 ला भारताच्या सर्वात मोठ्या हस्तकला आणि सेंद्रिय उत्पादन बाजार पेठेचे ‘ट्राईब इंडिया ई- मार्केट प्लेस ‘(market.tribesindia.com) व्हर्च्यूअल माध्यमातून उद्घाटन करतील. आदिवासी विकास राज्य मंत्री रेणुका सिंग आणि आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प लक्षात घेऊन आदिवासी विकास मंत्रालया अंतर्गत ट्रायफेडने हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. देशभरातल्या आदिवासी उद्योगाची उत्पादने आणि हस्तकला इथे मांडण्यात येणार असून या उत्पादनांना थेट बाजारपेठेत आणण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. आदिवासी निर्मित वस्तूंच्या व्यापाराचे डीजीटायझेशन करण्याच्या दिशेने ही मोठी झेप आहे.
आदिवासी बांधवांना सहाय्य करण्यासाठीच्या ट्रायफेडच्या इतर अनेक उपक्रमानाही मुंडा हिरवा झेंडा दाखवतील. ट्राईब इंडिया च्या 123 व्या दालनाचे ऋषिकेश इथे तर 124 व्या दालनाचे कोलकाता इथे उद्घाटन,झारखंड आणि छत्तीसगड या राज्यातल्या नव्या आदिवासी उत्पादनांचा समावेश, सेलर फ्लेक्स कार्यक्रमासाठी ट्रायफेड/ ट्राईब इंडियाची ॲमेझॉनसमवेत भागीदारी यांचा यात समावेश आहे. ट्रायफेड/ ट्राईब इंडियाच्या पाकुर हनी हा 100 % नैसर्गिक मधाचेही मुंडा यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. झारखंड मधल्या पाकुर इथली संथाल जमात, वनातला हा मध गोळा करते.
देशभरातल्या 5 लाख आदिवासी उत्पादकांच्या हस्तकला, हातमाग, नैसर्गिक अन्न उत्पादने, ट्राईब इंडिया ई- मार्केट प्लेस या महत्वाकांक्षी उपक्रमा द्वारे लोकांसमोर आणण्याचा ट्रायफेडचा उद्देश आहे. वैयक्तिक कारागीर, आदिवासी स्वयं सहाय्यता गट, आदिवासींसाठी काम करणाऱ्या संस्था, एजन्सी, सामाजिक संघटना यासाठी पुरवठादार राहतील. वस्तू विक्रीसाठी त्यांना त्यांचे स्वतःचे वितरक, ट्रायफेडच्या दालनांचे जाळे,ई कॉमर्स भागीदार अशा विविध माध्यमांबरोबरच स्वतःच्या ई बाजारपेठेचा पर्यायही या मंच द्वारे उपलब्ध राहणार आहे.
या ई बाजार पेठेमुळे मोठ्या प्रमाणात आदिवासी कारागिरांना एकत्र आणून त्यांना ऑनलाईन व्यापाराचा तत्काळ लाभ देणे शक्य होणार असल्याचे, ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा यांनी सांगितले. यामुळे आदिवासी जमातींसाठी उपजीविका सुनिश्चित होण्यासाठी मदत होणार असून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतातली आदिवासी उत्पादने आणि हस्तकला वस्तू एकाच ठिकाणी ई बाजारपेठेत उपलब्ध होणार असून वेब आणि मोबाईल (एड्रोइड आणि आयओएस ) द्वारे ग्राहक आणि नोंदणीकृत विक्रेते अशा दोघानाही याचा लाभ घेता येईल.
ट्रायफेड च्या इतर उपक्रमांचा आणि भागीदारीचाही यावेळी प्रारंभ होणार असून यामुळे आदिवासी कारागीर आणि पुरवठादार यांचा समावेशी विकास आणि त्यांचे सबलीकरण दृढ करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
ऋषिकेश आणि कोलकाता इथे दोन नव्या ट्राईब इंडिया दालनांचे उद्घाटन-
स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘बी व्होकल फॉर लोकल’ हा पंतप्रधानांचा मंत्र घेऊन आदिवासी कारागिरांना बाजारपेठे मार्फत उपजीविका उपलब्ध करून देण्याचा वसा सुरु ठेवत ट्रायफेडने देशभरातल्या आपल्या किरकोळ विक्रीच्या दालनाचा विस्तार सुरु ठेवला असून . ट्राईब इंडियाच्या 123 व्या दालनाचे ऋषिकेश इथे तर 124 व्या दालनाचे कोलकाता इथे उद्घाटन होणार आहे.
झारखंड आणि छत्तीसगड या राज्यातली नवी उत्पादन श्रेणी –
ट्राईब इंडियाच्या उत्पादनात झारखंड आणि छत्तीसगड या राज्यातल्या दोन नव्या उत्पादन श्रेणीची भर पडणार आहे.
पाकुर हनी-
झारखंड मधल्या पाकुर जिल्ह्यातल्या संथाळ समुदायाने व्यावसायिक मधुमक्षिका पालनाच्या शक्यता अजमावत नवे उदाहरण घालून दिले आहे. स्थानिक युवक पर्यावरण स्नेही पद्धतीने मध गोळा करतात. हा नैसर्गिक मध दोन स्वादात उपलब्ध असेल.
सेलर फ्लेक्स कार्यक्रमासाठी ट्राईब इंडियाची ॲमेझॉनसमवेत भागीदारी –
ॲमेझॉनसमवेतची दीर्घकालीन भागीदारी अधिक दृढ करत ट्रायफेड आता सेलर फ्लेक्स कार्यक्रमासाठीही ॲमेझॉनसमवेत भागीदारी करणार आहे.
हे उपक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरावेत यासाठी ट्रायफेड कसोशीने प्रयत्न करत असून यातून या समुदायांचे आर्थिक कल्याण साध्य होणार असून विकासाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेण्यासाठी मदत होणार आहे.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660726)
Visitor Counter : 203