अर्थ मंत्रालय
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आज 'चेहराविरहित अपील पद्धतीचा' केला प्रारंभ- प्रामाणिकतेचा सन्मान
Posted On:
25 SEP 2020 5:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2020
प्राप्तिकर विभागाने आज 'चेहराविरहित प्राप्तिकर अपील' प्रणालीचा प्रारंभ केला. या अंतर्गत, प्राप्तिकरासंबंधीच्या सर्व अपिलांना चेहराविरहित वातावरणात चेहराविरहित पद्धतीने अंतिम स्वरूप देण्यात येईल. मात्र, गंभीर अफरातफरी, मोठ्या प्रमाणातील करचुकवेगिरी, संवेदनशील आणि तपासाबाबतची प्रकरणे, आंतरराष्ट्रीय कर आणि काळापैसा कायदा- याविषयीच्या प्रकरणांचा त्याला अपवाद असेल. याविषयीची राजपत्र अधिसूचनाही आज काढण्यात आली.
दि. 13 ऑगस्ट 2020 रोजी माननीय पंतप्रधानांनी, 'पारदर्शक करप्रणाली- प्रामाणिकतेचा सन्मान' मंचाचा भाग म्हणून, 'चेहराविरहित मूल्यांकन आणि करदाते' सनदीचा प्रारंभ करताना, 'पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीला- म्हणजे 25 सप्टेंबर 2020 रोजी चेहराविरहित अपिलांचा प्रारंभ होईल, असे जाहीर केले होते. तसेच, गेल्या काही वर्षात, प्राप्तिकर विभागाने करप्रक्रिया सुलभ होण्यासाठी व करदात्यांच्या सोयीसाठी प्रत्यक्ष करांबाबत अनेक सुधारणा केल्या आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.
आता, चेहराविरहित अपिलाच्या अंतर्गत प्राप्तिकराच्या अपिलांविषयीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण होणार असून, येथून पुढे अपील करणारी व्यक्ती आणि प्राप्तिकर विभाग यांमध्ये कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष संपर्काची गरज पडणार नाही. यात अपिलाचे इ-वितरण, नोटिशी किंवा प्रश्नावली इ-पद्धतीने कळविणे, इ-पडताळणी / इ-चौकशी पासून ते इ-सुनावणी आणि शेवटी अपिलीय आदेश इ-पद्धतीने कळविणे या साऱ्या टप्प्यांचा समावेश आहे. करदाते अगर त्यांचे प्रतिनिधी यांचा प्राप्तिकर विभागाशी कोणताही प्रत्यक्ष संपर्क येणार नाही. करदात्यांना त्यांच्या घरी बसून शांतपणे माहिती भरता येणार असल्याने त्यांच्या वेळेची आणि अन्य संसाधनांची बचत होऊ शकणार आहे.
चेहराविरहित अपील प्रणालीअंतर्गत, माहिती विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या उपयोगातून प्रकरणांचे वितरण केले जाणार असून, यासाठी कार्यक्षेत्राचा व्यापक विचार केला जाणार आहे. DIN म्हणजे डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नम्बर अर्थात दस्तऐवज परिचय क्रमांकही दिला जाणार आहे. अपिलाच्या आदेशाचा मसुदा एका शहरात तयार होईल तर त्याचे पुनर्परीक्षण दुसऱ्या शहरात होईल. यामुळे वस्तुनिष्ठ, न्यायसंमत आणि उचित पद्धतीने आदेश तयार होईल. चेहराविरहित अपील प्रणालीमुळे करदात्यांचा तर फायदा होईलच शिवाय, न्यायसंमत आणि उचित अपील आदेश निघाल्याने पुढच्या संभाव्य कायदेशीर कृतींचे प्रमाण कमी होईल. या नवीन प्रणालीमुळे प्राप्तिकर विभागाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायिता येण्यास मदत होणार आहे.
CBDT म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे उपलब्ध माहितीनुसार आजमितीला विभागात अपिलीय आयुक्त स्तरावर सुमारे 4.6 लाख अपिले प्रलंबित आहेत. यापैकी सुमारे 4.05 लाख म्हणजे एकूण संख्येच्या अंदाजे 88 % अपिले चेहराविरहित अपील प्रणालीद्वारे हाताळली जातील आणि अपिलीय आयुक्तांच्या सध्याच्या संख्येच्या जवळपास 85% भाग यातील प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी वापरला जाईल.
* * *
B.Gokhale/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659067)
Visitor Counter : 303