पंतप्रधान कार्यालय
आयआयटी गुवाहाटीच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान मोदी यांचे भाषण
आयआयटी गुवाहाटीने आपत्ती व्यवस्थापन आणि धोका प्रतिबंधन केंद्र उभारावे- पंतप्रधानांचे आवाहन
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मुळे भारत जागतिक शिक्षणाचे महत्वाचे केंद्र बनेल-पंतप्रधान
Posted On:
22 SEP 2020 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयआयटी गुवाहाटीच्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात, ‘ज्ञानम् विज्ञान सहितम् यत् ज्ञात्वा मोक्ष्यसे अशुभात्|’ या सुभाषिताचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले विज्ञानासहित सर्वप्रकारच्या ज्ञानाचा उद्देश मानवाच्या समस्या सोडवणे हा असतो.
भारतीय तंत्रज्ञान संस्था-आयआयटी आज ज्या प्रकारे प्रगती करत आहेत, त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. नवोन्मेष आणि संशोधनाच्या याच ऊर्जेने आपल्या देशाला हजारो वर्षांपासून चैतन्यमय ठेवले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
युवकांनी भविष्यातील आव्हानांसाठी स्वतःला सज्ज ठेवावं, असं सांगत त्यांची स्वप्ने आणि इच्छा-आकांक्षांच नवा भारत घडवणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आयआयटी गुवाहाटी ने या दिशेने आधीच प्रयत्न सुरु केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
या कोरोनाकाळात, शैक्षणिक सत्र आणि संशोधन कार्य सुरु करण्यात अनेक अडथळे येत असतांनाही, या संस्थेने देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या अभियानात दिलेले योगदान कौतुकास्पद आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 , 21 व्या शतकातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले असून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी पिढी तयार करणे हा या धोरणाचा उद्देश आहे. या धोरणात बहुशाखीय शिक्षणाला मुभा देण्यात आली असून विविध अभ्यासक्रम निवड आणि शिक्षण घेण्याबाबत लवचिकता देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणात, राष्ट्रीय संशोधन संस्था स्थापन करण्याचाही प्रस्ताव आहे. संशोधनासाठी निधी देणाऱ्या सर्व संस्थांशी समन्वय राखून, सर्व विषयांसाठी, मग ते विज्ञान असो वा मानव्यशास्त्र, त्यांना संशोधनाचा समान निधी पुरवण्यासाठी हा संस्थेचा उपयोग होईल.
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, परदेशी विद्यापीठांनाही, भारतात आपल्या शाखा उघडण्याची परवानगी दिली जाणार आहे, ज्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची कवाडे देशातच खुली होतील. या शिक्षण धोरणामुळे, भारत जगात महत्वाचे शिक्षणकेंद्र म्हणून नावाजला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताच्या अॅक्ट इस्ट धोरणाचा केंद्रबिंदू ईशान्य भारत प्रदेश आहे तसेच, दक्षिण पूर्व आशियाशी भारताच्या संबंधांचे द्वारही ईशान्य भारत आहे.या सर्व देशांशी असलेल्या संबंधांचा आधार, संस्कृती, वाणिज्य, दळणवळण आणि क्षमता हा आहे. या संबंधांचे आणखी एक महत्वाचे माध्यम शिक्षण असेल, असे सांगत गुवाहाटी त्याचे महत्वाचे केंद्र बनू शकेल, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे, ईशान्य भारताला एक नवी ओळख मिळून नव्या संधी उपलब्ध होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
ईशान्य भारतात पायाभूत सुविधांचा विकास करत नव्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. विशेषत: रेल्वे, महामार्ग, हवाई वाहतूक आणि जलमार्गा चे जाळे विणण्याचे काम सुरु आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
300 संशोधकांना या समारंभात पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. या सर्व संशोधकांनी देशाच्या कल्याणासाठी आपले संशोधन कार्य पुढेही सुरु ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.त्यांच्या संशोधनाचा उपयोग या प्रदेशांच्या विकासासाठी करण्याच्या प्रयत्न करावा, असेही पंतप्रधान म्हणाले.
आयआयटी गुवाहाटी येथे आपत्ती व्यवस्थापन आणि धोका प्रतिबंधन संशोधन केंद्र स्थापन केले जावे, जेणेकरुन, त्यातून या प्रदेशात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी मार्ग काढता येईल, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला.
* * *
M.Iyengar/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1657758)
Visitor Counter : 201
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam