पंतप्रधान कार्यालय

श्री हरिवंश नारायण सिंह यांची राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 14 SEP 2020 10:17PM by PIB Mumbai

 

या सदनाच्या उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल श्री. हरिवंशजी यांचे मी संपूर्ण सदनातर्फे आणि सर्व देशवासियांतर्फे मनापासून अभिनंदन करतो.

सामाजिक कार्य आणि पत्रकारितेच्या जगतात हरीवंशजी यांनी ज्याप्रकारे आपल्या प्रामाणिक वर्तनामुळे स्वतःची ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याप्रती नेहमीच आदराची भावना राहिली आहे. हरिवंशजी यांच्याप्रति जी आदराची आणि आपुलकीची भावना माझ्या मनात आहे, त्यांना जवळून ओळखणाऱ्या लोकांच्या मनात आहे, तीच आपुलकी आणि आदराची भावना आज सदनातील प्रत्येक सदस्याच्या मनात आहे, हे मला वेळोवेळी जाणवले आहे. ही भावना, ही आत्मीयता हरिवंशजींची खरी कमाई आहे. त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, ज्या प्रकारे ते सदनाचे कामकाज चालवतात, ते पाहता हे स्वाभाविक असल्याचे जाणवते. सदनातील त्यांची निष्पक्ष भूमिका लोकशाहीला अधिक सक्षम करते.

सभापती महोदय, यावेळी या सदनाचे कामकाज आजवरच्या इतिहासात अतिशय वेगळ्या आणि विपरीत परिस्थितीत होत आहे. कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, त्या परिस्थितीत या सदनाने काम करावे, देशासाठी आवश्यक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आपण सगळेच सर्व प्रकारची खबरदारी घेऊन, सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आपली कर्तव्ये पार पाडू, असा विश्वास मला वाटतो.

राज्यसभेचे सदस्य, सभापतीजी आणि आता उपसभापतीजी यांना सदनाचे कामकाज सुविहितपणे चालावे, यासाठी जितके जास्त सहकार्य करतील, तितकाच वेळेचा सदुपयोग होईल आणि सर्व सुरक्षित राहतील.

सभापती महोदय, संसदेच्या वरिष्ठ सदनाच्या ज्या जबाबदारीसाठी हरिवंशजी यांच्यावर आपण सर्वांनी विश्वास दाखवला होता, त्यांनी तो विश्वास नेहमीच योग्य ठरवला आहे. मी गेल्यावेळी संबोधित करताना म्हटले होते की ज्याप्रमाणे हरी सर्वांचा असतो, त्याचप्रमाणे सदनातील हरी सुद्धा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, अशा सर्वांचेच असतील, असा विश्वास मला वाटतो. सदनातील आमचे हरी, हरीवंशजी, अलीकडे आणि पलीकडे सगळीकडेच सारखे राहिले आहेत. त्यांनी कधीही कोणता भेदभाव केला नाही, सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष, हे पाहिले नाही.

मी असेही म्हटले होते की सदनातील या मैदानात खेळाडूंपेक्षा पंच जास्त त्रासलेले असतात. नियमानुसार खेळण्यासाठी खासदारांना भाग पाडणे, हे आपल्यासमोर मोठेच आव्हान आहे. हरिवंशजी उत्तम पंच आहेत, असा विश्वास माझ्या मनात होतात. मात्र जे लोक त्यांना ओळखत नव्हते, त्यांचा विश्वासही हरिवंशजी यांनी आपल्या निर्णायक शक्तीने आणि आपल्या निर्णयांनी जिंकून घेतला.

सभापती महोदय, हरिवंशजी यांनी आपली जबाबदारी किती यशस्वीपणे पार पाडली आहे, याची ग्वाही ही दोन वर्षे देतील. त्यांनी सदनात ज्या सखोलपणे मोठ-मोठ्या विधेयकांवर समग्र चर्चा घडवून आणली, त्याच वेगाने विधेयके संमत करण्यासाठी हरिवंशजी कित्येक तास सदनात बसून राहिले, कौशल्याने सदनाचे कामकाज चालवत राहिले. या काळात देशाच्या भविष्याला, देशाच्या दिशेला बदलणारी अनेक ऐतिहासिक विधेयके या सदनात मंजूर झाली. गेल्याच वर्षी या सदनाने दहा वर्षांतला सर्वात जास्त उत्पादकतेचा विक्रम नोंदवला. ते सुद्धा अशा वेळी, जेव्हा ते लोकसभा निवडणुकांचे वर्ष होते.

सदनात उत्पादकतेच्या बरोबरीने सकारात्मकता सुद्धा वाढली आहे, ही प्रत्येक सदस्यासाठी अभिमानाची बाब आहे. येथे सर्वांना उघडपणे आपली मते मांडता आली. सदनाचे कामकाज थांबू नये, स्थगित होऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचे दिसून आले. यामुळे सदनाच्या गौरवातही भर पडली आहे. संविधान निर्मात्यांची संसदेच्या वरिष्ठ सदनाकडून हीच अपेक्षा होती. लोकशाहीची भूमी असणाऱ्या बिहारमधून, जेपी आणि कर्पूरी ठाकूर यांच्या भूमीतून, बापूंच्या चंपारणातून जेव्हा लोकशाहीचा एखादा साधक पुढाकार घेऊन जबाबदाऱ्या स्वीकारतो, तेव्हा जे उत्तम होऊ शकते, ते हरिवंशजी यांनी करून दाखवले आहे.

जेव्हा आपण हरिवंशजी यांच्या निकट असणाऱ्या लोकांशी चर्चा करतो, तेव्हा समजते की ते सर्वसामान्यांशी इतके जास्त कसे काय जोडलेले आहेत. त्यांच्या गावात कडुलिंबाच्या झाडाखाली शाळा भरत असे, जिथे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. जमिनीवर बसून जमिनीला समजून घेण्याचे, जमिनीची जोडले जाण्याचे शिक्षण त्यांना तेथूनच मिळाले‌.

हरिवंशजी सुद्धा जयप्रकाशजी यांच्या सिताब दियारा या गावचे आहेत, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. हेच गाव जयप्रकाशजी यांची जन्मभूमी आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमध्ये, आरा, बलिया आणि छपरा या बिहारच्या जिल्ह्यामधले हे क्षेत्र, गंगा आणि घाघरा अशा दोन नद्यांच्या मधोमध वसलेले एका बेटासारखे दियारा. दरवर्षी जमीन पुराच्या पाण्याने वेढून जात असे. जेमतेम एक पीक घेता येई. कुठेही येण्या-जाण्यासाठी नौकेत बसून नदी पार करावी लागत असे.

समाधान हेच खरे सुख आहे, हे व्यवहारज्ञान हरिवंशजी यांना आपल्या गावातील घराच्या परिस्थितीतून लाभले. त्यांच्या पार्श्वभूमीबद्दलचा एक किस्सा मला कोणीतरी सांगितला होता. हायस्कूलमध्ये जाऊ लागल्यानंतर हरिवंशजी यांनी पहिल्यांदाच चपला तयार करण्यासाठी सांगितले होते‌. त्यापूर्वी त्यांच्याकडे कधीच चपला नव्हत्या आणि त्यांनी त्या खरेदीही केल्या नव्हत्या. गावातील चपला बनवणाऱ्या एका व्यक्तीला हरिवंशजी यांच्यासाठी चपला तयार करण्यासाठी सांगण्यात आले. हरिवंशजी आपल्या चपला किती तयार झाल्या, हे पाहण्यासाठी वारंवार जात असत. ज्याप्रमाणे श्रीमंत माणसे आपल्या बंगल्याचे बांधकाम सुरू असताना पुन्हा पुन्हा पाहायला जातात, त्याच प्रकारे हरीवंशजी आपल्या चपला कशा तयार होत आहेत, किती तयार झाल्या आहेत, हे पाहण्यासाठी जात असत‌. चपला तयार करणाऱ्याला रोज विचारत की त्या कधी पर्यंत तयार होतील. हरिवंशजी हे सर्वसामान्यांशी इतके जास्त जोडलेले का आहेत, हे यावरून आपल्या सहज लक्षात येईल.

त्यांच्यावर नेहमीच जेपींच्या प्रभाव होता. त्याच काळात पुस्तकांशी त्यांचे सख्य वाढत गेले. त्याबद्दलचा एक किस्सा सुद्धा मला समजला. हरिवंशजी यांना जेव्हा पहिल्यांदा सरकारी शिष्यवृत्ती मिळाली, तेव्हा घरातील लोकांची अपेक्षा होती की मुलगा शिष्यवृत्तीचे सगळे पैसे घेऊन घरी येईल. मात्र हरिवंशजी यांनी शिष्यवृत्तीचे पैसे घरी घेऊन न जाता पुस्तके खरेदी केली. अनेक प्रकारची संक्षिप्त आत्मचरित्रे, साहित्य घेऊन ते घरी गेले. हरिवंशजी यांच्या आयुष्यात त्यावेळी पुस्तकांचा जो प्रवेश झाला, ते सख्य आजही कायम आहे.

सभापती महोदय, सुमारे चार दशके सामाजिक पत्रकारिता केल्यानंतर हरिवंशजी यांनी 2014 साली संसदीय कारकिर्दीत प्रवेश केला. सदनाचे उपसभापती म्हणून हरिवंशजी यांनी नेहमीच आपल्या मर्यादांचे पालन केले, त्याचप्रमाणे  संसदेचे एक सदस्य म्हणूनसुद्धा त्यांचा कार्यकाळ तितकाच गौरवशाली राहिला आहे. सदस्य म्हणून त्यांनी नेहमीच प्रत्येक विषयाबाबत, मग तो विषय आर्थिक असो अथवा सामरिक सुरक्षेशी संबंधित असो, हरिवंशजी यांनी आपली भूमिका प्रभावीपणे मांडली आहे.

शालीन आणि त्याचबरोबर गर्भित अर्थ सामावलेले वक्तव्य, ही त्यांची ओळख आहे, हे आपण सगळेच जाणतो. सदनाचे सदस्य म्हणून त्यांनी आपले ज्ञान आणि आपल्या अनुभवाचा देशाच्या सेवेसाठी पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. हरिवंशजी यांनी सर्व आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचा गौरव, भारताचा सन्मान वाढवण्याचे काम केले आहे. इंटर पार्लमेंटरी युनियनच्या सर्व बैठका असो किंवा इतर देशांमध्ये भारतीय संस्कृती प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून भूमिका असो, हरिवंशजी यांनी अशा प्रत्येक ठिकाणी भारताच्या आणि भारतीय संसदेच्या गौरवात भर घातली आहे.

सभापती महोदय, सदनात उपसभापती या भूमिकेव्यतिरिक्त हरिवंशजी यांनी राज्यसभेच्या अनेक समित्यांचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केले आहे. अशा सर्वच समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम करताना हरिवंशजी यांनी समित्यांचे काम अतिशय उत्तम केले आहे, त्यांची भूमिका प्रभावीपणे मांडली आहे.

मी गेल्यावेळी सुद्धा सांगितले होते की पत्रकार म्हणून काम करताना आपला खासदार कसा असावा, याबाबतची मोहीम हरिवंशजी यांनी बराच काळ चालवली होती. प्रत्यक्षात स्वतः खासदार झाल्यानंतर प्रत्येक खासदार कशाप्रकारे कर्तव्यनिष्ठ असावा, हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले आहे.

सभापती महोदय, हरिवंशजी संसदीय कामकाज आणि जबाबदाऱ्या पार पाडताना सुद्धा एक बुद्धिवंत आणि विचारवंत म्हणूनही तितकेच सक्रिय असतात. ते अजूनही देशभर फिरतात. भारताच्या आर्थिक, सामाजिक, सामरीक आणि राजकीय आव्हानांबाबत जनजागृती करत असतात. त्यांच्यातील पत्रकार आणि लेखक अजून तसाच आहे. आपल्या पुस्तकातून त्यांनी आपले माजी पंतप्रधान श्री चंद्रशेखरजी यांच्या जीवनातील अनेक बारकावे समोर आणले आहेत, त्याच बरोबर त्यातून हरिवंशजी यांची लेखन क्षमताही अधोरेखित झाली आहे.‌ उपसभापती म्हणून हरिवंशजी यांचे मार्गदर्शन यापुढेही आपल्याला मिळत राहील, हे माझे आणि सदनातील सर्वच सदस्यांचे सौभाग्य आहे.

माननीय सभापती जी, संसदेच्या या वरिष्ठ सदनाने 250 पेक्षा जास्त सत्रांची वाटचाल केली आहे. ही वाटचाल, लोकशाही म्हणून आपल्या परिपक्वतेची साक्ष देण्यास पुरेशी आहे. हरिवंशजी, तुम्हाला पुन्हा एकदा या महत्त्वाच्या आणि मोठ्या जबाबदारीबद्दल अनेकानेक शुभेच्छा. आपण निरोगी रहावे आणि सदनात सुद्धा निरोगी वातावरण कायम राखत वरिष्ठ सदनाकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करत राहावे. हरिवंशजी यांच्या विरोधात उभे असलेले मनोज झा यांनासुद्धा माझ्यातर्फे अनेक शुभेच्छा. लोकशाहीच्या गौरवासाठी निवडणुकीची ही प्रक्रिया सुद्धा महत्त्वाची आहे. बिहार ही भारताच्या लोकशाही परंपरेची भूमी आहे. हरिवंशजी, वैशालीची ती परंपरा, बिहारचा तो गौरव, तो आदर्श या सदनाच्या माध्यमातून आपण पुरस्कृत कराल, असा विश्वास मला वाटतो.

निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल मी सदनाच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा हरिवंशजी यांचे आणि सर्व सदस्यांचे मनापासून अभिनंदन.

धन्यवाद.

 

M.Chopade/M.Pange/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654263) Visitor Counter : 122