पंतप्रधान कार्यालय

देशात खेळण्यांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी बोलावली बैठक


तंत्रज्ञान आणि नाविन्यतेचा वापर आणि जागतिक निकषांची पूर्तता करणार्‍या दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले जावे- पंतप्रधान

भारतीय संस्कृती आणि नीतिमूल्याची सांगड घातलेल्या खेळण्यांचा वापर सर्व अंगणवाडी केंद्रे आणि शाळांमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक साधने म्हणून करण्यात यावा : पंतप्रधान

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी खेळणी एक उत्कृष्ट माध्यम ठरू शकतात -पंतप्रधान

खेळण्यांचे तंत्रज्ञान आणि रचनेतील नवकल्पनांसाठी हॅकेथॉन आयोजित करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी दिला भर

भारतीय संस्कृती आणि लोककथेतून प्रेरित असे खेळ विकसित करून डिजिटल गेमिंग क्षेत्रातील प्रचंड संधी भारताने हेराव्यात - पंतप्रधान

Posted On: 22 AUG 2020 10:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑगस्‍ट 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय खेळण्यांची निर्मिती आणि जागतिक ओळख निर्माण करण्याच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक  घेतली.

पंतप्रधान म्हणाले की, भारतात विविध खेळण्यांचे समूह आहेत आणि हजारो कारागीर आहेत जे देशी खेळणी तयार करतात ज्यामुळे केवळ सांस्कृतिक नाही तर लहान वयातच मुलांमध्ये जीवन-कौशल्य आणि मानसिक जडणघडण विकसित करण्यात  मदत होते. ते म्हणाले की अशा क्लस्टर्सना नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील पद्धतीने प्रोत्साहन देण्यात यावे .

भारतीय खेळण्यांच्या बाजारपेठेत प्रचंड क्षमता आहे आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ‘व्होकल फॉर लोकल’ ला प्रोत्साहन देऊन या उद्योगात परिवर्तन घडवून आणता येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. तंत्रज्ञान  आणि नाविन्यतेच्या वापरावर  तसेच जागतिक निकषांची पूर्तता करणाऱ्या दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीकडेही आपण  लक्ष केंद्रित केले पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले.

मुलांच्या मानसिक /आकलन कौशल्यांवर खेळण्यांचा परिणाम आणि राष्ट्राच्या भावी पिढीला आकार देण्यात मदत करून ते सामाजिक परिवर्तनाचे साधन कसे बनू शकतात यावर देखील या बैठकीत चर्चा झाली.

मुलाच्या मनाला आकार देण्यासाठी खेळण्यांचे महत्त्व अधोरेखित करताना  पंतप्रधान म्हणाले की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व अंगणवाडी केंद्र आणि शाळांमध्ये  भारतीय संस्कृती आणि नीतिमूल्यांशी निगडित खेळण्यांचा शैक्षणिक साधने म्हणून वापर केला पाहिजे.  राष्ट्रीय उद्दिष्टे आणि  कर्तृत्वाविषयी अभिमानाची भावना निर्माण करू शकतील अशा नाविन्यपूर्ण रचना आणि खेळणी तयार करण्यात युवकांना सहभागी करून घेण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली.

पंतप्रधानांनी नमूद केले की ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी खेळणी हे एक उत्कृष्ट माध्यम ठरू शकते. खेळण्यांमध्ये  भारताची मूल्य व्यवस्था  आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रस्थापित पर्यावरण-स्नेही दृष्टिकोन प्रतिबिंबित व्हायला हवा असे आवाहन त्यांनी केले. विशेषत: जे प्रदेश  हातांनी घडवलेल्या खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहेत तिथे भारताच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटनाचा एक साधन म्हणून उपयोग करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली.

भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आणि मूल्ये प्रतिबिंबित करण्यासाठी ऑनलाईन गेम्ससह खेळण्यातील तंत्रज्ञान आणि रचनांमध्ये नवकल्पना रुजवण्यासाठी युवक आणि  विद्यार्थ्यांसाठी हॅकेथॉन  आयोजित करण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी  भर दिला.

वेगाने वाढणाऱ्या  डिजिटल गेमिंग क्षेत्रावर भर देताना पंतप्रधान म्हणाले की, भारताने या क्षेत्रातील मोठ्या संधींचा फायदा घ्यावा आणि भारतीय संस्कृती आणि लोककथेतून प्रेरित असे  खेळ विकसित करून आंतरराष्ट्रीय डिजिटल गेमिंग क्षेत्राचे नेतृत्व करावे.

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648001) Visitor Counter : 215