PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
30 JUL 2020 8:00PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)


दिल्ली-मुंबई, 30 जुलै 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांच्या हितधारकांबरोबर भविष्यातील कल्पना आणि रुपरेषेबाबत व्यापक चर्चा केली. विकासाला हातभार लावण्यात वित्तीय आणि बँकिंग प्रणालीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेविषयी यावेळी चर्चा झाली. लघु उद्योजक, बचत गट, शेतकरी यांना त्यांच्या पत विषयक गरजा भागवण्यासाठी आणि विस्तारासाठी संस्थात्मक कर्ज सुविधा वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे, यावर सहमती झाली.
केंद्रीय गृह मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली
प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आणखी व्यवहारांना यामध्ये मुभा देण्यात आली आहे. अनलॉक 3 येत्या 1 ऑगस्ट 2020 पासून अमलात येणार असून टप्याटप्याने व्यवहार पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेची व्याप्ती अधिक व्यापक करण्यात आली आहे.राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांकडून आलेला प्रतिसाद आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि विभागांशी व्यापक चर्चा केल्यानंतर त्यावर ही नवी मार्गदर्शक तत्वे आधारित आहेत.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारतात कोविड-19 च्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाखांहून अधिक झाल्याची महत्वपूर्ण नोंद करण्यात आली आहे.
डॉक्टर, परिचारिका आणि सर्व आघाडीच्या आरोग्यसेवा कामगारांच्या कर्तव्यनिष्ठा आणि नि: स्वार्थ त्यागामुळेच कोविड -19 रूग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. 1 जून ला कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा आकडा 1 लाख होता आणि केंद्र व राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या कोविड -19 व्यवस्थापन योजनेच्या समन्वयित अंमलबजावणीमुळेच यात सातत्याने वाढ होत आज हा आकडा दहा लाखाहून अधिक झाला आहे.
एकत्रीत पद्धतीने प्रभावी प्रतिबंधित धोरण, जलद चाचणी आणि प्रमाणित क्लिनिकल व्यवस्थापन प्रोटोकॉलची यशस्वी अंमलबजावणीच्या आधारेच सलग सातव्या दिवशी कोविडचे 30,000 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोविडचे 15,000 रुग्ण बरे झाले होते; रुग्ण बरे होण्याच्या दैनंदिन सरासरी प्रमाणात निरंतर वृद्धी होऊन जुलै च्या शेवटच्या आठवड्यात सुमारे 35,000 रुग्ण बरे झाले.
गेल्या 24 तासात 32,553 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 10,20,582 वर पोहोचला आहे. कोविड-19 रुग्णांचा बरे होण्याचा दर आता 64.44 % झाला आहे. बरे झालेले रूग्ण आणि सक्रिय कोविड -19 रुग्णांमधील अंतर सध्या 4,92,340 इतके आहे. या आकडेवारीनुसार बरे झालेलं रुग्ण हे सक्रीय रुग्णांच्या 1.9 पट आहेत ( सर्व 5,28,242 सक्रीय रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत)
अविरत क्लिनिकल व्यवस्थापनासाठी परवडणार्या रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा वृद्धिंगत करण्यासाठी राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी स्थानिक पातळीवर अनेक उपाययोजना केल्या आहेत. 16 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील मृत्यू दर हा राष्ट्रीय सरासरी मृत्यू दरापेक्षा कमी आहे हे त्याचेच यश आहे.
सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांमुळे रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये वृद्धी होऊन तसेच जलद चाचणी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कोविड-19 च्या रूग्णांची लवकर ओळख पटवून त्यांची जलद गतीने चाचणी घेण्यात आल्यामुळे मृत्यू दर कमी होण्यात मदत झाली आहे. गंभीर रुग्ण आणि अति-जोखीम असणाऱ्या रुग्णांची काळजी घेण्यासोबतच प्रतिबंधित धोरणाचे संपूर्ण लक्ष जलद शोध आणि अलगिकरणावर केंद्रित केले आहे. यामुळे हे सुनिश्चित झाले आहे की, जागतिक सरासरी 4% मृत्यू दराच्या तुलनेत भारतातील मृत्यू दर 2.21% आहे. 24 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी सीएफआर आहे आणि 8 राज्ये / केंद्र शासित प्रदेशत 1% च्या खाली सीएफआरची नोंद झाली आहे.
इतर अपडेट्स:
- केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद येस्सो नाईक यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने आपल्या कोवीड-19 आरोग्य केंद्रातील रुग्णांना मोफत चाचणी आणि उपचार सुविधा प्रदान करायला सुरुवात केली आहे. कोवीड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारांचा आढावा घेण्यासाठी आयुष मंत्र्यांनी 28 जुलै 2020 रोजी या कोवीड आरोग्य केंद्राला भेट दिली होती. त्यावेळी, सर्व रुग्णांना परिक्षण आणि उपचार सुविधा मोफत प्रदान करण्याची घोषणा मंत्रीमहोदयांनी केली होती. या आरोग्य केंद्रातील अतिदक्षता विभागाचेही (ICU) त्यांनी उद्घाटन केले होते. या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरसह सर्व प्रमाणित तरतुदी करण्यात आल्या आहेत.
- चांगली गुणवत्ता आणि परवडणार्या किंमतीमुळे खादी फेस मास्कची लोकप्रियता देशभरात वाढत असतानाच, इंडियन रेडक्रॉस सोसायटीने (IRCS) खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडे 1.80 लाख फेसमास्कची मागणी नोंदवली आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने दिलेल्या माहितीनुसार हे फेस मास्क तपकिरी रंगाच्या 100% दुहेरी विणीच्या खादी वस्त्रापासून तयार केले जातील आणि त्यांना लाल रंगाची किनार असेल. इंडियन रेडक्रॉस सोसायटीने दिलेल्या नमुन्यांनुसार या द्वीस्तरीय फेस मास्कची रचना करण्यात आली आहे. फेस मास्कच्या डाव्या बाजूला इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा लोगो तर उजवीकडे खादी इंडियाचा टॅग छापलेला असेल. पुढच्या महिन्यापर्यंत या फेस मास्कचा पुरवठा सुरू होईल.
- सरकार धोरण सुगमतेसाठी वचनबद्ध असून त्यासाठी उद्योग जगताकडून अभिप्राय आणि सहकार्य मागितले आहे, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारतासाठी व्यवसाय सुलभीकरणावरील सीआयआय राष्ट्रीय डिजिटल परिषदेचे उद्घाटन करताना मंत्र्यांनी औद्योगिक मंजूरी लवकर देण्यासाठी एकल खिडकी प्रणाली सुरु केली जाईल यावर आज जोर दिला. कोविड परिस्थितीबद्दल बोलताना मंत्री म्हणाले की, देशातील अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभारी घेत आहे आणि या काळात लावलेले निर्बंध हे तात्पुरते होते आणि आता हळूहळू ते शिथिल केले जात आहेत. कोविड संकटाच्या काळात देशातील सेवा क्षेत्राने जागतिक ग्राहकांना अविरत सेवा पुरविली आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात बुधवारी कोविड च्या रुग्णांच्या संख्येने 4 लाखाचा आकडा पार केला. राज्यात कोविडचे 9,211 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 4,00,651 इतकी झाली आहे. राज्यात 1,46,129 सक्रिय रुग्ण आहेत. तर त्याच वेळेला राज्यात 7,478 रुग्ण बरे झाले आहेत यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,39,755 इतकी झाली आहे. तर 298 रुग्णांचा कोविडमुळे राज्यात मृत्यू झाला आहे. यामुळे या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 14,463 इतकी झाली आहे. पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर मधील चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता राज्यात 31 ऑगस्ट पर्यंत लॉक डाउन वाढवण्यात आला आहे. राज्यात रात्री कर्फ्यु कायम राहील.

* * *
ST/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642416)
Visitor Counter : 208