सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
इंडियन रेडक्रॉस सोसायटीने खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडे 1.80 लाख फेसमास्कची मागणी नोंदवली
Posted On:
30 JUL 2020 3:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2020
चांगली गुणवत्ता आणि परवडणार्या किंमतीमुळे खादी फेस मास्कची लोकप्रियता देशभरात वाढत असतानाच, इंडियन रेडक्रॉस सोसायटीने (IRCS) खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडे 1.80 लाख फेसमास्कची मागणी नोंदवली आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने दिलेल्या माहितीनुसार हे फेस मास्क तपकिरी रंगाच्या 100% दुहेरी विणीच्या खादी वस्त्रापासून तयार केले जातील आणि त्यांना लाल रंगाची किनार असेल. इंडियन रेडक्रॉस सोसायटीने दिलेल्या नमुन्यांनुसार या द्वीस्तरीय फेस मास्कची रचना करण्यात आली आहे. फेस मास्कच्या डाव्या बाजूला इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा लोगो तर उजवीकडे खादी इंडियाचा टॅग छापलेला असेल. पुढच्या महिन्यापर्यंत या फेस मास्कचा पुरवठा सुरू होईल.
ही मागणी पूर्ण करण्यासाठी 20,000 मीटर वस्त्र आवश्यक असून ती पूर्ण करताना खादी कारागिरांना 9000 अतिरिक्त मानवी दिवस काम उपलब्ध होणार आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीने नोंदवलेल्या या मागणीचे स्वागत केले आहे. फेसमास्कची ही इतकी मोठी मागणी म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगातर्फे आतापर्यंत खादीच्या द्वीस्तरीय आणि रेशमी त्रिस्तरीय, अशा 10 लाखापेक्षा जास्त मास्कची विक्री करण्यात आली आहे.
राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय तसेच केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांबरोबरच अनेक सर्वसामान्य वापरकर्त्यांनीही खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या संकेतस्थळावरून मास्कची मागणी पुन्हा पुन्हा नोंदविल्याची माहिती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने दिली आहे.
* * *
B.Gokhale/M.Pange/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642322)
Visitor Counter : 266