आयुष मंत्रालय

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत कोवीड-19 रुग्णांना मोफत चाचणी आणि उपचार सुविधा प्रदान करायला सुरुवात

Posted On: 30 JUL 2020 1:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2020

 

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद येस्सो नाईक यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने आपल्या कोवीड-19 आरोग्य केंद्रातील रुग्णांना मोफत चाचणी आणि उपचार सुविधा प्रदान करायला सुरुवात केली आहे.

कोवीड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारांचा आढावा घेण्यासाठी आयुष मंत्र्यांनी 28 जुलै 2020 रोजी या कोवीड आरोग्य केंद्राला भेट दिली होती. त्यावेळी, सर्व रुग्णांना परिक्षण आणि उपचार सुविधा मोफत प्रदान करण्याची घोषणा मंत्रीमहोदयांनी केली होती. या आरोग्य केंद्रातील अतिदक्षता विभागाचेही (ICU) त्यांनी उद्घाटन केले होते. या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरसह सर्व प्रमाणित तरतुदी करण्यात आल्या आहेत.

दिल्ली सरकारने अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला कोवीड-19 परीक्षण केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. तसेच कोवीड-19 विषयी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना दूरध्वनीवरून उत्तरे देण्यासाठी संस्थेमध्ये कोवीड कॉल सेंटर सुद्धा उभारण्यात आले आहे.

आयुष मंत्रालयाच्या अधिपत्याखाली अश्वगंधा, कडुलिंब, कालमेघा, गुळवेल अशा वनौषधींच्या  प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा आणि संशोधन क्षेत्रात ही संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे.

आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार 80000 दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राबविल्या जात असलेल्या असलेल्या ‘आयुरक्षा’ या रोगप्रतिबंधक कार्यक्रमाचेही मंत्रीमहोदयांनी कौतुक केले. या कार्यक्रमांतर्गत कोविड–19 चा संसर्ग रोखण्यासाठी योद्धा म्हणून कार्यरत असणाऱ्या दिल्ली पोलिसांचीरोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि कोविड–19 विषाणूमुळे होणारा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी आयुरक्षा किट दिले जात आहे.

संस्थेला भेट दिली असता मंत्रीमहोदयांनी डॉक्टरांच्या चमूशीही संवाद साधला होता तसेच केंद्रातील रूग्णांच्या आरोग्याविषयी विचारपूस केलीहोती. कोविड-19 आरोग्य केंद्रात उपलब्ध सुविधांविषयी आणि आयुर्वेदिक औषधांमार्फत केलेल्या उपचारांच्या परिणामांबद्दल त्यांनी त्यांची मतेही जाणून घेतली. 

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात संस्थेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या सेवांबद्दल मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले.


* * *

U.Ujgare/M.Pange/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642279) Visitor Counter : 231