अर्थ मंत्रालय
अर्थमंत्र्यांनी पीएमजीकेपी अंतर्गत कोविड 19 विरुद्धच्या लढ्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी घोषित विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला
दाव्यांचा निपटारा त्वरित करण्यावर आणि नामनिर्देशित व्यक्तींपर्यंत लवकरात लवकर लाभ पोहोचवण्यावर दिला भर
Posted On:
13 JUL 2020 8:52PM by PIB Mumbai
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) अंतर्गत, कोविड 19 विरुद्धच्या लढ्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी घोषित विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी मर्यादितचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
न्यू इंडिया अॅश्युरन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी या योजनेची वैशिष्ट्ये आणि अंमलबजावणीच्या आजपर्यंतच्या स्थितीची सविस्तर माहिती सादर केली.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकार्यांनी दावे त्वरित कार्यान्वित करण्यासाठी राज्य नोडल अधिकार्यांसोबतच्या कार्यपद्धतीचे विवरण दिले, तसेच मृताच्या कुटुंबापर्यंत पोहोचताना तसेच कायदेशीर वारस प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली.
आतापर्यंत प्राप्त झालेल्या 147 सूचनांपैकी 87 प्रकरणांमध्ये दावा कागदपत्रे सादर केली आहेत, त्यापैकी 15 जणांना भरपाई देण्यात आली असून 4 जणांना भरपाई मंजूर झाली आहे, तर 13 जणांची पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. याव्यतिरिक्त, एकूण 55 दावे अपात्र असल्याचे आढळले असून त्यापैकी 35 दावे घोषित विम्या बाहेरील आहेत, जसे की पोलीस कर्मचारी, रुग्णालयांशी संबंधित नसलेले नगरपालिका कर्मचारी, शिक्षण, महसूल विभाग इत्यादी संबंधित लोक, तर दाखल केलेल्या इतर 20 दाव्यांच्या मृत्यूची कारणे कोविड-19 व्यतिरिक्त हृदयविकार आदी आहेत.
बैठकीत अर्थमंत्र्यांनी दाव्यांचा निपटारा त्वरित करण्यामागील महत्व अधोरेखित केले आणि नामनिर्देशित व्यक्तीपर्यंत लवकरात लवकर लाभ पोहोचवण्यावर भर दिला.
***
S.Thakur/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1638394)
Visitor Counter : 243