Posted On:
07 JUL 2020 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 7 जुलै 2020
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज माहिती दिली आहे की, टाळेबंदी उठविण्याच्या टप्प्यात चित्रपट निर्मिती पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार लवकरच मानक प्रचालन प्रक्रिया अर्थात एसओपी जारी करणार आहे.
“कोविडमुळे पूर्णतः ठप्प झालेल्या चित्रपटसृष्टीला पुन्हा गती प्रदान करण्यासाठी, आम्ही टीव्ही मालिका, चित्रपट-निर्मिती, सह-निर्मिती, अॅनिमेशन, गेमिंग यासह सर्व क्षेत्रातील निर्मितीला प्रोत्साहन देत आहोत. आम्ही लवकरच यासाठीच्या उपायांची घोषणा करणार आहोत”, असे जावडेकर यांनी नमूद केले.
फिक्की फ्रेम्सच्या 21 व्या भागाला संबोधित करताना जावडेकर बोलत होते.
कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर, प्रसार माध्यमे आणि करमणूक उद्योगाच्या वार्षिक मेळावा 2020च्या भागाचे आयोजन यावर्षी आभासी पद्धतीने करण्यात आले होते. (दरवर्षी हे आयोजन मुंबईतील पवई तलाव येथे करण्यात येते.)
मंत्री पुढे म्हणाले की, कोविड साथीच्या आजाराने, लोकांना संवाद साधण्याच्या नवीन मार्गांचा विचार करण्यास भाग पाडले आहे. आभासी मेळावे हे आता सामान्य झाले आहेत; परंतु भागीदारी मात्र खरी आहे. जावडेकर म्हणाले की, मजकूर निर्मिती (content creation) मध्ये भारताला मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि जगभरातील 150 हून अधिक देशांमध्ये भारतीय ‘कन्टेन्ट’ पाहिला जात आहे. मंत्र्यांनी सर्व हितधारकांना भारताची कोमल ऊर्जा असलेल्या माध्यम आणि करमणूक उद्योगाच्या प्रगतीसाठी, एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की, भारताला ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेत परावर्तित करण्यामध्ये सर्जनशील उद्योगाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ते पुढे म्हणाले, “व्हॉल्यूमवरून व्हॅल्यू क्रिएशनवर लक्ष केंद्रित केले पाहिजे”.
तांत्रिक सत्रामध्ये भाग घेत माहिती व प्रसारण सचिव अमित खरे म्हणाले की, चित्रपटांमध्ये सरकारची भूमिका ही एखाद्या समन्वयकाची असावी. कमी नियमन सुनिश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या नियामक रचनांचा मेल घातला पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले. खरे यांनी सांगितले की माध्यम आणि करमणूक उद्योगाला पायाभूत सुविधांचा दर्जा देण्यासाठी सरकार संपूर्ण पाठिंबा दर्शवित असून काही संकल्पना निश्चित केल्या पाहिजेत.
निती अयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले की, प्रत्येक संकटाला संधीचे रुप दिले जाऊ शकते; तसेच शाश्वत उच्च विकास साध्य करण्यासाठी व रोजगार निर्मिती करून जागतिक जेतेपद प्राप्त करण्यासाठी भारताने 12-13 उदयोन्मुख उद्योगांची निवड केली पाहिजे. त्या 12-13 उदयोन्मुख उद्योगांच्या यादीमध्ये त्यांनी माध्यम आणि करमणूक उद्योगाचे नाव समाविष्ट केले आहे.
अशाप्रकारचे मत व्यक्त करताना स्टार आणि डिस्ने इंडियाचे अध्यक्ष व या उद्योगातील अग्रणी आवाज असणारे उदय शंकर म्हणाले, “माध्यम आणि करमणूक क्षेत्र सृजनशील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे रोजगार आणि व्यवसाय निर्माण होऊ शकतात आणि जागतिक स्तरावर भारत चमकू शकेल. तथापि, भारतीय मीडिया उद्योग, विशेषत: प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल हे जाहिरातींच्या उत्पन्नावर अवलंबून आहे.” हे दु:ख व्यक्त करताना ते म्हणाले की, कोविड साथीच्या आजाराने हे सिद्ध केले आहे की, ही व्यवस्था खूप मोठी आहे. ते म्हणाले की, “जर हा उद्योग आपल्याला विकसित करायचा आहे तर याचे जाहिरातीच्या उत्पनावरील अवलंबित्व कमी करावे लागेल.”
गुगलच्या संजय गुप्ता यांनी देशातील माध्यम आणि करमणूक उद्योगात कोविडमुळे निर्माण झालेल्या व्यत्ययांवर जोर दिला. ते म्हणाले, 2020-21 मध्ये हे क्षेत्र 20 अब्ज डॉलर्सवरून 15 अब्ज डॉलर्सपर्यंत घसरण्याची शक्यता आहे, परंतु ‘क्रिएटिव्ह पॉवरहाउस’ म्हणून परत उदयास येण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. त्यांनी कर आकारणीची चौकट सुलभ करण्याची आणि उद्योगाच्या पूर्ण क्षमतेत वाढ होण्यासाठी सुलभ नियामक पध्दत अवलंबण्याची गरज व्यक्त केली.
11 जुलै पर्यंत सुरू असलेल्या फिक्की फ्रेम्सच्या आभासी परिषदेमध्ये उद्योग क्षेत्रातील आघाडीचे तज्ज्ञ माध्यम आणि करमणूक क्षेत्राच्या विविध बाबींवर विचार विनिमय करून त्यांचे आदानप्रदान करतील. इटली हा देश फिक्की-फ्रेम्स 2020चा केंद्रबिंदू आहे.
***
S.Pophale/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com