PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
01 JUL 2020 7:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली-मुंबई, 1 जुलै 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांना अभिवादन केले आहे. ट्विटर वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले "कोविड-19 विरोधात आघाडीवर लढत उल्लेखनीय सेवा देणाऱ्या आपल्या डॉक्टर्सना भारत वंदन करत आहे."
कोविड-19 विरोधातल्या लढ्यात आघाडीवर असणाऱ्या भारताच्या डॉक्टरांचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आजच्या डॉक्टर दिनानिमित्त आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे. या आव्हानात्मक काळात राष्ट्र सुरक्षित व आरोग्यपूर्ण ठेवण्याप्रती डॉक्टरांची निष्ठा अलौकिक असल्याचे, केंद्रीय गृह मंत्र्यांनी ट्वीटर वर म्हटले आहे. डॉक्टर दिनी, डॉक्टरांच्या निष्ठा व त्यागाला राष्ट्राचा सलाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी भारत सरकारसह राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी उचललेल्या समन्वित पावलांमुळे आजमितीस सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 1,27,864 पेक्षा जास्त आढळून आले आहेत. याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे झालेल्यांचे प्रमाण आणखी वाढून 59.43 टक्के झाले आहे. गेल्या 24 तासांत एकूण 13,157 कोविड-19 रूग्ण बरे झाले असून त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,47,978 पर्यंतपोहोचली आहे.
सध्या 2,20,114 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
देशातील चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणखी वाढविण्यात आली आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 764 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 292 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे देशात एकूण 1056 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:
जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 576 (शासकीय: 365 + खाजगी: 211)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 394 (शासकीय: 367 + खाजगी: 27)
सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 86 (शासकीय: 32 + खाजगी: 54)
नमुने तपासणीत दररोज सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 2,17,931 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण 88,26,585 नमुने तपासण्यात आले आहेत.
इतर
- गरिबांना मोफत शिधा पुरविणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्याबद्दल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी देशाला संबोधित केल्यानंतर अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये, देशातील कष्टकरी शेतकरी आणि प्रामाणिक करदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, ज्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण आज या परीक्षेच्या घडीला गरजू लोकांना सहाय्य करत आहे.
- आज पत्र सूचना कार्यालय (पीआयबी), चा पश्चिम विभाग आणि रीजनल आउटरीच ब्यूरो, महाराष्ट्र आणि गोवा विभाग यांनी कोविड -19 : मिथक आणि वास्तव या विषयावरील राष्ट्रीय डॉक्टर दिन वेबिनार आयोजित केला होता. पुणे रुग्णालयातील सल्लागार आणि इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. ईश्वर झंवर आणि मुंबईच्या नायर रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख आणि कोविड संबंधी एचआर आणि लॉजिस्टिक प्रभारी डॉ. हेनल शाह यांनी वेबिनारमध्ये सहभागी झालेल्यांशी संवाद साधला. या वेबिनारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभागांचे सुमारे 100 अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते
- "सहिया” म्हणून ओळखल्या जाणार्या झारखंडमधील आशा शेवटच्या घटकांपर्यंत विशेषतः आदिवासी भागात आरोग्य सेवा पुरवण्यात मदत करत आहेत. राज्यात जवळपास 42,000 सहिया आहेत, त्यांना 2260 सहिया साथी (आशा सहाय्यक), 582 ब्लॉक प्रशिक्षक, 24 जिल्हा समुदाय मोबिलायझर आणि राज्यस्तरीय सामुदायिक प्रक्रिया संसाधन केंद्र यांची मदत होत आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून, दूरदूरच्या आदिवासी भागात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याप्रती त्यांची बांधिलकीचे कौतुक होत आहे.
- राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पुरविण्यात आलेले बीईएल आणि अॅग्वा व्हेंटीलेटर मॉडेल्स तांत्रिक समितीने नमूद केलेल्या वैशिष्ट्यांनुसार आवश्यकतांचे पालन करतात. तांत्रिक वैशिष्ट्यांनुसार बनविल्या जाणार्या या व्हेंटीलेटरमध्ये बीआयपीएपी मोड आणि इतर पद्धती आहेत. व्हेंटिलेटर युजर मॅन्युअल व अभिप्राय फॉर्मसह पुरवले जात आहेत ज्यांचा वापर शंकानिरसनासाठी करायला हवा, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
- विज्ञान तंत्रज्ञान संशोधन मंडळाने, संशोधकीय पाठ्यवृत्ती देण्यासाठी, क्षमता वाढविण्यासाठी आणि विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यासाठी, देशभरात एकच व्यासपीठ असावे, या दृष्टीने 'ऍक्सिलरेट विज्ञान' (AV) या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. या उपक्रमाची अधिक माहिती www.acceleratevigyan.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. ‘एव्ही’ने याआधीच हिवाळी सत्रासाठी "अभ्यास" या पूरक भागासाठी अर्ज मागविले आहेत.
- रसायन आणि खते मंत्रालय अंतर्गत, आरसीएफ म्हणजेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स देशातल्या शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. कोविड-19 महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीतही आरसीएफने खरीप पेरण्यांची गरज लक्षात घेवून ‘उज्ज्वला’ यूरिया आणि ‘सुफला’ यासारख्या अव्वल खतांची उपलब्धता सुनिश्चित केली आहे.
- नुकत्याच संपन्न झालेल्या CogX 2020 या कार्यक्रमात, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'माय जीओव्ही कोरोना हेल्पडेस्क' ने दोन श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. 'कोविड-19 संदर्भात समाजासाठी सर्वोत्कृष्ट अभिनव संकल्पना' आणि 'कोविड-19 संदर्भातील सर्वांगीण विजेता म्हणून लोकप्रियतेच्या निकषावर निवड' या दोन श्रेणींमध्ये हे पुरस्कार माय जीओव्ही कोरोना हेल्पडेस्कने जिंकले आहेत. लंडनमध्ये झालेला CogX 2020 कार्यक्रम म्हणजे अत्यंत मानाची अशी जागतिक नेतृत्व शिखर परिषद आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व उदयोन्मुख तंत्रज्ञानयुक्त प्रतिष्ठेचा वार्षिक महोत्सव, असे म्हणता येईल. माय जीओव्हीचा तांत्रिक भागीदार 'जिओहॅप्टीक टेक्नॉलॉजीज लिमिटेड'ने हे पुरस्कार जिंकले आहेत.
- इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी (INSA) आणि विज्ञान तंत्रज्ञान संशोधन मंडळ (SERB) यांनी मिळून फोटो/ चित्र व एक मिनिटाची फिल्म याची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचा हेतू लोकांनी त्यांच्या नजरेच्या (परिघाकडे) पलीकडे जाऊन विज्ञानाकडे बघावे, समजून घ्यावे आणि त्याचे कौतुक करावे हा आहे. अशा गंभीर नजरेने विज्ञानाकडे पाहिल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाला उत्तेजन मिळून आणि संशोधनाची आवड उत्पन्न होईल, तसेच सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल.
- केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग(एमएसएमई) मंत्रालयाने यापूर्वीच 26 जून 2020 च्या अधिसूचनेद्वारे जाहीर केल्यानुसार 1 जुलै 2020 पासून उद्योगांचे वर्गीकरण आणि नोंदणी यासाठी नवी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत एखादा उद्योग उद्यम म्हणून ओळखला जाईल आणि त्याच्या नोंदणी प्रक्रियेला उद्यम रजिस्ट्रेशन म्हटले जाईल.
- “पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग निर्दीष्टीकरण (PM FME)” योजनेमुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये सेंद्रिय अन्न-उत्पादनात प्रचंड वाढ होईल व अन्नप्रक्रिया उद्योगाला त्याचा मोठा फायदा होईल असा विश्वास, अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री श्री.रामेश्वर तेली यांनी व्यक्त केला आहे. ‘सपनों की उडाण’ या कार्यक्रमात ते बोलत होते. "आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरु झालेल्या पीएम एफएमई योजना आणि विस्तारित 'ऑपरेशन ग्रीन्स' योजनेचा, अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना व सूक्ष्म उद्योजकांना थेट फायदा होणार आहे." असेही ते म्हणाले. 'अन्नप्रक्रिया उद्योगांमुळे ग्रामीण भागात सुमारे 55 लाख लोकांना रोजगार मिळतो', असे सांगून तेली म्हणाले की, "कोविड-19 मुळे मूळगावी परतलेल्या लोकांसाठी हे क्षेत्र म्हणजे एक आशेचा किरण आहे". अन्नप्रक्रिया क्षेत्रातील असंघटित उद्योगांना मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याचा सरकारचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र अपडेट्स
राज्यातील रुग्ण संख्या 1,74,761 आहे. 4,878 नवीन रुग्ण नोंद झाले तर मंगळवारी 1,951 रुग्ण बरे झाले. आजवर राज्यात 90,911 रुग्ण बरे झाले आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्या 75,979 आहे. बृहन्मुंबई भागात 903 केसेस आढळून आल्या 625 बरे झाले तर 36 मृत्यूची मंगळवारी नोंद झाली. आता मुंबईमध्ये एकूण रुग्ण संख्या 77,197 आहे. 44,170 बरे झाले आहेत तर 4,554 मृत्यू झाले आहेत.
FACTCHECK


***
RT/MC/SP/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1635737)
Visitor Counter : 298