अर्थ मंत्रालय

भारतात कोविड 19 संदर्भात सहकार्य करण्यासाठी केंद्र सरकार आणि एआयआयबी यांच्यात 750 दशलक्ष डॉलर्सचा करार

Posted On: 19 JUN 2020 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जून 2020

भारतात कोविड-19 महामारीचा गरीब आणि दुर्बल कुटुंबावर होणारा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठीआणि प्रतिसाद दृढ करण्यासाठी भारताला सहाय्य करण्याकरिता 750 दशलक्ष डॉलर्सच्या ‘कोविड -19 सक्रीय प्रतिसाद आणि व्यय सहाय्यता कार्यक्रम’ यावर  केंद्र सरकार आणिआशियाई पायाभूत गुंतवणूक बँक, एआयआयबी यांनी  स्वाक्षऱ्या केल्या. एआयआयबी कडून भारतासाठी हा पहिला अर्थसंकल्पीय सहाय्य कार्यक्रम आहे.

 भारत सरकारच्या वतीने वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार खात्याचे अतिरिक्त सचिव समीरकुमार खरे यांनी तर एआयआयबी तर्फे महासंचालक रजत मिश्रा ( प्रभारी) यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

संघटीत व अनौपचारिक अशा दोन्ही क्षेत्रात कोरोना विषाणू प्रभावित श्रमिकांसाठी सामाजिक सुरक्षा उपाय बळकट करण्यासाठी आणि महिलांसह दुर्बल घटकांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी  व सामाजिक सहाय्यता प्रदान करण्यासाठी सरकारच्या तात्काळ प्रतिसादाला एआयआयबीने केलेल्या  सहाय्यासाठी खरे यांनी आभार मानले. एआयआयबीने वेळेवर केलेले  वित्तीय सहाय्य, सरकारच्या कोविड-19 आपत्कालीन प्रतिसाद कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीत योगदान देईल.

हा कार्यक्रम कोविड-19 च्या गंभीर आणि प्रतिकूल सामाजिक आणि आर्थिक परिणामांचा प्रभाव कमी करण्यासाठी भारत सरकारला सहाय्य प्रदान करेल. सध्याचे ऋण हे कोविड-19 संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याच्या सुविधेअंतर्गत एआयआयबीकडून भारताला दिलेले  दुसरे कर्ज आहे. कोविड-19 आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता प्रकल्प यासाठी आधीच मंजूर झालेल्या 500 दशलक्ष डॉलर्स कर्जाव्यतिरिक्त हे कर्ज आहे.

दारिद्रय रेषेखाली राहणारी कुटुंबे, शेतकरी, आरोग्य कार्यकर्ते, महिला, महिला स्वयं सहाय्यता गट, विधवा,दिव्यांग, जेष्ठ नागरिक, अत्यल्प वेतन धारक,बांधकाम मजूर,आणि इतर दुर्बल घटक कार्यक्रमाचे लाभार्थी राहतील.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या मनुष्य बळासह उत्पादन क्षमतेचे दीर्घकालीन नुकसान रोखण्यासाठी आर्थिक लवचिकता प्रदान करणे हा एआयआयबीच्या सहाय्यामागचा उद्देश असल्याचे एआयआयबीचे उपाध्यक्ष ( गुंतवणूक घडामोडी )डी. जे. पांडीयान यांनी सांगितले.

या योजनेला एआयआयबी आणि आशियाई विकास बँक यांच्याकडून वित्त सहाय्य केले जात असून 750 दशलक्ष डॉलर एआयआयबी द्वारे तर 1.5 अब्ज डॉलर्स आशियाई विकास बँक द्वारे प्रदान करण्यात येईल.विविध मंत्रालयांच्या सहकार्यानेवित्त मंत्रालयांच्या आर्थिक व्यवहार विभागान्द्वारे या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. एआयआयबी एक बहुपक्षीय विकास बँक आहे. आशियामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषयक सुधारणा करण्याचे बँकेचे उद्दिष्ट असून जानेवारी 2016 मधे बँकेचे कामकाज सुरु झाले. एआयआयबीचे जगभरात 102स्वीकृत सदस्य आहेत.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1632963) Visitor Counter : 240