रेल्वे मंत्रालय
जास्त उंचीवरील ओएचई विद्युत सेक्शनमध्ये पहिली दोन थरांची मालवाहू रेल्वे चालवून भारतीय रेल्वेने निर्माण केला नवा जागतिक आदर्श
मालवाहतूक परिचालनामध्ये नवनिर्मिती, वेग आणि अनुकूलता यावर भर
1 एप्रिल 2020 ते 10 जून 2020 दरम्यान भारतीय रेल्वेकडून अखंडित 24X7 मालवाहू रेल्वेगाड्यांच्या परिचालनाच्या माध्यमातून 178.68 दशलक्ष टन वस्तूंची वाहतूक
24.03.2020 ते 10.06.2020 दरम्यान 32.40 लाखांपेक्षा जास्त वॅगनद्वारे सामग्रीची वाहतूक, त्यापैकी 18 लाखांपेक्षा जास्त वॅगनद्वारे अत्यावश्यक सामग्रीची वाहतूक
भारतीय रेल्वेने 22.03.2020 ते 10.06.2020 दरम्यान एकूण 3,897 पार्सल ट्रेन देखील चालवल्या असून त्याद्वारे एकूण 1,39,196 टनाची सामग्री वाहून नेली
Posted On:
11 JUN 2020 8:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2020
भारतीय रेल्वेने पहिले कॉन्टॅक्ट वायरची 7.57 मीटर इतकी जास्त उंची असलेले ओव्हर हेड इक्विपमेंट(ओएचई) बसवून आणि पश्चिम रेल्वेवरील विद्युतीकृत सेक्शनमध्ये द्विस्तरीय कंटेनर चालवून एक नवा जागतिक आदर्श निर्माण केला आहे. संपूर्ण जगात अशा प्रकारची अभूतपूर्व अशी ही पहिली कामगिरी आहे आणि त्यामुळे भारतीय रेल्वेचा नवा हरित उपक्रम म्हणून हरित भारत मोहीमेला देखील चालना मिळणार आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय रेल्वेने जास्त उंचीच्या ओएचई सेक्शनमध्ये जास्त उंचीवर पोहोचू शकणाऱ्या पेंटोग्राफच्या साहाय्याने दोन थरांची कंटेनर ट्रेन चालवणारी पहिली रेल्वे बनण्याचा बहुमान मिळवला आहे. या परिचालनाची यशस्वी सुरुवात 10 जून 2020 रोजी पालनपूर आणि गुजरातमधील बोताड स्थानकांपासून झाली.
अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये नवनिर्मिती, वेग आणि मालवाहतूक परिचालनातील अनुकूलता यावर भर देण्यात येत आहे. कोविड लॉकडाऊनमुळे बराच वेळ वाया गेल्यानंतरही रेल्वे मंत्रालयाने गेल्या वर्षीच्या मालवाहतुकीची आकडेवारी मागे टाकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
एक एप्रिल 2020 ते 10 जून 2020 या काळात भारतीय रेल्वेने देशभरात आपल्या 24X7 मालवाहतूक परिचालनाद्वारे सुमारे 178.68 दशलक्ष टनाच्या सामग्रीची वाहतूक केली आहे.
24.03.2020 ते 10.06.2020 दरम्यान 32.40 लाखांपेक्षा जास्त वॅगनद्वारे पुरवठा साखळी कार्यरत ठेवण्यासाठी सामग्रीची वाहतूक करण्यात आली. त्यापैकी 18 लाखांपेक्षा जास्त वॅगनद्वारे अन्नधान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल,कांदे, फळे आणि भाजीपाला, पेट्रोलियम उत्पादने, कोळसा, खते इ अत्यावश्यक सामग्रीची देशभरात वाहतूक करण्यात आली.एक एप्रिल 2020 ते 10 जून 2020 या काळात रेल्वेने 12.74 दशलक्ष टन अन्नधान्याची वाहतूक केली . गेल्या वर्षी याच काळात 6.79 दशलक्ष टन सामग्रीची वाहतूक करण्यात आली होती. याव्यतिरिक्त 22.03.2020 ते 10.06.2020 दरम्यान एकूण 3,897 पार्सल ट्रेन देखील चालवण्यात आल्या. त्यापैकी 3790 ट्रेन वेळापत्रकानुसार धावणाऱ्या होत्या. या पार्सल ट्रेनच्या माध्यमातून एकूण 1,39,196 टनांच्या सामग्रीची वाहतूक करण्यात आली.
B.Gokhale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1630956)
Visitor Counter : 275