श्रम आणि रोजगार मंत्रालय
लॉक डाऊनच्या काळात ईपीएफओने 36.02 लाख दाव्यांचा केला निपटारा
74% पेक्षा जास्त लाभार्थी अल्प वेतन धारक
Posted On:
09 JUN 2020 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2020
कोविड-19 लॉक डाऊनच्या आव्हानात्मक काळात आपल्या सदस्यांना सुकर व्हावे यासाठी ईपीएफओ, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वैधानिक मंडळाने आपल्या सदस्यांना तत्पर आणि प्रभावी सेवा पुरवली. लॉक डाऊनच्या निर्बंध काळातही ईपीएफओने 36.02 लाख दाव्यांचा निपटारा करत गेल्या एप्रिल आणि मे 2020 या दोन महिन्यात सदस्यांना 11,540 कोटी रुपये प्रदान केले. यापैकी 4580 कोटी रुपयांचे 15.54 लाख दावे, प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत नुकत्याच आणलेल्या कोविड-19 एडव्हान्सशी संबंधित आहेत.
सध्याच्या कठीण काळात ईपीएफओ सदस्यांसाठी विशेषता ज्यांचे मासिक वेतन 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे अशा सदस्याना कोविड-19 एडव्हान्स अतिशय उपयोगी ठरत आहे. मूळ वेतन आणि तीन महिन्याचा महागाई भत्ता किंवा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी मधे कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा असलेली 75 % पर्यंत रक्कम यापैकी जी कमी असेल तितकी रक्कम कोविड-19 एडव्हान्स म्हणून घेता आल्याने अनेक कामगारांना वेळेवर दिलासा मिळून त्यांना कर्जापासून बचाव करता आला.
वेतनानुसार आकडेवारी पाहिल्यास लॉक डाऊन काळात एकूण दावेदारांपैकी 74 % पेक्षा जास्त दावेदार 15,000 पेक्षा कमी वेतन असलेल्याचे आहेत. 50,000 पेक्षा जास्त वेतन असलेल्या उच्च उत्पन्न गटातून केवळ 2% दावेदार आहेत. सुमारे 24 % दावे हे 15,000 ते 50,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असलेल्या सदस्यांकडून करण्यात आले आहेत.
लॉक डाऊनच्या काळात ईपीएफओ 50% कमी कर्मचारी क्षमतेने, सोशल डीस्टन्ससिंगचे पालन करत काम करत होती. कर्मचारी कमी संख्येने असूनही ईपीएफओने दावे निकाली काढण्याचा 10 दिवसांचा कालावधी कोविड-19 एडव्हान्स साठी साधारणतः 3 दिवसांवर आणला.याशिवाय एप्रिल-मे 2019 मधे 33.75 लाख दाव्यांचा निपटारा करण्यात आला तर एप्रिल-मे 2020 मधे 50% पेक्षा कमी कर्मचारी उपस्थित असूनही 36.02 लाख दाव्यांचा निपटारा करण्यात आला असून मनुष्यबळ कार्य उत्पादकतेत 100% पेक्षा जास्त वाढ दर्शवत आहे. दाव्यांचा निपटारा करण्यात नवी उंची गाठण्यात कर्मचाऱ्यांच्या कटिबद्धतेबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेचीही मोठी भूमिका आहे.
ईपीएफओ कार्यालय किमान कर्मचाऱ्यांसह चालवण्यात येत असल्यामुळे सदस्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी कल्पकतेची आवश्यकता होती. प्रतिकुलतेचे संधीत रुपांतर करत ईपीएफओने दावे निपटारा करणारी आपली पहिली संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा विक्रमी पाच दिवसात सुरु केली. कोविड-19 दाव्यांपैकी सुमारे 54% दाव्यांचा स्वयंचलित पद्धतीने निपटारा करण्यात येतो. या यंत्रणेमुळे भविष्यात ईपीएफओ कडून दाव्यांचा निपटारा करण्यासाठी लागणारा काळ कमी होईल अशी अपेक्षा आहे.
स्वयंचलन आणि निष्ठेने काम करणारे मनुष्यबळ यामुळे ईपीएफओ, कामकाजाच्या दर दिवशी सुमारे 270 कोटी रुपयांच्या 80,000 पेक्षा जास्त दाव्यांचा निपटारा करत आपल्या सदस्यांना या संकटकाळात सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सहाय्य करत आहे.
* * *
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1630533)
Visitor Counter : 290